रस्ता
सारेच दुःख माझे सोसे हसून रस्ता
भारावल्या मनाने गेला दबून रस्ता
डोळ्यांत भावनांच्या कल्लोळ दाटलेला
सौख्यात आसवांच्या गेला धुऊन रस्ता
वाटेत छेडणारे होते कुणी मवाली
धाकात दुर्बलांच्या गेला भिऊन रस्ता
नसतोच धाक आता अश्रूस वेदनांचा
हळव्याच यातनांनी गेला थिजून रस्ता
रानात पाखरे ही फिरतात मुक्त येथे
विरहात रोज आता गेला रडून रस्ता
भय चेहऱ्यास नाही भीती मनास वाटे
का नेहमी भयाने गेला कण्हून रस्ता
बघतोस तूच `सागर’ त्यांचेच हे बहाणे
प्रेमात बंधनाच्या गेला खुलून रस्ता
◼️सागर प्रकाश
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर
ताळगाव गोवा (९०११०८२२९९)