◼️लेख :- मैत्री – नातं जगावेगळं

मैत्री – नातं जगावेगळं 💞

‘मैत्री’ एक असं नातं जे सुखातही अन् दुःखातही अभेद्यपणे टिकून राहतं. मैत्रीचं हे जगावेगळं नातं प्रत्येकाच्या जगण्याला समृध्द बनवतं. मैत्रीचं हे नातं जपणारा, टिकवणारा एक तरी मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच. कारण मैत्री शिवाय जगणं अपुरच.

एक तरी मित्र असावा
जिवापाड जपणारा,
आपल होऊन काळजाच्या
गाभाऱ्यात लपणारा

नसावा मित्र फक्त
पैशा – अडक्यावाला,
असावा फक्त प्रेमाचे
तराजू मापणारा…

मैत्री ‘गरीब-श्रीमंत’ ह्या गोष्टी मानत नाही. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी आपलेपणाने एकमेकांच्या सोबत उभं राहण म्हणजे मैत्री. मित्र कसा का असेना पण दुनियापेक्षा आपल्यासाठी तो जवळचा असतो. त्याच्याजवळच आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मोकळेपणाने बोलू शकतो. त्याच्यासोबत आपण जगण्याचा आनंद ही घेऊ शकतो तर कधी त्याच्याशी हक्कानं भांडू ही शकतो. कधी मित्र आपल्या आनंदाचं कारण बनतो तर कधी आपल्या दुःखाच्या आणि वाईट वेळेस आपला एक मजबूत आधार म्हणून उभा राहतो. मित्र आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक नवी दुनियादारी शिकवतो.
समोरच्याला आपल्या जिवापेक्षाही जास्त जीव लावणं म्हणजे मैत्री. एकमेकांच्या मनातलं न सांगताही ओळखता येणं म्हणजे मैत्री. जीवाला जीव देणारे मित्र हीच आपली खरी संपत्ती असते.
मैत्रीच्या नात्यातील निरागसता, निर्मळता, प्रेमळता आणि विश्वास ह्या गोष्टी मैत्रीच्या नात्याला आणखी मजबूत आणि अभेद्य बनवतात.
खरच, हे नातं जगावेगळ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *