◼️ काव्यरंग : मुकी फुले ✍️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह

मराठीचे शिलेदार कविता, चारोळी समूहातील सर्व समूहात दि. ०२/१२/२०२० रोजी घेण्यात आलेल्या ‘बुधवारीय काव्यरत्न‘ स्पर्धेतील ‘मुकी फुले’ या विषयावरील सर्वोत्कृष्ट ३ काव्यरचना.

मुकी फुले

रंगबावरी फुले किती ती
वेलीवरती धुंद डोलती
मंद लहरी शीतल वारा
तालावर त्या झोके घेती !

माळा कुणी त्या सुंदर गजरा
खिळती त्यावर सर्व नजरा
कधी त्या सवे प्रीत बहरे
कधी होतसे मन बावरे !

पुष्पगुच्छ कधी देई शुभेच्छा
कधी विजयश्री देई सदिच्छा
कधी पायघड्या फुलवी मना
कधी वर्षाव तर कधी शुभकामना !

जरी जीवनाचा अस्तसमय
परी पुष्प पाकळ्या हव्या नित्य
सुख दु:खाचे साक्षीदार परी
निरोप मात्र देती अगत्य !

काट्याकुट्यांनी वेढले जरी
उधळण करती सुगंधाची
मुकी फुले ती जपणूक करती
त्याग,सेवा, सहनशीलतेची!

मानवानेही दु:ख सोसूनी
आनंद द्यावा इतरांना
अहंकार हा सोडून देऊन
जवळ करावे दु:खितांना!!

◼️सौ.सुनिता नाईक,पुणे
©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह…
🥀🌹🥀🌹🥀🌹🥀🌹🥀🌹🥀
मुकी फुले

मुकी फुले माझ्या प्रेमाची
ओंजळीत तु घेशील का ?
सहजीवनात तू माझ्या
जीवनसाथी बनून येशील का
अबोल माझी प्रीती शब्द
त्यांचा तू बनशील का

मुकी फुले माझ्या प्रेमाची
ओंजळीत तू घेतील का ?
जीवन रूपी या वेलीवरती
बहर प्रेमाचा आणशील का
आयुष्याचा सुखदुःखात
साथ मला तू देशील का

मुकी फुले माझ्या प्रेमची
ओंजळीत तू घेशील का ?
न बोलताच डोळ्यातील
भाव समजून घेशील का
हृदयातील श्वास माझा
तू कायम होशील का

मुकी फुले माझ्या प्रेमाची
ओंजळीत तू घेशील का ?
सहवास तुझा भावी
जीवनात देशील का
प्रेमाची फुलवीन बाग मी
त्यात तू राहशील का

मुकी फुले माझ्या प्रेमाची
ओंजळीत तू घेशील का ?
श्वास घेऊन त्या फुलांचा
उद्धार त्यांचा तू करशील का

विजय शिर्के , औ. बाद
© सदस्य मराठीचे शिलेदार समूह
🥀🌹🥀🌹🥀🌹🥀🌹🥀🌹🥀
मुकी फुलें

मुकी फुलें विविध रंगी
शोभून दिसती अंगणी,
बगीचा फुलतो मनातील माझ्या
असता त्यांच्या संगती..!

फुलें ही बोलती परस्परात
आले न्याहाळता ध्यानी,
आतुरता दिसली अंगी प्रत्येकी
समर्पित होण्या इशचरणी..!

पांढरा मोगरा बहरला खुशीत
सोमवार हा उजाडणार,
शुभ्र रंग हा शंकरास प्रिय
मग मलाच पिंडीवर वाहणार..!

जास्वंदात मात्र झाला वाद
मंगळवार गणेशाचा
लालच करिती अर्पण चरणी
तव दोष काय इतरांचा ..?

झेंडू मात्र जोमात होते
त्याला फिकीर ना दिनाची,
प्रत्येक वारी ,प्रत्येक देवास
तत्पर ते समर्पणासी..!

ऐटीत आला फुलांचा राजा
गुलाब डोलत डोलत,
नका रे भांडू ,मी असताना
तुम्हास नाही कोणी विचारत..!

न राहवता मीच बोलले
मानवापरी झाले हे वर्तन,
मला म्हणाले नाही ग वेडे
हे तर आमुचे मनोरंजन..!

मुकी फुलें नका समजू
आम्ही निर्सगाचे संदेशवाहक,
झिजूनी स्वतः मधूगंध देतो
गर्व करी मानव नाहक..!!

◼️सौ. संध्या मनोज पाटील अंकलेश्वर
© मराठीचे शिलेदार समूह सदस्या

मुख्य प्रशासक/संपादक
राहुल पाटील
७३८५३६३०८८
मुख्य परीक्षक/प्रशासक
सौ सविता पाटील ठाकरे
➖➖➖➖🍁🌿🍁➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *