◼️ काव्यरंग :- पुरुष विधूर होत नाहीत…

🔴पुरुष विधूर होत नाहीत…

कोंबडीपेक्षा कोंबडा
बकरी पेक्षा बोकड्या
आवडीने खाणारी
पुरुषी मानसिकता
आपली!

पुरुषच जातो
बाईच्या घरी पाहुणा होऊन
बाईला बघायला
बाईला कुठे जाता येते
पुरुषघरी पाहुणी होऊन
पुरुषाला बघायला
लग्नाआधी…

लग्न झालेल्या पुरुषांचे
कितीतरी असतात देव
लग्न न झालेल्या पुरुषांचाही
देव असतो म्हसोबा
पण नवरा मेलेल्या बाईसाठी
कुठलीच देवी
निर्माण झाली नाही
आजवर…

कपाळावर कुंकू
गळ्यात मंगळसूत्र
पायात जोडवे…
नवरा असल्याच्या
अशा कितीतरी खुणा
बाई मिरवते अंगावर
पुरुष मात्र बाळगत नाही
एक ही ओळख
बायको असल्याची

कुठल्याच खुणा नसतात
बायको मेलेल्या
पुरुषाच्या अंगावर
विधवा बाई मात्र
ओळखू येथे
हजारो बायांच्या गर्दीत!

नवरा मेला की
बाई विधवा होते
आपसूक
बायको मेली की
पुरुष विधूर होत नाहीत
अजूनतरी…


◼️✍️ गणेश कांता प्रल्हाद
बजाजनगर, औरंगाबाद
सदस्य मराठीचे शिलेदार समूह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *