◼️ काव्यरंग : गावचं गावपण

   गावचं गावपण

जीर्ण झाल्या भिंती
भग्न झालेत वाडे
वडिलोपार्जित परोपकाराला
मज्जाव करती कवाडे

वैभव गुराढोरांचं
उरलं नाही खुंट्यावर
नंबरावर नंबर विकून
बरेच आले गुंठ्यावर

गावगुंडी राजकारण
शिरलं आता गावात
इमानच विकू लागलं
मातीमोल भावात

डावपेच रंगले आता
अस्सल कुटनीती
सर्वच जणू विसरून गेले
प्रेम आणि प्रीती

ढाब्यावरच रमू लागलं
भजन किर्तनातील मन
भूपाळ्या अभंग विरून गेले
हरवले सगळेच सण

पोथी पुराण ठेवले
गुंडाळून बासनात
अढी धरून धरून
कैक गेले मसनात

अनाठायी अट्टहास
राहू द्या ना काबूत
गावचं गावपण
पुन्हा एकदा शाबूत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *