◼️कोजागिरी पौर्णिमा” विशेष लेख :-एक अमृत पर्व : शरदाचं चांदणं !

◼️कोजागिरी पौर्णिमा” विशेष

एक अमृत पर्व : शरदाचं चांदणं !

सांगा, पोर्णिमेचा चंद्र कुणास भावत नाही? माणसालाच नव्हे तर प्राणीमात्रांनाही तो चंद्र व ती टिपूर चांदण्याची रात्र अक्षरशः वेडावून सोडतात. चकोर पक्षी तर म्हणे चंद्राचे चांदणे प्राशन करून तृप्त होत असतो. शरद पौर्णिमेच्या दिवशीचे चांदणे म्हणजे सर्वांसाठी अमृत असते, असे आपण ऐकले असालच. या दिवशी चंद्र अधिक जवळ आल्याने त्याची शक्तिवर्धक जीवनसत्वे प्रसारित होत असतात. याच वैज्ञानिक दृष्टिकोनातून या पौर्णिमेस विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही पौर्णिमा म्हणजेच शरद ऋतुतील आश्विन मासातील आश्विन पौर्णिमा असते. तीलाच शरद पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, नवान्न पौर्णिमा, कौमुदी पौर्णिमा, रास पौर्णिमा, मणिकेथारी (मोती तयार करणारी) पौर्णिमा म्हणतात. ती अशा कितीतरी नावाने ओळखली जाते. माझा शेतकरी बांधव जो साऱ्या जगाचा पोशिंदा अन्नदाता आहे, तो नविन उत्पादित अन्नधान्य सर्वांना खाण्यायोग्य झाले. म्हणून तो नव्या अन्नाचे उद्घाटन अर्थात ‘चव घेणे’ हा विधीयुक्त कार्यक्रम याच पौर्णिमेच्या पावन पर्वावर करतो. त्यामुळे माझा अन्नदाता तीला ‘नवान्न पुणिव’ असे म्हणतो. याच शरद पौर्णिमेच्या प्रारंभिक कालखंडात पहिल्या रात्री भगवद्भक्त, देवभोळे, अंधविश्वासू व इतर स्वार्थी-धनलोभी मंडळी ‘कोजागिरी पौर्णिमा’ म्हणून धुमधडाक्यात साजरी करतांना आढळतात. या दोन्हीबद्दल थोडक्यात उहापोह असा –

कोजागिरी पौर्णिमा :- ‘कोऽजाग्रति! कोऽजाग्रति!!’ म्हणजे कोण जागे आहे? कोण जागृत आहे? असे म्हणत श्रीलक्ष्मी या पहिल्या (उदा.३०ऑक्टोबर) रात्री अमृतकलश घेऊन फिरते, अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे. तीची कृपादृष्टी आपल्यावर पडावी व चंद्रप्रकाशाच्या रुपात ते अमृत मिळावे, म्हणून उशीरापर्यंत जागरणे केली जातात. जागरणात भजन, कीर्तन, गप्पागोष्टी, धार्मिक कथा, पुराण पाठ आदी मनोरंजक व ज्ञानवर्धक कार्यक्रम चालविले जातात. बाहेर छान शितल चंद्रप्रकाशात दूध गरम करीत आटवितात. त्या दुधात खोबरं कीस, बदाम, काजू, किस्मीस, केशर, पिस्ता, आदी सुकामेवा, साखर व इतर मसाले घातले जातात. ते दूध आकाशात चंद्र बरोबर डोक्याच्या वर येईतोवर म्हणजेच शरदाचे चांदणे दुधात पडेपर्यंत आटविले जाते. म्हणतात की चंद्राचे पूर्ण प्रतिबिंब उकळत्या दुधात दिसले पाहिजे. तोवर इतर कार्यक्रम केवळ टाईमपास म्हणून घेतले जातात. पूर्वी कोजागिरी पौर्णिमेस धार्मिक कार्यक्रमांची लयलूट होत असे. आता मात्र त्यांना विकृतीने मागे टाकले आहे. काही ठिकाणी पंच पक्वान्नांच्या पंगती झडतात, हेही ठीकच म्हणा! मात्र कुठे कुठे तर सुकी पार्टी वा ओली पार्टी होते. म्हणजेच मद्यपान आणि जेवणावळीत मांस-मटणाचे सेवण होऊ लागले आहे. असे का? अशी कोणी शंका उपस्थित केली. तर सांगितले जाते की आमच्या धर्मात यावेळी मांसाहार किं शाकाहार घ्यावा, याचे बंधनच नाही. आम्हाला फक्त दूध आटवून पिण्याशी मतलब! असे दूध किंवा खीर प्राशन केल्याने आपल्या शरीरात उत्तुंग रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यास मदत होते. चला तर मग, भक्तिभावाने कोजागिरी साजरी करून अमृतपान करुया !

नवान्न पौर्णिमा :- या सणास माझा बळीराजा नव्या अन्नाची पुणिव असे संबोधत असतो. कोणी हवेखोर म्हणतात की कोजागिरी व नवान्न पौर्णिमा दोन्ही एकाच पद्धतीने एकाच वेळी साजरी करण्यात यावी. ते कसं काय शक्य आहे? हीचा हेतू काय? तीचा हेतू काय? दोन्हीत जमीन-आस्मानचा फरक आहे. दोन्हीतील शुद्ध सात्विक भाव, कार्यकारण भाव, सांस्कृतिक आधार विभिन्न आहेत. नवान्न पौर्णिमेची कृषीसंस्कृती फार प्राचीन व विश्व कल्याणकारी आहे. येथे स्वार्थापेक्षा पारमार्थिक भावनेला सर्वाधिक महत्त्व असल्याचे दिसून येते. म्हणून आपल्याकडे माझा अन्नदाता तो उत्सव शांत व निवांतपणे दुसऱ्या दिवसापासून (उदा.३१ऑक्टोबर) पाच दिवसांपर्यंत साजरा करीत असतो. या दिवशी तो शेतातील मुख्यपीक असलेल्या, भोरडा झालेल्या धानाचे चार-पाच लोंब घेऊन येतो. धानाला सोलून तांदूळ-दाणे काढतो आणि दोन-दोन दाणे स्वयंपाकातील सर्व व्यंजनांमध्ये टाकून शिजविले जाते. जसे की वरण, भात, पोळी, भाजी, आमटी व सणानिमित्त रांधण्यात येत असलेल्या प्रत्येक पंचपक्वान्नांत नवे दाणे मिसळले जातात. या नवान्नयुक्त पदार्थांचे नैवेद्य आपल्या कुलदैवत व आराध्य देवतांना दाखविण्यात येतो. शेजारच्या पोरासोरांना, भिकारी, गरीब, भुकेल्या व्यक्तींना आग्रह करीत पोटभर जेवू घातले जाते. पंगतीमध्ये सर्वांच्या संगतीने माझा बळीराजा आनंदाने नवान्नाचे घास घेऊन जणू काही नविन धान्याचे उद्घाटनच करून टाकतो व आपले उत्पादित धान्य हे सर्वांना खाण्यायोग्य आहे याचे जगजाहीर प्रमाणपत्र मिळवून घेतो. तेव्हा त्याला केवढा मोठा आनंद होत असतो म्हणून सांगू? याचे वर्णन करण्यास माझे शब्दच निष्प्रभ ठरतील. खरंच जी, नवान्न प्रौर्णिमा शेतकऱ्यांत नवचैतन्य निर्माण करीत असते!
कोकणातसुद्धा नवान्न सेवण केले जाते आणि धानाचे लोंब, वरी, नाचणीचे कणीस व गोंडा, कुर्डूची फुले व आंब्याची पाने एकत्रित बांधून ते प्रवेशद्वारासह इतरही महत्त्वाच्या जागी बांधतात. त्याला ‘नवे बांधणे’ म्हणतात. बांबूच्या कमच्यांपासून फुलोरा तयार करून फुले व तोरणाने सजवितात. फुलोऱ्यावर नवान्नाचे नैवेद्य मांडून तो देवघरातील देव्हाऱ्याच्या अगदी वर बांधतात. पूर्वजांची ही संकल्पना तशी वाखाणण्याजोगीच नाही का? माझ्या अन्नदात्याचा हा सण एक आनंदोत्सवच आहे. आपण झाडाला दगडधोंडे, झोडपे आदी फेकून मारले तरीही तो गोड-रसाळ फळेच देतो. त्याचप्रकारे माझा शेतकरी बांधव कितीही कष्ट, हाल, दुष्काळ, विघ्ने वा संकटे आली तरी तो खंबीर राहून सर्वांच्या पोटापाण्याची तजवीज आनंदाने करत असतो. ‘धन्य, धन्य तू अन्नदाता ! तुझ्यावरी सर्वांचीच सत्ता !!’ या, आपण सर्वांनी मिळून आपल्या पोशिंद्याच्या आनंदोत्सवाचा आनंद द्विगुणित करुया!
ही शरद पौर्णिमा प्रांतवार विभिन्न रुपात साजरी होत असते. (१) गुजरात – शरद पूनम म्हणून रास व गरबा खेळतात. (२) मिथिला – या रात्री ‘कोजागरहा’ ही पूजा केली जाते. (३) हिमाचल प्रदेश – या निमित्ताने जत्रा भरते. (४) राजस्थान – चंद्राची पूजा करून शेतकऱ्यांना दूध दिले जाते. (५) हरियाणा – दुधाची खीर बनवून रात्रभर चांदण्यात ठेवून सकाळी खातात. (६) ओरिसा – कुमार पौर्णिमा म्हणून गजलक्ष्मी देवीची पूजा केली जाते. (७) पश्चिम बंगाल – लोख्खी पुजो म्हणून पूजेत शहाळी व ताजे नारळ वापरतात. शहाळ्यावर शेंदराने स्वस्तिक काढून श्रीलक्ष्मीनारायणाची पूजा करीत असतात. (८) बनारस – वैष्णव संप्रदायाचे भक्तगण ‘भक्तसोहळा’ साजरा करतात. धन्यवाद !
!! सर्वांना नवान्न व कौमुदी पौर्णिमेच्या आभाळभर हार्दिक शुभेच्छा !!
!! अधिक माहितीसाठी नियमित वाचत रहा ‘चंद्रपूर सप्तरंग’ !!

– एक शेतकरीपुत्र –

श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी,
[ कवी/लेखक तथा संत व लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक ]
मु.पिसेवडधा, पो.देलनवाडी, तह.आरमोरी, जि.गडचिरोली.
फक्त व्हा.नं. ९४२३७१४८८३.
ई-मेल – krishnadas.nirankari@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *