◼️ प्रासंगिक लेख :- विज्ञानाच्या भिंगातून ‘काकडारती’

 विज्ञानाच्या भिंगातून ‘काकडारती’

कृषक बांधव आपल्या नवान्न पौर्णिमेपासून काकड आरतीस प्रारंभ करीत असतात. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तीचा अखंड गजर सुरू असतो. तर काही ठिकाणी कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटेला काकडारती करण्याची पद्धत प्रचलित आहे. काकड आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला उठविण्यासाठी पहाटेच्या वेळी केली जाणारी आरती होय. यावेळी देवाच्या मूर्तीला काकड्याने म्हणजेच एक प्रकारच्या ज्योतीने ओंवाळण्यात येते. म्हणून तीला काकड आरती म्हणतात. ऐदी, आळशी व चैनीवृत्ती काकड्याच्या रुपाने जाळून स्वतःला नेहमी उत्साही व ताजातवाना ठेवण्यासाठी त्याची फार गरज आहे –
“सत्व रज तमात्मक काकडा केला |
भक्ति स्नेहे युक्त ज्ञानाग्नीवर चेतविला ।।”
भारतातील अनेक मंदिरांमध्ये पहाटे काकडारती केली जाते. महाराष्ट्रात बहुतांशी मंदिरातून नेहमी किंवा काही विशिष्ट कालावधीत विशेषतः कार्तिक महिन्यात ती करण्याची प्रथा आहे. त्या आरतीनंतर विविध भजने, अन्य आरती व स्तोत्रे म्हंटली जातात. भगवान श्रीकृष्णाच्या लिला वर्णन करणारी गीते व गौळणी म्हंटली जातात. त्यांत जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत रामदास स्वामी, संतश्रेष्ठ एकनाथ महाराज, संतशिरोमणी नामदेव महाराज, कर्मयोगी संत सावता महाराज, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदी संतमंडळी रचित काकड आरती, आरती आणि अभंगांचाही समावेश असतो.
वारकरी संप्रदायात काकडारतीला फार पूर्वीपासून महत्व प्राप्त झाले आहे. ग्रामीण व शहरी भागातील सर्वच मंदिरांमध्ये प्रभात समयी या आरत्यांचा मधुर स्वर निनादतांना दिसतो. एक महिनाभर किंवा शेवटचे पाचच दिवस चालणारा उत्सव निद्रिस्त देवादिकांना जागविण्यासाठी केला जातो, अशी देवभोळी समजूत आहे. देव कधीच झोपत नसतो. हे सर्व काही मानवालाच आवश्यक आहे –
“उठा उठा सकळीक, वाचे स्मरा गजमुख |
ऋद्धि सिद्धिचा नायक, स्नान करा गंगेचे ||”
एकेकाळी समस्त गावकरी, परिसरातील लोक एकत्रित जमून सामुहिकरित्या काकड आरती करीत असत. परंतु अलिकडच्या काळात तिच्यासाठी होणारी गर्दी ओसरू लागली आणि आरतीत येणाऱ्या तरुणांचीही संख्या रोडावली. आता केवळ गावातील ज्येष्ठ भाविक महिला व पुरूष मंदिरात गोळा होऊन काकडारती करतांना आढळतात. कारण ईश्वरभक्ती हा केवळ म्हाताऱ्यांचा विषय आहे, असा सर्वांचा गैरसमज आहे –
“भक्तिचिये पोटी बोध काकडा ज्योती |
पंच प्राण जीवे-भावे ओवाळू आरती ||”
गावागावांमध्ये मंदिरातील या आरतीसाठी टाळ, झांजा, मृदंग, चिपड्यांच्या तालावर भजने सादर होतात. आताही अनेक गावांमध्ये ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. भल्या पहाटेच्या समयाला घराघरांतील ज्येष्ठ भाविक उठून, स्नान आटोपून मंदिरात जमतात. पहाटेलाच लवकर उठता यावे, पहाटेची शुद्ध हवा मिळावी, आरोग्य सुदृढ रहावे, अशीही यामागील भन्नाट कल्पना असू शकते. त्यामागे आरोग्यविषयक भावना निश्चितच दडलेली आहे. परंतु बहुतांशी भाविक याकडे धार्मिक दृष्टिकोनातूनच बघतांना व विचारमंथन करताना दिसून येतात. मंदिरातील ही आरती आटोपल्यानंतर भाविकजन “जय जय राम कृष्ण हरी..” असा गजर करीत टाळमृदंगाच्या तालावर नगराला प्रदक्षिणा घालतात –
“राई रखुमाबाई दोन्ही उभ्या दो बाही |
मयुर पीस चामरे ढाळीती ठाईच्या ठाई ||”
चातुर्मासात भगवान विष्णू म्हणजेच विठ्ठल हे निद्रा घेत असतात. त्यांना प्रसन्न करून उठविण्यासाठी ही काकडारती परंपरा असल्याचे बोलले जाते. आरती दरम्यान तीन मंगलाचरण, काकडारतीचे अभंग, भूपाळीचे अभंग, पूजेची ओळ, सातवी मालिका, वासुदेव, आंधळा, पांगुळ, मुका, बहिरा, गौळणी आदींसह गणपतीची, भैरवनाथाची, विठ्ठलाची आरती करण्यात येते. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाते. पांडुरंगाष्टक, कालभैरवाष्टक झाल्यानंतर काकडारतीची समाप्ती होते. या अखंडपणे चालत आलेल्या उत्सवाची त्रिपुरारी पौर्णिमेला गोपाळकाला व महाप्रसादाचे आयोजन करून सांगता होत असते –
“घालिन लोटांगण, वंदिन चरण |
डोळ्यांनी पाहिन, रुप तुझे ||
प्रेमे आलिंगीन, आनंदे पूजिन |
भावे ओंवाळिन, म्हणे नामा ||”
वैज्ञानिक चष्म्यातून विचार केला तर शरद पौर्णिमा अर्थात शेतकरी बांधवांच्या नवान्न पौर्णिमेपासून थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात होत असते. ती वाढत जाऊन पुढे कडाक्याने अंगात हुडहुडी भरवत असते. पहाटेला पाण्यासारखा दव पडू लागतो. लवकर उठून कामाशी जुटण्यास आळस निर्माण होण्याची दाट शक्यता असते. भल्या पहाटेला लवकर उठण्याची व कामाला नेटण्याची सवय कायम रहावी आणि तोच उत्साह हिवाळाभरही टिकावा, अशी या काकड आरतीमागील शुद्ध सात्विक भावनाच दिसून येते –
“उठा उठा हो साधुसंत | साधा आपुलाले हित ||
गेला गेला हा नरदेह | मग कैचा भगवंत ||”
पहाटे लवकर उठण्याची ज्यांना हौस नाही, ते खरोखरच जीवनात आळशीवृत्तीचे निघाल्याची ओरड ऐकू येते. म्हणून सत्पुरुषांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देऊन ईश्वरभक्तीची त्याला शोभिवंत झालर लावली. भक्तीच्या नावाखाली सर्वसामान्य लोक ही चांगली आरोग्यदायी सवय अंगवळणी पाडू शकतात, हे त्यांनी अलबत ताडले. म्हणूनच काकडारतीची एक चांगली परंपरा कायम रूढ झाली. त्रिपुरारी पौर्णिमेनंतर खुप कडाक्याच्या थंडीला सुरुवात होते. हीच वेळ शेतकरी बांधवांच्या कृषीव्यवसायात सुवर्णमध्य साधत असते. म्हणून काकड आरतीकडे केवळ धार्मिक दृष्टीनेच न बघता वैज्ञानिक भिंगातूनही डोकावून पाहणे महत्त्वाचे आहे.

◼️ लेखक –

‘बापू’ – श्रीकृष्णदास निरंकारी.
(संत व लोक साहित्याचे गाढे अभ्यासक आणि शैक्षणिक विचारवंत)
मु. प.पू.गुरुदेव हरदेव कृपानिवास,
एकताचौक, रामनगर, गडचिरोली,
ता.जि.गडचिरोली (७७७५०४१०८६)
ई-मेल – krishnadas.nirankari@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *