◼️ प्रासंगिक लेख : शहीद बालवीर शिरीषकुमार जन्मदिन ◼️बालवीर शिरीषकुमार : नंदनगरीचा रोशनमिनार !

शहीद बालवीर शिरीषकुमार जन्मदिन

बालवीर शिरीषकुमार : नंदनगरीचा रोशनमिनार !

 

इ.स.१९४२ मध्ये महात्मा गांधींनी ब्रिटीशांविरूद्ध भारत छोडो आंदोलन सुरू केले. बालक शिरीषकुमार नंदुरबारमध्ये सरकारविरोधी आंदोलनात सहभागी झाले होते. मंगळ बाजार परिसरात पोलिसांनी बॅरिकेट्स लावले होते. त्यांनी हट्टी आंदोलकांवर लाठीचार्ज सुरू केला. शिरीषकुमार यांच्याकडे भारतीय राष्ट्रध्वज-तिरंगा लहरत होता. त्यांचा लाठीचार्ज मिरवणूक अडवू शकला नाही. तेव्हा त्यांनी गोळीबार केला. या घटनेत बालवीर शिरीषकुमार धारातीर्थी पडले. त्याचबरोबर त्यांचे मित्र धनसुखलाल वाणी, घनश्याम दास शहा, शशीधर केतकर आणि लालदास शहा यांनीही याच जागेवर भारतीय स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करले. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या धडाकेबाज हुतात्मा बालक शिरीषकुमारच्या हिंमतीला २८ डिसेंबर या त्यांच्या जन्मदिनी कोटी कोटी प्रणाम !
पाताळगंगा नदीच्या काठी चार डोंगराच्या कुशीत वसलेल्या नंदनगरी अर्थात नंदुरबार शहराची पूर्वापार ओळख ही व्यापाऱ्यांची वसाहत म्हणूनच कायम आहे. या गावात सन १९२६ मध्ये एका व्यापाऱ्याच्या घरात शिरीषकुमारांचा जन्म झाला. त्याच्यासह पाच संवगड्यांनी स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती दिली. त्यामुळे या गावाचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले. नंदुरबार हे आता कुठे अंदाजे एक लाख लोकसंख्येचे छोटेसे गाव आहे. परस्परांना ओळखणारे आणि स्नेह जाणणारे लोक आहेत. घराघरांतून चालणारा व्यापार आणि देवाणघेवाण हे महत्त्व जाणून पूर्वापार अनेक ज्येष्ठ प्रवाशांनी या गावाला भेटी दिल्या आहेत. प्रसिद्ध प्रवासी ट्‌वेनियरने सन १६६०ला श्रीमंत आणि समृद्धनगरी असे नंदुरबारचे वर्णन केले आहे, तर नंद नावाच्या गवळी राजाने हे गाव वसविल्याची आख्यायिका आहे. ऐन-ए-अकबरीमध्ये नंदुरबारचा उल्लेख ‘किल्ला असलेले आणि सुबक घरांचे शहर’ असा आहे.
नंदुरबारमध्ये बाळा शंकर इनामदार नावाचे एक व्यापारी होते. त्यांचा तेलाचा व्यापार होता. त्यांना मुलगा नसल्याने ते काहीसे दु:खी होते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी दुसरा विवाह केला. त्यांना कन्याप्राप्ती झाली. तीचे नाव सविता ठेवले. पुष्पेंद्र मेहता व सविता यांचा विवाह झाला. दि.२८ डिसेंबर १९२६ ला या मेहता दांपत्याच्या पोटी शिरीषकुमारचा जन्म झाला. या काळात देशातील अन्य गावे व शहरांप्रमाणेच नंदुरबारचेही वातावरण स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेने भारलेले होते. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सामान्यांनी काय करायचे? तर हाती तिरंगा झेंडा घेऊन प्रभातफेरी व मशाल मोर्चे काढायचे. देशप्रेमांनी ओतप्रोत घोषणा द्यायच्या! नंदुरबारमधील अशा कामात मेहता परिवाराचा सहभाग अग्रणी होता. शिरीषकुमार वयपरत्वे शाळेत जाऊ लागले होते. अशातच त्यांच्यावर महात्मा गांधी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मोठा प्रभाव होता. त्या काळात ‘वंदे मातरम्‌’ आणि ‘भारत माता की जय’ असा जयघोष करणाऱ्या कोणालाही पोलिस अटक करत होते.
महात्मा गांधींनी दि.९ ऑगस्ट १९४२ला इंग्रजांना ‘चले जाव’चा आदेश दिला. त्यानंतर गावोगावी प्रभात फेऱ्यांद्ववारे ब्रिटिशांना इशारे दिले जाऊ लागले. बरोबर महिनाभरानंतर दि.९ सप्टेंबर १९४२ला नंदुरबारमध्ये निघालेल्या प्रभात फेरीत आठवीत शिकत असलेले शिरीषकुमार सहभागी झाले होते. गुजराथी मातृभाषा असलेल्या शिरीषकुमारने प्रभात फेरीत घोषणा सुरू केल्या, “नहीं नमशे, नहीं नमशे..! निशाण भूमी भारतनु !!” भारत मातेचा जयघोष करीत ही फेरी गावातून फिरत होती. मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली. त्यावेळी या बालवीराच्या हातात झेंडा होता. पोलिसांनी ही मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले. या बालकांनी ते आवाहन झुगारले आणि “भारत माता की जयऽऽ! वंदे मातरम्‌ऽऽऽ!!” चा जयघोष सुरूच ठेवला. अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. एका पोलिस अधिकाऱ्याने मिरवणुकीत सहभागी मुलींच्या दिशेने बंदूक रोखली. तेव्हा त्या अधिकाऱ्याला एका चुणचुणीत मुलाने सुनावले, “गोळी मारायची असेल, तर मला मारा! भेकडांनो, मुलींना का धमकावता?” ती वीरश्री अंगात संचारलेला मुलगा होता, शिरीषकुमार मेहता! संतापलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या, एक.., दोन…, तीन गोळ्या शिरीषच्या छातीत घुसल्या आणि तो जागीच कोसळला. त्याच्यासोबत पोलिसांच्या गोळीबारात त्यांचे जिवलग मित्र लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशीधर केतकर, घनश्‍यामदास शहा हे चौघेही शहीद झाले.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या बाल हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांना त्यांच्या जन्मदिनी क्रांतीकारी सॅल्युट “जय हिंद, जय भारत !”
!! सत्याग्रह देशभक्तीचे रागरंग, मिळवा वाचत चंद्रपूर सप्तरंग !!

– संकलन –

श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
[भारतीय स्वातंत्र्यलढा व इतिहास अभ्यासक]
मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली, ता. जि. गडचिरोली.
फक्त व्हा.नं. ९४२३७१४८८३.
email – nikodekrishnakumar@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *