◼️ काव्यरंग : योगायोग

योगायोग

कितीतरी वर्षांनी भेट झाली
तरी डोळ्यात तोच भाव आहे..
हा केवळ योगायोग की
नियतीचा नवा डाव आहे..

ढळली रम्य संध्याकाळ ती
उरला फक्त रातवा आहे
मिटून गेले चांदणे तरीही
मिणमिणता काजवा आहे..

वाटले आभासाचे खेळ सारे
पण स्पर्श कुठे नवा आहे
तीच आहे ओढ अजुनी
अन् तोच आजही दुवा आहे..

वेगळ्या झाल्या वाटा तुझ्या
वेगळे स्वप्नांचे गाव आहे..
जखम झाली किती जुनी
अजुनही ताजा घाव आहे..

भिरभिरते मन भवताली
पावलांची मागे धाव आहे
चोरलेले मन तुजकडेच
तरीही तूच साव आहे…

वाढत गेले अंतर किती
तरीही मनाचा ठाव आहे
पलटली पाने आयुष्याची
तेथेही तुझेच नाव आहे..!

◼️✍️ स्वाती मराडे, पुणे
©सहप्रशासक, मराठीचे शिलेदार समूह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *