सावित्रीबाई फुलेंची जयंती ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून होणार साजरी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

सावित्रीबाई फुलेंची जयंती ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून होणार साजरी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

देशभरात हा दिन साजरा केला जावा अशी मागणी केंद्राकडे करण्यात येणार

मुंबई : क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले यांचा जन्मदिन आता ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याला मंजुरी दिली आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ट्विटद्वारे दिली.

भुजबळम्हणाले, “महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले आहे. स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम फुले दाम्पत्यांने केले. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा जन्मदिन हा ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन स्वीकारत मागणीही मान्य केली.” त्याचबरोबर हा दिवस देशभरात ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा केला जावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) आरक्षण वाचविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने उच्च व सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ आणि अनुभवी विधिज्ञांची नेमणूक करण्याबाबत देखील निवेदन देउन त्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे भुजबळ यांनी सांगितले. यावर मागासवर्गीय किंवा इतर कोणत्याही प्रवर्गातील समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे आश्वासन देत सर्वोच्च व उच्च न्यायालयात निष्णांत वकिलांची नेमणूक करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मान्य केल्याचे भुजबळ यांनी सांगितले.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *