स्वागत नववर्षाचे
स्वागतास नववर्षाच्या
रवीही सज्ज जाहला
गिरक्या घेत सभोवती
वाराही प्रसन्न वाहिला
ही धुंद पहाट मज
लडिवाळ साद घालते
दव भरून ओंजळीत
मी पानोपानी बोलते
सरूनी रात्र सावळी
ढळलेत मळभ सारे
सूर्यकिरण झेलण्या
आतुर झाले मनतारे
शोधेन पाऊलखुणा त्या
जिथे हारले अनेकदा
प्रयत्नांच्या पंखावरती
पुन्हा फिरेन मी एकदा
संघर्षाला येईल हिंमत
पदरी हवे ते दान पडेल
कर्तृत्वाच्या उंबरठ्यावर
ना पाऊल कधी अडेल
स्वप्नांशी नसे तडजोड
पंख बिनधास्त खुलवेन
मनासारखं जगत जगत
हास्य मनमुराद फुलवेन