वाढदिवशीच ‘क्रीडा जगत’चे’ प्रकाशन उत्साहात

वाढदिवशीच ‘क्रीडा जगत’चे’ प्रकाशन उत्साहात

नागपूर : ‘साहित्य सेवारत्न’ पुरस्कार प्राप्त संत्रानगरीचे वैभव असलेल्या डॉ. अनिल पावशेकर यांनी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून प्रकाशन समारंभ व वाढदिवस अशा संयुक्तीक सोहळ्याची मेजवानी देऊन आज नागपूरकरांना आश्चर्याचा धक्का दिला.

वयाच्या ५३ व्या वर्षात पदार्पण करतांना, सरत्या वर्षाला अतिशय आश्चर्यकारकरित्या निरोप देण्याची संकल्पना डॉ पावशेकर यांनी आपल्या ‘क्रीडा जगत’ या दुस-या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याने निरोप दिलाय. अविस्मरणीय असा ठेवा म्हणून या समारंभाचा उल्लेख करणे महत्वाचे वाटते. कोरोनाचे वर्ष म्हणून २०२० घोषित झाले असतांना संत्रानगरीतील वैद्यकीय क्षेत्रातील लेखक म्हणून सुप्रसिद्ध असलेले डॉ अनिल पावशेकर यांनी या वर्षी दर्जेदार असे दोन पुस्तके साहित्य क्षेत्रास दिले. सप्टेंबर २०२० ला प्रकाशित झालेले ‘अगं बाई अरेच्चा’ आणि आज प्रकाशित झालेले ‘क्रीडाजगत’ या दोन जुळ्या बाळाच्या साहित्य निर्मितीचे जनक डॉ. अनिल पावशेकर यांच्या अभ्यासू व्यक्तीमत्वाचा गौरव करावा तेवढा कमी आहे.

भारत देशाचे नाव ‘रोशन’ करणा-या क्रीडा क्षेत्रातील अधिकाधिक महिलांवर अभ्यासपूर्ण लेखमाला लिहून ते लेखसंग्रह ‘क्रीडाजगत’ या पुस्तकात समाविष्ट आहेत. आज संपन्न झालेल्या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षा म्हणून प्राचार्या सौ. नंदिनी पोजगे, प्रमुख अतिथी म्हणून सौ कविता पाटील, महामंत्री, भाजपा महिला आघाडी तर प्रमुख उद्घाटक म्हणून मराठीचे शिलेदार संस्थेच्या मुख्य सचिव ऐडव्होकेट पल्लवी पाटील उपस्थित होत्या. या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ अनिल पावशेकर लिखित ‘क्रीडाजगत’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी पावशेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना लेखन साहित्याचा प्रवास मांडला. व वाढदिवसाच्या दिवशी प्रकाशन करण्याची संकल्पना प्रत्यक्षात सफल झाल्याचे सांगितले. ज्येष्ठ लेखक नानाभाऊ पोजगे यांनी अगणित शुभेच्छा देत… अधिकाधिक दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी शुभेच्छा दिल्यात. मराठीचे शिलेदार संस्थेचे अध्यक्ष, संपादक, प्रकाशक राहुल पाटील यांनी डॉ पावशेकरांच्या लेखणीचा ‘अग्र’ अधिक धारदार होऊन साहित्याच्या सर्वांगास स्पर्शून सरस साहित्य निर्मिती करण्यासाठी प्रेरणादायी शुभेच्छा दिल्यात. डॉ प्रदीप पाटील यांनी डॉ अनिल पावशेकर यांच्या लेखणीचा उल्लेख त्यांची प्रेयसी म्हणून केला. कारण सुंदर प्रेयसीगत त्यांचे लिखाण असल्याचे डॉ प्रदीप पाटील म्हणाले. निवडक उपस्थितांच्या मनोगतानंतर विचारमंचावरील मान्यवरांचे मार्गदर्शनही उपस्थितांना झाले. प्रकाशन समारंभानंतर डॉ अनिल पावशेकर यांचा ५२ वा वाढदिवस त्यांच्या त्रिमुर्ती नगर नागपूर येथील निवसस्थानी केक कापून साजरा करण्यात आला. याप्रसंगी निवडक वैद्यकीय व साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *