◼️ प्रासंगिक लेख : लोकशिक्षणाचे प्रभावी व्यासपीठ

संत गाडगेबाबा पुण्यतिथी सप्ताह विशेष

लोकशिक्षणाचे प्रभावी व्यासपीठ

संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती पूज्य गाडगे महाराजांत होत्या. जगद्गुरू संत तुकारामजीप्रमाणे ठणकावून सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते. समाजाचा अर्धा भाग स्त्रिया व अतिशूद्र आहेत. या सर्वांना व सुशिक्षित समाजातील जे येतील अशा स्त्रीपुरुषांना एकत्र बसविणे. म्हणजे ते भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता संपूर्ण बाजूस घालवत. हरिभक्तीचा रस चाखण्यास सर्व वर्गातील, सर्व थरातील बायाबापड्या, श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र होत. बाबांची कीर्तने ऐकल्यानंतर जगद्गुरू संत तुकारामजी महाराज व महात्मा जोतीबा फुलेजींची शिकवण जनमानसात रुजू लागली आहे, असे दिसते. संत गाडगेबाबा (२३ फेब्रुवारी १८७६ – २० डिसेंबर १९५६) म्हणून ओळखले जाणारे राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणीमान स्वीकारले होते. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. संत गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव पू.गाडगेबाबा हे होय.

संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी तर आईचे नाव सखुबाई होते. ते एक वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे हे संतामधील सुधारक आणि सुधारकांमधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे जनप्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा, रूढी, परंपरा यांवर ते कडाडून टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवण ते देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती. हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. “तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |” असे सांगत. दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत होते. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून वंचित घटकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव! या देवांतच ते अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, तर दुसर्‍या हातात मडके असे त्यांचे विचित्र रुप असे.
आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. “चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका.” असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानत. “मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही” असे ते सदा म्हणत. आपले विचार साध्याभोळ्या लोकांना समजण्यास ते ग्रामीण भाषेचा – प्रामुख्याने वऱ्हाडीचा उपयोग करत असत. पू.बाबांनी संत तुकारामजींच्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत.
संत गाडगे महाराज हे ईश्वर कशात आहे? ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलितांची ऐहिक व आध्यात्मिक प्रगती व्हावी म्हणून कष्टणारे होते. त्यांचे अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छतेचे उच्चाटन व्हावे, यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. बाबांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. तेथे ते घाम गाळू लागले. बालपणापासूनच त्यांना शेतीत रस होता. विशेषतः गुरांची निगराणी करायला त्यांना फार आवडे. बालपणीच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने त्यांना गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे, अशी कामे करावी लागली. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. त्यांचे लग्न अल्प वयातच झाले होते. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले होते.
त्यांनी आपल्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडधोड जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले-नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की बाबा स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे सर्वांनी एकवटून केली पाहिजेत, हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकर्‍यांना शिकविला. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावत. मदत करूनही फळाची अपेक्षा न ठेवता आल्या वाटेने निघून जावे, हा त्यांचा खाक्या होता. ते सतत एक खराटा जवळ बाळगत. त्यामुळेच लोक त्यांना खराटे महाराज वा गाडगेबाबा म्हणत. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यास त्यांनी स्वतः सतत सक्रिय राहून प्राणांतिक प्रयत्न केले. छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले. अतिशय गरीब, अनाथ, अपंग, कुष्ठरोगी लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था व सेवाही केली.
महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत “ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस।” असे म्हटले जाते. या भागवत धर्माच्या कळसावर संत गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली आहे. तसेच त्यांना महाराष्ट्रातील “समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ” असेही म्हटले जाते. लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जिल्ह्यात वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला!” या भजनाद्वारे गाईगुरे पालन करण्याची प्रेरणा देणारे व कर्मयोगावर दृढविश्वास सांगणारे ते महान सत्पुरुष आणि कर्ते समाजसुधारक होते. अमरावती विद्यापीठाला संतश्रेष्ठ गाडगेबाबांचे नाव देण्यात आले आहे. त्यांचा दशसूत्री संदेश – संत गाडगेबाबा प्रबोधन काव्य – (१) भुकेलेल्यांना अन्न, (२) तहानलेल्यांना पाणी, (३) उघड्यानागड्यांना वस्त्र, (४) गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत, (५) बेघरांना आसरा, (६) अंध, पंगू, रोगी यांना औषधोपचार, (७) बेरोजगारांना रोजगार, (८) पशु-पक्षी व मुक्या प्राण्यांना अभय, (९) गरीब तरुण-तरुणींचे लग्न आणि दुःखी व निराशांना हिंमत, (१०) गोरगरिबांना शिक्षण हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !! आचार्य अत्रे बाबांबद्दल म्हणतात, “सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात!” सन १९३१ साली वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली. सन १९५४ मध्ये त्यांनी मुंबईत जे.जे.हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी जवळच धर्मशाळा बांधली. बाबांनी डॉ.पंजाबराव देशमुख व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.भिमरावजी आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानत असत.
अशा कर्मयोगी संत गाडगेबाबांनी दि.२० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव जि.अमरावती येथे आपला पावन देह ठेवला. त्यांच्या पावन स्मृतींना कोटी कोटी दंडवत प्रणाम !

संग्राहक

🔴’कृगोनि’- श्री.कृ.गो.निकोडे गुरुजी.
मु. पिसेवडधा, पो. देलनवाडी, ता. आरमोरी, जि. गडचिरोली.
भ्र. ध्व. ७७७५०४१०८३.
इमेल – nikodekrishnakumar@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *