◼️ प्रासंगिक लेख :- राष्ट्रीय शिक्षण आणि दीपावली !

राष्ट्रीय शिक्षण दिन” विशेष…

राष्ट्रीय शिक्षण आणि दीपावली !

दिवाळी सणाच्या दिवसांत संपूर्ण भारतभर दिवे लावून झगमगाट केला जातो. खरे तर देशातील संत व तत्वज्ञानी थोर पुरुषांनी दिवे उजळून नव्हे, तर स्वतः ज्ञानदीप होऊन जग उजळून टाकण्यास सांगितले होते. मात्र आम्ही आपलेच दिवाळे काढून बोंब मारत बसतो. ‘प्रत्येकाने दिवाळीच्या सणापासून हीच प्रेरणा घ्यावी, असाच तर हेतू नसावा?’ असा सकारात्मक विचार करता आला पाहिजे व त्यादृष्टीने प्रयत्नरतही असावे. थोर शिक्षणतज्ज्ञांनी सर्व स्तरांतील बालक-बालिकांना मोफत व सक्तीने शिक्षण दिले जावे म्हणून आजीवन कष्ट उपसले. त्याचे फलित हेच का? प्रत्येक व्यक्ती ज्ञानदीपक ठरली तर संपूर्ण देशच झगमग होऊन उठेल. म्हणून शिक्षणाला मानवी जीवन प्रकाशक तेजःपुंज स्रोताची उपमा दिली गेली. हे काही खोटे नाही.
शिक्षणाचे महत्त्व ओळखून देशभरात त्याचा प्रचार होण्याच्या उद्देशाने ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ साजरा करण्याचे ठरविण्यात आले. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त तो दरवर्षी ११ नोव्हेंबर रोजी साजरा करण्याचे ठरले. आझाद हे शिक्षणमंत्रीच नव्हते तर ते महान स्वातंत्र्य सेनानीही होते. त्यांनी दि.१५ ऑगस्ट १९४७ ते २ फेब्रुवारी १९५८ या कालावधीत शिक्षणमंत्री म्हणून देशाची सेवा केली. त्यांचा सन्मान करीत इ.स.२००८ पासून भारतात सर्वत्र ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ साजरा होऊ लागला आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या विलक्षण योगदानाबद्दल त्यांना ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मौलाना अबुल कलाम आझाद (११ नोव्हेंबर १९८८ – २३ फेब्रुवारी १९५८) हे एक भारतातील प्रमुख राजकीय पुढारी होते. त्यांचा जन्म मक्केला झाला. त्यांचे मूळ नाव मोहिउद्दीन अहमद असे होते. अबुल कलाम म्हणजे वाचस्पती ही त्यांची मानाची पदवी होती. पुढे आझाद (स्वतंत्र) हे टोपणनावही त्यांना उपाधीच्या स्वरुपात मिळाले. त्यांनी पारंपारिक मुस्लिम शिक्षण पद्धतीप्रमाणे फार्सी, उर्दू व अरबी भाषांचे प्रथम अध्ययन करून नंतर तर्कशास्त्र, इस्लामधर्म, तत्वज्ञान व गणित यांचा सखोल अभ्यास केला. तद्नंतर स्वतंत्रपणे इंग्रजी विषयाच्या अभ्यासाला प्रारंभ केला. सन १९०८ साली इजिप्त, अरबस्तान, तुर्कस्तान, फ्रांस आदी देशांना त्यांनी भेटी दिल्या. त्यांनी लोकजागृतीसाठी इ.स.१९१२ मध्ये कोलकाता येथे ‘अल्-हिलाल’ हे उर्दू साप्ताहिक सुरू केले. ते वृत्तपत्रातून ‘आझाद’ या टोपणनावानेच लेखन करीत असत. स्वातंत्र्यानंतर ते केंद्रीय मंत्रीमंडळात सामील झाले आणि अखेरपर्यंत शिक्षणमंत्री राहिले. देशात आयआयटी, आयआयएससी आणि स्कूल ऑफ ऑर्किटेक्चर अॅण्ड प्लानिंग यासारख्या प्रमुख शैक्षणिक संस्था स्थापन करण्यामागे त्यांची फार मोलाची भूमिका होती. एआयसीटीई आणि युजीसी यांसारख्या सर्वोच्च संस्था स्थापन करणारे ते प्रमुख व्यक्ती होते. सर्वांना विनामूल्य शिक्षण मिळावे, हा हेतू उराशी बाळगून त्यांनी राष्ट्रीय शिक्षण प्रणाली स्थापन केली. ललितकला अकादमी, साहित्य अकादमी आदी बर्‍याच शैक्षणिक संस्था उघडल्या. व्यावसायिक व माध्यमिक शिक्षणाच्या विविधतेवरही त्यांनी भर दिला. आज चालू असलेली ‘मध्यान्ह भोजन’ योजना ही त्यांचीच देण आहे.
देशात कोरोना महामारीने सर्वत्र आकांडतांडव माजवून हलकल्लोळ सुरू केला आहे. हळुहळू आता हे संपूर्ण शैक्षणिक वर्ष बरबाद झाल्याचीच चिन्हे दिसू लागली आहेत. समस्त शाळा बंद पडल्या आहेत. तरीही बिचारे शिक्षक जीवाचा आटापिटा करून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यात व्यस्त दिसून येत आहेत. ते विविध युक्त्या-क्लृप्त्या योजून जसे मोबाईलवर ऑनलाइन शिक्षण, गृहभेटीतून स्वाध्याय, ५-७ विद्यार्थ्यांना संसर्ग प्रतिबंधात्मक नियम पाळत गटागटाने झाडाखाली, चावडीवर, समाजमंदिरांच्या ओट्यावर बसवून ऑफलाइन शिक्षण देत आहेत. मात्र विद्यार्थी हे चुकवून शाळा बंदचा गैरफायदा उठवत असतील तर ते त्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. आता तर दिवाळी अगदी तोंडावर येऊन ठेपली. त्यांनी फटाके उडविण्यात, घरादाराची रंगरंगोटी, रोषणाई करण्यातच धन्यता मानू नये. आपले शिक्षण घेण्याचे वय आहे. तेव्हा शिक्षणात-अभ्यासातही लक्ष केंद्रित केले पाहिजे. शिक्षक आपल्याला शोधत आहेत, आपणही त्यांचा मागोवा घेतला पाहिजे. नुसते प्रकाश देणारे दीपक जाळून फक्त घर व अंगणच प्रकाशाने उजळू शकतो, हे लक्षात घ्यावे. आपण स्वतःच ज्ञानदीपक बनून आपल्यासकट संपूर्ण आसमंत झगमग करून टाकण्याच्या इराद्याने झपाटून उठले पाहिजे. तरच थोर महापुरुषांचे प्रयत्न व विचार सार्थकी लागतील –

“विद्येविना मती गेली ।
मतीविना निती गेली ।
नितीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले ।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।”
(शिक्षणसम्राट महात्मा फुले)

पुन्हा एकदा असे म्हणण्याची वेळ कुणावर तरी येऊ देऊ नये. यास्तव हेच नम्र निवेदन !

– लेखक –

श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
 गडचिरोली, ता. जि. गडचिरोली मो.नं. ७७७५०४१०८६.
ई-मेल – nikodekrishnakumar@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *