◼️ प्रासंगिक लेख : संत गाडगेबाबा…आभाळाएवढी माणसं !


◼️आज संत गाडगेबाबा यांची 64 वी पुण्यतिथी…

🔴  आभाळाएवढी माणसं ! 🤷‍♂️

आज २० डिसेंबर संत गाडगेबाबांना इह लोकांतून जाऊन 64 वर्षे झाली बहुजनांच्यासाठी आपले उभे आयुष्य जगलेल्या नव्हे, आयुष्याची राखरांगोळी केलेल्या बहुजन संत आणि समाजसुधारकांना तमाम बहुजना़ंनी या जन्मात तरी विसरणे शक्य नाही आणि विसरूही नये. त्यापैकीच संत गाडगे महाराज आणि बाबासाहेब यांच्यातील ऋणानुबंध हा एक अद्वितीय असा अध्याय म्हणावा लागेल.
नियतीने ते ऋणानुबंध इतके घट्ट बांधले होते की, आठवणीतील काही प्रसंगांपैकी एक कायमच स्मरणात राहणारी घटना म्हणजे… तो एक ऐतिहासिक क्षण होय.
मुंबईच्या एका महाविद्यालयाच्या पटांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण चालू होते.लोक तल्लीन होऊन शांतपणे भाषण ऐकत होते. एवढ्यात खडखड करणाऱ्या गाडीचा आवाज आला. आवाज ऐकून बाबासाहेबांनी भाषण थांबवले. लोकांना कळेना त्यांनी भाषण का थांबवले ते. बाबासाहेबांनी अचूक हेरलं होतं कोण आलंय ते…
ते होते संत गाडगेबाबा.
गाडगेबाबांच्या हातात फुलांचा हार होता. ते मंचाजवळ आले आणि बाबासाहेबांना खाली येण्याची विनंती केली.
बाबासाहेब गाडगेबाबांना म्हणाले, बाबा तुम्ही वर या.
गाडगेबाबा म्हणाले,
साहेब तुम्ही खाली या.
बराच वेळ हे असंच चालू राहीलं. उपस्थितांना कळेना नेमकं चाललंय तरी काय?
सरतेशेवटी बाबासाहेबच स्वतः मंचावरून खाली आले. गाडगेबाबांनी बाबासाहेबांच्या गळ्यात हार घातला. दोन्ही महामानवांची गळाभेट झाली.
गाडगेबाबा म्हणाले,
बाबासाहेब, मंचावर येण्याइतका मी मोठा नाही.
हे शब्द मंचावर बसलेल्या लोकांनी ऐकले. गाडगेबाबा परतले. बाबासाहेब भाषणासाठी पुन्हा मंचावर येवु लागले आणि मंचावर बसलेले सगळे लोक हळूहळू खाली उतरू लागले.शेवटी बाबासाहेब एकटेच मंचावरुन भाषण देऊ लागले.
दुसरा एक प्रसंग कसा घडला…
डॉ.बाबासाहेब हे संत गाडगेबाबांचा प्रचंड आदर करीत असत. गाडगेबाबा तर बाबासाहेबांना मानसपुत्रच मानत.एक जण पुस्तक आणि अनुभव पंडित तर दुसरा नीतिशास्त्र प्रमाण मानून अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, परंपरेला फाट्याने मारणारा मानवतेचा विचार वाहक. त्यांच्यातील नातेसंबंध प्रचंड कारुण्याने ओतप्रोत भरलेले होते. १४ जुलै १९५१ साली गाडगेबाबांची प्रकृती अस्वस्थ असल्याची बातमी बाबासाहेबांना मिळाली. त्यावेळेस बाबासाहेब भारताचे कायदेमंत्री म्हणून कार्यरत असल्यामुळे आपल्या कामात अतिशय व्यस्त होते. सदर बातमी कळताच बाबासाहेब आपले सर्व कामकाज बाजूला ठेवून गाडगेबाबांच्या भेटीला रवाना झाले. जाताना त्यांनी २ घोंगड्या विकत घेतल्या. कोणाकडून कधीच काही न घेणाऱ्या गाडगेबाबांनी बाबासाहेबांकडून त्या २ घोंगड्या स्वीकारल्या. या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेनंतर दोघांनाही आपापल्या मनात एकमेकांप्रती असलेलं प्रेम अश्रुंवाटे मोकळं केलं…
आयुष्य भर समाज प्रबोधन करणारे संत गाडगेबाबा एके ठिकाणी किर्तनात दंग असताना त्यांना त्यांचा स्वत:च्या पोटचा मुलगा निवर्तल्याची टेलिग्राम मिळते तेव्हां महाराज क्षणभर डोळे मिटून स्तब्द होतात आणि पुढच्याच क्षणी ‘लाखो़नी मरतात रोज, तिथे एकासाठी काय रडावे’ गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ असे म्हणत किर्तन पुढे सुरु ठेवतात.
पोटचा मुलगा गेला असतानाही दु:ख का म्हणून करावे असे न डगमगता सांगत आपले किर्तन पुढे सुरू ठेवणारे बाबा त्यावेळी सर्वांना मनाने कठोर वाटणारे गाडगेबाबा दि.06. डिसेंबर 1956 ला बाबासाहेब आपल्याला सोडून गेल्याची बातमी कानावर येताच पटकन डोळे मिटून जमिनीवर बसतात आणि आज एक महावृक्ष कोसळलं म्हणून लहान मूल रडाव़ तसे धाय मोकलून हंबरडा फोडतात हे पृथ्वीवरील आजपर्यंत कुणालाही न सुटलेले कोडे आहे.
देव दगडात नसून तो माणसांत आहे असा वैज्ञानिक विचार समाजमनात रुजवत अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे समूळ नायनाट करण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या या थोर महामानवास आज त्यांच्या निर्वाणदिनी विनम्र अभिवादन…🙏🏽🌹

◼️ ✍️ विठ्ठलराव वठारे , उपाध्यक्ष
पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशन महाराष्ट्र

One Reply to “◼️ प्रासंगिक लेख : संत गाडगेबाबा…आभाळाएवढी माणसं !”

  1. आदरणीय विठ्ठल आवळेजी नमस्कार
    दादा, अतिशय कमी अवधीत साहित्य पाठवूनही प्रसिद्ध केलात त्याबद्दल धन्यवाद.
    माझ्या कडून करण्याजोगे काही सहकार्य असेल तर कळवावे.
    नुसती हाक द्या. साद सदैव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *