◼️ प्रासंगिक लेख :- समाज परिवर्तनाचा क्रांतिकारी वसा !

समाज परिवर्तनाचा क्रांतिकारी वसा !

आदरणीय प्रबोधनकार ठाकरे साहेब हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. ते शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे वडील होते. सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनातील अंतिम ध्येय होते. त्यांनी आपल्या ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही. ते एक समाज परिवर्तनाचे वेगवान चक्र ठरले. मग भलेही बालविवाह व विधवांच्या केशवपनाची अभद्र रुढी असो, देवळामधील उच्चभ्रू पुजाऱ्यांची अरेरावी-हुकूमशाही असो! ते या सर्व आघाड्यांवर अखेरपर्यंत बेफाम वादळ होऊन त्वेषाने लढत राहिले. त्यांना या लढ्यापासून दूर ढकलण्याचा व ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ अशा त्यांच्या तत्वापासून त्यांना परावृत्त करण्याचा अनेकांनी विफल प्रयत्न केला. अनेकानेक आमिषे दाखविली, पण ध्येयवेड्या प्रबोधनकारांनी कशालाही दाद दिली नाही. अन्याय्य रुढी, जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी त्यांनी वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन अणकुचीदार शस्त्रे वापरून पुराणमतवाद्यांशी जंग पुकारले.
रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जन्मलेल्या केशवजी सीताराम ठाकरे (१७ सप्टेंबर १८८५ – २० नोव्हेंबर २०२०) साहेबांचे शिक्षणसम्राट महात्मा जोतीराव फुले हे आदर्श होते. क्रांतिसुर्य महात्मा फुलेजींच्या क्रांतिकारी साहित्याचा सखोल अभ्यास करून समाज सुधारणांबद्दलच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. म्हणूनच महात्मा फुलेजींचा पुण्यातील कट्टर सनातन्यांकडून अतोनात छळ झाला. त्यानंतरच्या काळात त्यांचा लढा-वसा पुढे चालविण्यासाठीच प्रबोधनकार ठाकरे साहेब पुण्यात स्थायिक झाले. या कार्यात त्यांच्या विरोधकांनी आणलेले अडथळे पार करत त्यांनी साऱ्यांची दाणादाण उडविली. त्यांच्या समाजोपयोगी कार्याच्या आकर्षणाने ते राजर्षी शाहू महाराजांच्या संपर्कात आले. छत्रपती शाहू महाराज हे स्वतः सुधारणावादी व महात्मा फुलेजींच्या सत्यशोधक समाज चळवळीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे ते प्रबोधनकारांचे चाहते झाले. त्यांनी प्रबोधनकारांची सत्वपरीक्षाही पाहिली आणि नंतर जाहीरपणे सांगितले, “लाच देऊन ज्याला वश करता येणार नाही किंवा विकत घेता येणार नाही. अशी एकमेवाद्वितीय व्यक्ती मी पाहिली आहे, ती म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे होय!”
समाजातील सर्व विकारांचे मर्म भटांच्या कर्मकांडात आहे, असे त्यांचे रोखठोक मत होते. “धार्मिक पूजापाठाचे विधी, उपासतापास, व्रतवैकल्ये आणि धर्म या नावांखाली सर्व जातींमध्ये जे रुढ परिपाठ आहेत ते सर्व ब्राह्मणांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी प्रस्थापित केले आहेत. या दुष्ट रुढीमुळेच स्त्रियांवर अन्याय होतो. विशेष अधिकारांपासून वंचित अशा बहुजन समाजावर अन्याय होतो. सारांश सर्व अशिक्षित जनता या रुढीखाली चिरडली व भरडली जाते.” असे त्यांना वाटत असे. त्यामुळे त्यांनी या सर्व घटकांच्या मुळांवर म्हणजेच मनुशाहीवर घाला घातला. पुरोगामी, उदारमतवादी, सुधारक विचारांच्या ब्राह्मणांविषयी त्यांच्या मनात आदरभाव होता, द्वेषभावना मुळीच नव्हती. परंतु धंदेवाईक भट-भिक्षुकशाही व्यवस्थेचे ते अस्सल टीकाकार होते. संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या जीवनावरील ‘खरा ब्राह्मण’ या नाट्यकृतीच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या ब्राह्मणांची भूमिका मांडली. ते लेखक, पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारसरणीचा प्रचार व प्रसारही केला. कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म किं धर्माची देवळे, ग्रामधन्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप, वक्तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथांसह समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, रंगो बापूजी, पंडिता रमाबाई, माझी जीवनगाथा (आत्मचरित्र) ही चरित्रे, अशा आदी साहित्यसंपदेची त्यांनी निर्मिती केली. त्यांची ‘खरा ब्राह्मण’ आणि ‘टाकलेले पोर’ ही दोन्ही नाटके समाजसुधारणेत अग्रणी क्रांतिकारकच ठरली. ‘खरा ब्राह्मण’ या नाट्यप्रयोगाला परवानगी देऊ नये, अशी मागणी पुण्यातील सनातन्यांनी न्यायालयाकडे केली. मात्र न्यायाधीशांनी नाटककारांच्याच बाजुने निकाल दिला होता.
मुंबईत स्थायिक झाल्यानंतर प्रबोधनकारांनी हुंडाप्रतिबंधक चळवळ हाती घेतली. सर्व जातींची ‘हुंडाविरोधी स्वयंसेवक सेना’ स्थापन करून कित्येक वरपित्यांना त्यांनी घेतलेल्या हुंडारुपी रकमा परत करण्यास भाग पाडले. त्याकाळी विवाहापूर्वी प्रेमात पडणे हा गुन्हा व व्यभिचार समजण्यात येत असे. तशाही परिस्थितीत त्यांनी अनेक प्रेमी युगुलांचे लग्न लावून दिले. आज घटकेला हे संदर्भ वाचताना आपणास या गोष्टी विशेष न वाटता सहज वाटतात. या समस्यांची तीव्रता आपल्या लक्षात येत नाही. तेव्हाच्या कर्मठ वातावरणात समाजसुधारणांचा केवळ उच्चार करणेही घातक होते. आजही हुंडाविरोधी अनेक कानून-कायदे आहेत. मात्र हुंडा घेण्याच्या प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन होऊ शकले नाही, हीच फार मोठी शोकांतिका आहे. स्त्रियांवर अतोनात लज्जास्पद अत्याचार रोज होतच आहेत. मग विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात या समस्येची काय तीव्रता व भयानकता असेल? याची फक्त कपोलकल्पित कल्पनाच केलेली बरी! यावरून आदरणीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांचे द्रष्टेपण सिद्ध होते. मुंबईत परप्रांतीय विशेषतः दाक्षिणात्य मंडळी मोठ्या संख्येने येऊ लागली. त्यामुळे मराठमोळ्या माणसांची गैरसोय होऊ लागली. त्यालाही त्यांनी इ.स.१९९२ साली सर्वप्रथम प्रबोधनानेच वाचा फोडली.
असा हा समाज प्रबोधनाचा झंझावात दि.२० नोव्हेंबर १९७३ रोजी कायमचा थंड झाला. आदरणीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांच्या अविस्मरणीय स्मृतींना विनम्र अभिवादन !

संकलन –

श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
(संत व लोक साहित्याचे गाढे अभ्यासक)
मु. पिसेवडधा, पो. देलनवाडी.
ता. आरमोरी, जि. गडचिरोली.
फक्त व्हा.नं. ७४१४९८३३३९.
ई-मेल – nikodekrishnakumar@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *