नवोदित सृजनशिलतेला न्याय देणारा समूह : डॉ. पद्मा जाधव वाखुरे

नवोदित सृजनशिलतेला न्याय देणारा समूह : डॉ. पद्मा जाधव वाखुरे

औरंगाबाद: मराठी भाषेची व्याप्ती ही अधिकाधिक समृद्ध व श्रीमंत होत आहे. त्यासाठी अविरतपणे समाजमाध्यम ते संस्था अशा साहित्यप्रवासातून मराठी भाषेचे संरक्षण, संवर्धन व सक्षमीकरण करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेचे कार्य असून, साहित्यक्षेत्रात पदार्पण करीत असलेल्या नवोदितांच्या शब्दरूपी सृजनशिलतेला न्याय देणारा एकमेव मराठीचे शिलेदार समूह असल्याचे गौरवोद्गार डॉ. पद्मा जाधव वाखुरे यांनी काढले. त्या बजाजनगर औरंगाबाद येथे आयोजित ‘काव्यसंवेदना’ विशेषांक लोकार्पण सोहळा व कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थावरून बोलत होत्या. त्या पुढे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्यात,’आपल्या चतुरस्र व अभ्यासू शैलीत मराठी कविता आणि शिलेदार समूह व राहूल दादांच्या कार्याचा उल्लेख शब्दोदित करण्यास शब्द अपुरे पडतील. या संस्थेच्या माध्यमातून भविष्यात अतिशय दर्जेदार लेखन करणारे कवी कवयित्री उदयास येतील असा विश्वास व्यक्त करत मौलिक असे मार्गदर्शन केले.

मसिआ हॉल मोरे चौक बजाजनगर, औरंगाबाद येथे बुधवार दि. २५ /११ /२०२० रोजी, मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या वतीने काढण्यात आलेल्या “काव्यसंवेदना” या दिवाळी अंकाचे प्रकाशन आणि छोटेखानी कवीसंमेलन थाटात पार पडले. प्रारंभी दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी औरंगाबाद च्या साहित्यिक डॉ पद्माताई जाधव वाखुरे आणि प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक श्री राहुल कोसंबी उपस्थित होते. तसेच बजाजनगर येथील प्रसिद्ध बालकवी गणेश घुले, गायक संगीतकार श्रीराम पोतदार, कथाकथनकार कवी लेखक गेनू शिंदे, मराठीचे शिलेदार संस्थेचे अध्यक्ष श्री राहुल पाटील, नागपूर तसेच काव्यसंवेदनाच्या मुख्य सहसंपादिका सविता पाटील ठाकरे, तरूण उद्योजक व कवी विजय शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांचे स्थानापन्न औक्षणाने झाल्यानंतर, सरस्वतीच्या प्रतिमाचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. मराठीचे शिलेदार संस्थेतर्फे सर्वांना शाल, दिवाळी अंक, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व साहित्यसंपदा भेट देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी प्रास्ताविकपर भाषणात संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची तपशीलवार माहिती देत संपूर्ण कार्यावर प्रकाश टाकला. मराठी भाषा सक्षमीकरण आणि संवर्धन हाच एकमेव ध्यास घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो कवी कवयित्रींना सोबत घेऊन गेल्या पाच वर्षांपासून हे कार्य सुरू असल्याचे आणि यापुढेही कायम सुरूच ठेवण्याचे सुतोवाच राहुल पाटील, नागपूर यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते ‘काव्यसंवेदना दिवाळी विशेषांक २०२०’ चे लोकार्पण करण्यात आले. तसेच सिलवासा दादरा नगर हवेली येथून आलेल्या सविता ठाकरे पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना, समूहातर्फे केल्या जाणाऱ्या कार्याचा आढावा घेत मराठी भाषेचे ऋण फेडण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून आमच्या शिलेदारांच्या लेखण्या याच कार्यासाठी सातत्याने समर्पित भावनेने लिखाण करणार असल्याचे सांगितले. तसेच ज्येष्ठ कवी विष्णू संकपाळ यांनीही मराठी भाषा सक्षमीकरण हा एक अखंड चालणारा यज्ञ असून त्यामध्ये आम्ही समस्त शिलेदार सातत्याने शब्द समिधा समर्पित करत राहू असा संकल्प व्यक्त केला. श्रीराम पोतदार यांनी पण संस्थेच्या कार्याची दखल घेत विशेष गौरवोद्गार काढले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहुल कोसंबी यांनी मराठी कविता आणि तिचा दोनशे वर्षापासूनचा संस्मरणीय प्रवास याबद्दल विश्लेषणात्मक भाष्य करताना उपस्थितांना खिळवून ठेवले. तसेच राहुल पाटील यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत मराठी कविता अधिकाधिक प्रगल्भ करण्याच्या दृष्टीने अजून व्यापक व नवोउपक्रम मराठी वाचकांसाठी द्यावेत असे सुचवले.

पाहुण्यांच्या मनोगतीय मार्गदर्शनानंतर नंतर महेश एलकुंचवार यांच्या खुमासदार सुत्रसंचलनात कवीसंमेलन पार पडले. या संमेलनात पवन किन्हेकर, दत्ता काजळे, मंगेश पैंजणे, नितीन तुपलोंढे, प्रकाश गोधणे, विजय शिर्के, विष्णू संकपाळ, सविता पाटील, प्राजक्ता खांडेकर, पद्माताई वाखुरे, अविनाश सोनटक्के, किरण निकम, शेळके, गणेश घुले, चक्रधर डाके, कवी किरण, धर्मेंद्र चौधरी, आशुतोष वाखुरे. आदी कवींनी काव्यसादरीकरण केले. नागपूरहून आलेल्या कवयित्री गीतकार आणि चित्रपट निर्मात्या प्राजक्ता खांडेकर व नागेश थोटे, लातूर यांचा संस्थेतर्फे शाल, सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी दिव्य मराठी वृत्तपत्राचे पत्रकार संतोष उगले, महेश एलकुंचवार, डॉ पद्मा जाधव यांच्या मातोश्री, भगिनी व सासूआई यांचा शाल व पुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व कवी कवयित्रींचा आणि प्रमुख आयोजक विष्णू संकपाळ, नितीन तुपलोंढे यांचा मान्यवरांच्या हस्ते संस्थेतर्फे विशेषांक व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत ठाकरे, सिलवासा दादरा नगर हवेली यांनी केले, तर प्रसिद्ध कवी गणेश घुले यांनी आपली ‘विधुर’ रचना सादर करून उपस्थितांचे आभार मानले. या लोकार्पण समारंभास व कवी संमेलनास बजाजनगर, वाळूज येथील काव्यरसिक व साहित्यप्रेमी प्रामुख्याने उपस्थित होते. संमेलनाच्या यशस्वितेसाठी आयोजक विजय शिर्के, विष्णू संकपाळ, नितीन तुपलोंढे व रांगोळीकार राजेंद्र वाळके, डॉ पद्मा जाधव यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य सौ.कौशल्याबाई वाखुरे (सासूबाई), श्रीमती छबुबाई जाधव (आई), सौ.मीरा दानवे (बहीण), सौ. कविता, जाधव (वहिनी), श्रीमती लता जाधव (वहिनी), कु. धनश्री जाधव (भाची), रवी वाखुरे (पुतण्या), दादाराव काटकर (विद्यार्थी), सिद्धार्थ खरात (विद्यार्थी), गणेश जाधव (फोटोग्राफर), अक्षय, तळेकर (फोटोग्राफर) या सर्व मित्र परीवारांनी अथक परीश्रम घेतले. शेवटी प्रितीभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.◼️

♾️♾️♾️♾️📚🌟📚♾️♾️♾️♾️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *