◼️ काव्य रंग :- ओवाळणी

ओवाळणी

आली दिवाळी भाऊबीज
बहिण भावाला ओवाळी
सदा सुखी राहा भाऊराया
हीच माझी ओवाळणी.

नित्य ठेव जपून
प्रेमभाव अंतरीचा
नको मला साडीचोळी
आधार असो कायमचा.

कधी रूसवे फुगवे
भावा बहिणींची माया
हक्काने करती हेवेदावे
शीतल सुखद छाया.

वेळप्रसंगी विसरती
मनातली गुज अढी
एकमेका जीव लावून
उभारूया हर्षाची गुढी.

स्नेहभावाने ओवाळीते
बहिण तुजला भाऊराया
आदरभाव टिकून राहो
अखंड असू दे छत्रछाया.

औक्षण तुज मनोभावे
माहेर मज खेळीमेळीचे
अबाधित ठेव सदोदित
अतुट नातं भाऊ बहिणीचे.

उदंड लाभो आर्युआरोग्य
प्रभूचरणी ही आळवणी
ममतेची ज्योत लावूनी
हीच माझी ओवाळणी.

✍️ सौ.सुजाता सोनवणे
सिलवासा दादरा नगर हवेली.
सदस्या मराठीचे शिलेदार समूह.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *