◼️ प्रासंगिक लेख :- निरंकारी संतसमागम : एक कैवल्यानुभव !

निरंकारी संतसमागम : एक कैवल्यानुभव !

माणूस चांगल्या-वाईट, सत्यासत्य, गोडधोड चालीरितीवर भाळून त्यांचा गुलाम होतो. भौतिक सुख प्राप्तीसाठी त्याला जवळचा रस्ता म्हणजेच शॉर्टकट् हवा असतो. मग त्याला आत्मिक सुखासाठी नागमोडी वळणाचाच रस्ता का आवडावा? हे मात्र न उलगडणारे कोडे आहे! भौतिक सुखाची साधने तो पडेल ते मोल देऊन घेऊ इच्छितो. परंतु विनामूल्य मिळणारे आत्मिक सुख-शांती मिळविण्यास तो आढेवेढे घेत असतो. एकीकडे चार हजारात सोफा सेट मिळत आहे व दुसरीकडे संतसमागम आणि संतसान्निध्य (मोफत) मिळत आहे, असे कळल्यास सोफा सेट खरेदीसाठी लोकांची झुंबड उडेल. डोक्यावरील ओझे कमी करण्यापेक्षा ते वाढविण्यातच माणसाला जीवन सार्थकी लागल्याचे वाटत असते. म्हणून आधी मनाला लगाम घालावे, असे महान ग्रंथकार मुकुंदराज लिहतात –
“मनासवे धावू जाता । न तुटे संसार चिंता ।।
तेणेसी वेगळे होता । महासुख ।।”
आज संपूर्ण विश्वात संत निरंकारी विचार प्रवाहास भरती आली आहे. भारत देशासह जगातील तळागाळातील श्रीमंत-गरीब, अमिर-उमराव, उद्योगपती, कंपनीमालक, वैज्ञानिक, विचारवंत, तत्वज्ञ, संतमहंत सारेच याकडे आकर्षित होऊन ‘आपला जन्म सफल झाला!’ असा दावा करू लागले आहेत. हजार-दीड हजार लोकसंख्येने पार पडणाऱ्या कार्यक्रमात अनेक अप्रिय घटना जसे – दागिने ते चप्पल चोरी जाणे, बाचाबाची ते खूनखराबा होणे आदी घडतात. मात्र येथे करोडोच्या जनसंख्येत सर्वत्र आनंदी आनंद अनुभवायला मिळते. जगाच्या पाठीवर एवढा मोठा जनसमुदाय अर्थात संत मांदियाळी शोधूनही सापडणार नाही. खुप विस्तीर्ण अशा पटांगणात हे संतसमागम आयोजित करण्यात येतात. मैदान स्वच्छता, रस्ते भरणे, स्नानगृहे, शौचालये, सभामंडप, निवासी तंबू आदी उभारणे या कामी तीन ते चार महिन्यांपासून सेवादलाचे नौजवान बंधुभगिनी अथक परिश्रम घेतात, तेव्हाच हे भव्यदिव्य पटांगण सुसज्ज होत असते. अनिच्छेने किंवा मोठ्या अनास्थेने आलेली व्यक्ती या मैदानात उतरता क्षणीच मंत्रमुग्ध होऊन जाते. म्हणजे काय? मंत्र, तंत्र, जादूटोणा, भानामती वा इतर काही मांत्रीकांचे मंत्रप्रयोग तर केले जात नाही ना? अशी आपणास शंका येणे स्वाभाविक आहे. परंतु तसे येथे कहीच नसते. संतशिरोमणी निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराजांनी पटवून दिले आहे –
“सन्त वचन को मन से सुनना कर्म से सदा सुनाना हैं |
फूलों की मानिन्द महकना औरों को महकाना हैं |
रसना से बोले न बोले कर्म बोलता जिसका हैं |
कहे ‘हरदेव’ सभी पर होता असर जहाँ में उसका हैं |”
[ सम्पूर्ण हरदेव बाणी : पद क्र.१७४ ]
आपले मन येथील प्रत्येक दृश्यांशी एकरूप होऊन देहभान विसरते व आनंदाच्या तरंगांनी फुदकू लागते, नाचू लागते. सर्वत्र दिसणारे भक्तिमय वातावरण, निःस्वार्थ सेवा, सत्संग आणि नामस्मरण-नामाचा गजर हे सर्व दृश्य कसे जादुई भासू लागतात. स्वर्गातील देवलोक म्हटले जाते ते हेच तर नाही ना? वैकुंठातील समस्त सुखराशी यथेच्छपणे या निरंकारी संतसमागमात उपभोगावयास मिळत आहेत, असेच भक्त-महापुरुषांचे मत व्यक्त होतांना दिसतात. संतोक्तीही दिशा निर्देश करते –
“सत संग वो गंगा है, इस में जो नहाते हैं !
पापी से पापी भी, पावण हो जाते हैं !”
संतसमागम स्थळी अंतरा अंतरावर मोफत प्याऊ-पाणपोई, अनेक मध्यवर्ती ठिकाणी मोफत लंगर-भोजन मंडप, बंधुभगिनींसाठी वेगळाले मोफत अनेक स्नानगृहे, मुत्रीघरे व शौचालये उभारलेली असतात. चहा व नाश्त्याचे नानाविध कॅन्टीन्स् मंडळाचे बुकस्टॉल्स् आदी सुविधा वाजवी दरात उपलब्ध असतात. प्रत्येक ठिकाणी रांगेने शांतपणे हळुहळू सरकत लाभ घ्यावा लागतो. तेथे गडबड, घाई व गोंधळ होत नाही. कारण आपणच तेथे सावकाशपणे घेण्याची मनस्थिती तयार करून आलेले असता, हे सांगणे न लगेच! निरंकारी संतसमागम जगातील सर्व जाती-धर्मांच्या लोकांना विश्वबंधुत्व, विश्वशांती व मानवता धर्म प्रस्थापित करण्यास आमंत्रित करतो. मिशनचे महान ग्रंथकार अवतारसिंहजी महाराज हेच समजावतात –
“इक्को नूर हैं सभ दे अन्दर नर हैं चाहे नारी ए |
बाह्मण ख़तरी वैश हरिजन इक दी ख़लकत सारी ए |
देह सभनां दी इक्को जेही इक्को रब संवारी ए |
जात पात दे झगड़े काहदे काहदी लोकाचारी ए |
हिन्दु मुसलम सिख ईसाई इक्को रब दे बन्दे ने |
बन्दे समझ के प्यार हैं करना चंगे भावे मन्दे ने |”
[ सम्पूर्ण अवतार बाणी : पद क्र. ९ (ख) ]
मध्यभागी सत्संगमंडप अर्थात सभामंडप असते. तर सभोवताल राज्य व भाषापरत्वे निवासी तंबू उभारलेले असतात. त्यामुळे गैरसोय टळते. आपले भाषिक किवा राज्यातील लोक लवकर गवसतात. मनमोकळे राहता येते. आपल्या निवासव्यवस्था वा अडचणी आदींविषयी चौकशीसाठी जागोजागी चौकशी कार्यालय असतात. मैदानांतर्गत रस्तोरस्ती थोड्या थोड्या अंतरावर सेवादलचे जवान बंधुभगिनी भक्तांच्या सेवेत अहर्निश कष्टत असतात. उपरोक्त सर्वच सुखसुविधा शांत व सुरळीतपणे विनासायास आपणास मिळाव्यात म्हणून ते सतर्क असतात. देशी-विदेशी करोडपती हे सेवादार म्हणून गुरूने रूजू करून घ्यावे अशी मनोमन इच्छा बाळगून आहेत. तेथील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लाखो सेवादार निःस्वार्थ व अहंकारशून्य भावनेने प्रत्येक संतसमागमात राबत असतात. त्यांच्या अविश्रांत सेवेमुळेच येथील वातावरण स्वर्गीय सुखाचे भांडार उघडे असल्याचे प्रतित होते. मुख्यमंचकावर भक्तिगीते व विचार प्रकटण आलटून पालटून वेगवेगळ्या भाषिक भक्तांचे होत असतात. त्यामुळे श्रोतृवर्गाची उत्सुकता टिकवून धरली जाते. श्रवणाचा कंटाळा वाटत नाही. म्हणून श्रोते दहा-दहा तास बसून सत्संगात तल्लीन होऊन जातात. संतसमागम अनुभवने म्हणजेच मोक्ष, मुक्ती किंवा अढळस्थान याहूनही कितीतरी पटीने प्राप्त होणारे ब्रह्मानंद असते. त्याची सर कोणासही येऊच शकत नाही. संतसमागम एक कैवल्यानुभवच होय. येथेच संतसंग व गुरुदर्शनाचा अलभ्य लाभ प्राप्त होत असतो. ज्याने हा अनुभवला आहे, त्यास याची सांगता होऊच नये, असे वाटते. देह त्यागाची वेळ जरी आली तरी येथेच यावी, अशीही तो ईश्वराकडे प्रार्थना करीत असतो. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी हीच इच्छा व्यक्त करताना म्हणत –
“हेचि दान दे गा देवा । तुझा विसर न व्हावा ।।
न लगे मुक्ती धन संपदा । संत संग देई सदा ।।
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ।।”
निरंकारी संतसमागम हे विविध स्वरुपात वर्षभर चालत असतात. तालुका-जिल्हास्तरीय विशेष, विभागीय, प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संतसमागम आदी स्वरुपात आयोजन केले जाते. यंदाच्या जीवघेण्या वैश्विक कोरोना कहरामुळे सार्वत्रिक शासनाने जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे संतसमागमांचे आयोजन बंद पडले आहे. दरवर्षी दिल्ली येथे होणारे राष्ट्रीयस्वरुपाचे संतसमागम रद्द झाल्याची खंत भक्तांना वाटू नये. म्हणून यावर्षीचे ७३वे निरंकारी संतसमागम व्हर्च्युअल पद्धतीने घेतले जात आहे. त्याचे प्रसारण दि.५ ते ७ डिसेंबर २०२०पर्यंत होणार आहे. ते निरंकारी वेबसाइट व संस्कार टीव्ही चॅनलवर तिनही दिवस सायंकाळी ५ ते ९ यावेळेत पाहता येईल. सर्वांनी याचा लाभ घ्यावा व भक्तिरसात न्हाऊन निघावे हीच माफक अपेक्षा! प्रेमाने बोलुयाजी, धन निरंकारजी !!
!! ज्ञानवर्धक माहितीच्या संग, वाचा चंद्रपूर सप्तरंग !!

– दासानुदास –
‘बापू’ – श्रीकृष्णदास निरंकारी.
मु – प.पू.गुरुदेव हरदेव कृपानिवास,
रामनगर-२०, गडचिरोली,
पो.ता.जि. गडचिरोली.
फक्त मो.नं. ९४२३७१४८८३.
ई-मेल – krishnadas.nirankari@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *