◼️ काव्यरंग :- आई

कसे फेडू तुझे उपकार आई
जग दाखविले मोठी पुण्याई
जगातील सारी भलाई
एकवटली ग तुझ्या पायी

जात्यासोबत अतूट तुझं नातं
संस्कारसंचिताच आभाळच होतं
एकेक ओवी नीतीमत्तेची खाण
विशाल केली मूल्यांची जाण

आयुष्यभर राबराब राबली
जीवाची कधी पर्वा नाही केली
तुझ्या कष्टाला मोलंच नाही
उतराई होणे ऋणातून शक्य नाही

लागता ठेच लेकरांच्या पायी
वेदना तुझ्या हृदयाला होई
तू तर वस्तुपाठच संवेदनशीलतेचा
धडा गिरविलास आजन्म त्यागाचा

नव्हता थारा पुस्तकी ज्ञानाला
आपलंसं केलं जीवन शिक्षणाला
जन्मभर पुरल एवढी शिदोरी दिली
सुसंस्कारक्षम पिढी घडविली

मानापमान सारे सहज पचविले
सहनशीलतेचे महालच रचले
भावना साऱ्या ठेवल्यात दाबून
वेदनेची सल सदैव ठेवली झाकून

सर्वांना सुखी पाहण्यात असे रममाण
दुःखाच्या पदराला हास्याची कमान
तुझ्या थोरविला जगी तोड नाही
जन्म तुझ्या पोटी ही अगाध पुण्याई

घेईन जन्म तुझ्याच पोटी पुन्हा
सदैव राहील असाच प्रेमाचा पान्हा
धावा करते त्या कृपाळू विधत्याला
उदंड आयुष्य लाभो माझ्या माउलीला
उदंड आयुष्य लाभो माझ्या माउलीला


◼️डॉ. पद्मा जाधव-वाखुरे, औरंगाबाद
सदस्या, मराठीचे शिलेदार समूह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *