खोपटा ते कोप्रोली चौक रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी !!

खोपटा ते कोप्रोली चौक रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी !!

मनसेचे सत्यवान भगत यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार !!!

उरण – रायगड जिल्हा: उरण तालुक्यातील खोपटे ते कोप्रोली गावांदरम्यान असलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले शिवाय रस्त्यात खूप मोठे खड्डे पडले असून हे खड्डे डांबरीकरण करण्याऐवजी खड्डे मातीने भरून बुजविले जात आहेत. त्यामुळे या गैरकारभारा विषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालूका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल यांच्याकडे तक्रार केली असून या कामाचे बिल थांबविण्यात यावे अशी मागणी केली आहे.

खोपटे गाव ते कोप्रोली गाव रस्त्यावर खड्यांच्या संदर्भात गेली 2 वर्षे त्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती निकृष्ट दर्जाची झाली आहे. ह्याच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी NHAI ने अंदाजे 30 ते 40 लाखाचा निधी पावसाळी पडलेले खड्डे आणि दुरुस्तीसाठी मंजूर करून ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी जे. ई. बांगर हे ठेकेदाराला पाठीशी घालून निकृष्ट दर्जाच्या कामांना सहकार्य करून जनतेच्या आणि शासनाच्या पैश्याची लूट करण्याचे काम करत आहेत. सदर रस्त्याचे नव्याने डांबरीकरण झाले तरी रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडणार आहेत. कारण ह्या रस्त्यात पडलेल्या खड्यात मातीचा भराव टाकून खड्डे बुजविण्यात आले आहेत. खड्ड्यात डांबर न टाकता केवळ खडी पसरवून नंतर माती वरवर डांबर टाकली जात आहे. त्यामुळे ह्या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडू लागले आहेत. सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेता निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करून अधिकारी जे.ई.बांगर आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करून कामाचे बिल त्वरित थांबविण्यात यावे अशी मागणी पत्रव्यवहारा द्वारे मनसेचे तालूका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *