◼️ काव्यरंग : तिरस्कार

तिरस्कार

तिरस्काराचे अगणित वार
झेलत आलेय मी. .
तुझ्या पुरूषी अहंकाराला..
पेलत आलेय मी…
कधी शारीरिक व्यंगावर…
कधी कुरूप, काळ्या रंगावर..
घसरत आलाय तू…
अन् मी मात्र स्वतःला..
तुझ्यातल्या पुरूषासाठी…
पसरत आलेय आजवर…
माझे नसलेले वांझपण…
भोगत आलेय मी…
तुझे असलेले नपुसकत्व…
झाकत आलेय मी…
समाजाच्या तिरस्कृत नजरा..
सोसत आलेय मी…
केवळ कुंकवाचा धनी म्हणून…
तुला पोसत आलेय मी…
तुझ्या राकट पायातली…
वहाण होत आलेय मी…
माझे स्त्रीत्व असे तुझ्याकडे..
गहाण टाकत आलेय मी…
घरदार, नात्या गोत्यासाठी..
अहोरात खपत आलेय मी…
मात्र तुझा मतलबी माज…
अन् उंबरठ्याची लाज…
जपत आलेय मी…
विखारी नजरेच्या सूया…
टोचून घेत आलेय मी…
निखळ सौंदर्याला वासनेचे काटे…
बोचून घेत आलेय मी…
असा कित साहवा तिरस्कार…
अन् कोणता पहावा पुरस्कार..!
फक्त एक स्री म्हणून..
बरोबरीचा दे अधिकार..
बरोबरीचा दे अधिकार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *