◼️ प्रासंगिक लेख : जिजाऊ जन्मोत्सोवानिमित्त… आऊसाहेब पुन्हा जन्माला या..सविता पाटील ठाकरे सिलवासा, दीव,दमन व दादरा नगर हवेली

जिजाऊ जन्मोत्सोवानिमित्त…

आऊसाहेब पुन्हा जन्माला या…

 

स्वराज्याचा जिने घडविला विधाता
धन्य धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता

कुठे ती राजमाता अन् कुठे आम्ही?..
कालचाच प्रसंग.. अन्यायाविरूध्द लढणाऱ्या मुलाला आई म्हणत होती..”तू कोणाच्या भानगडीत का पडतोस?आपल्याला काय करायचे? स्वतःपुरताच विचार करणाऱ्या त्या आईवर मिही विचार करता करता कधी मी राजमाता जिजाऊंच्या चरित्रात शिरली माझे मलाही कळले नाही…

मला ती राजमाता आठवली..इ.स. १६३५ च्या आसपास अंधश्रध्देच्या कर्मठ विचारांवर वज्र प्रहार करून पुण्याच्या कथीत शापीत भूमीवर सोन्याचा फाळ असलेला नांगर चालविण्याची जबाबदारी जिनं स्वतःच्या पाच वर्षाच्या मुलावर सोपवली. तत्कालीन भटांचा थयथयाटही झाला..शिवाजी राजा मरेल अशी भितीही त्यांनी पेरली. पण अशा धमक्यांना पुरून उरणाऱ्या माझ्या आऊसाहेबांचे हे उद्गार “महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी निर्वंश झाले तरी चालेल, परंतु इथल्या गोरगरीब जनतेला कधीच उपाशी मरू देणार नाही.” आजही तमाम स्रीजातीसाठी खूप प्रेरणादायी आहे. मुलाला वंशाचा दिवा मानून मुलीची कळी गर्भातच खुडणाऱ्या तथाकथित सुशिक्षितांसाठीही चपराख आहे.

समतेचे,न्यायाचे,ममतेचे,स्वप्नवत स्वराज्य निर्माण करणाऱ्या या राजमातेठायी कमालीचे धैर्य,शौर्य,प्रचंड आत्मविश्वास,दुर्दम्य इच्छाशक्ती व गरीबांप्रती प्रचंड तळमळ ओतप्रोत भरली होती. जिजाऊ खरोखरच आदर्श माता होत्या.

जिच्या हाती पाळण्याची दोरी
ती जगाला उध्दारी

जिजाऊंनी शिवरायांना घडवितांना स्वराज्य स्थापनेचे बाळकडू पाजले. ‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे’ हा मूलमंत्र राजांमध्ये उतरवला. शिवरायांना नैतीकतेचे बळ दिले. ” शिवबा, या मुलूखाला,या स्वराज्याला तुमच्या नेतृत्वाची अन् कर्तृत्वाची गरज आहे.” हे महाराजांठायी रूजवले. निश्चयाचा महामेरू,बहुतजनांसी आधारू,अखंड स्थितीचा निर्धारू,श्रीमंतयोगी.. ही बीरूदं मोठ्या अभिमानानं राजांना मिळवून दिलीत.

‘झाले बहु,आहेतही बहु,परंतु या सम हाच!’ असा द्रष्टा युगपुरूष घडवण्यामागे जिजाऊ होत्या. त्याच जिजाऊंच्या आम्ही वंशज…आत्मकेंदी,स्वार्थी,केवळ मी व माझं कुटुंब इथपर्यंत आमची प्रगल्भता.सारं आयुष्य जिजाऊंनी उपेक्षित,वंचीत,शोषित जनतेचाच प्राधान्याने विचार केला. मला हे निश्चितच माहीत आहे..शिवरायांसारखे पराक्रमी,ध्येयवादी व मानवतावादी नेते उदयाला येतील पण त्या अगोदर जिजाऊंसारखी प्रयत्नवादी माता घरोघरी निर्माण झाली पाहीजे.

व्रत,वैकल्ये,पूजाअर्चा,याच्या विरोधात मी नाही,यश मिळविण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते,मग ती लेखणीची असो वा युध्दाची, चातुर्य पणाला लावावे लागते,दैववादापेक्षा प्रयत्नवादाला प्राधान्य द्यावे लागते. हा आमच्या आऊसाहेबांचा इतिहास आहे.

जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली तीनशे वर्षापूर्वी शिवरायांनी आपली अस्मिता आणि आत्मविश्वास परत मिळवून दिला..आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या अर्थाने संपूर्ण मानवजातीची एकात्मता साधनाऱ्या सहिष्णूतेचा संस्कृतीवरचा आपला विश्वास दृढ केला.तरी असता आजही आम्हां स्रीयांमध्ये नको असलेला दैववाद पहावयास मिळतो. आजची स्री आपल्या मुलाला नोकरी मिळावी,त्याला उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळावा,त्याचं लग्न व्हावं म्हणून यज्ञ,होमहवन,तीर्थयात्रा,उपासतापास,नारायण नागबली,नामस्मरण करतांना दिसते. पण आज खरी गरज आहे आऊसाहेबांचा प्रयत्नवाद आत्मसात करण्याची. आपली माता केवळ मायाळू नसून शक्तीस्थळ आहे ही भावना आपल्या मुलांमध्ये निर्माण करण्याचं शिवधनुष्य आम्हां मातांना पेलायचं आहे.

सासर अन् माहेर दोन्ही बाजू सांभाळतांना दमछाक होते आपली..माहीत आहे मला.याहीपेक्षा भयानक प्रसंगातून आऊसाहेबांनी स्वराज्यरक्षकाला जन्म दिला. माहेरचे जाधव व सासरचे भोसले या घराण्यांची सोयरीक जुळली खरी पण मने मात्र कधीच जुळली नाहीत. एका अकल्पित प्रसंगी तर दोघांमध्ये युध्दही जुंपले..एकीकडून भाऊ तर दुसरीकडून दीर मारला गेला. नात्यांच्या दुराव्यात माहेर पारखे झाले परंतु कधीच याचं दुःख न करत बसता स्वराज्यनिर्मितीचा ध्यास घेऊन अखंड सावधानता बाळगली.

‘स्री ही क्षणाची पत्नी तर अनंत काळाची माता असते.’ हे शब्द खरे करून त्यांनी शिवबांना घडवतांना त्यातूनच स्वतःचे कर्तृत्व सिध्द केले. कायम एकच विचार मनात ठेवला. हे राज्य आपले नाही,इथल्या भोळ्याभाबड्या कंगाल जनतेला गरज आहे कुणाच्यातरी नेतृत्वाची,”यांचा वाली तू हो शिवबा,तू मोठा हो व त्यांचा पालनकर्ता बन.” निस्पृह,निस्वार्थ वृत्ती ही मुळी भोसले घराण्याची ओळखच.

‘शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी’

आई जिजाऊंच्या उदरी जन्माला आलेल्या शिवरायांनी हे सार्थ ठरवले. मांसाहेबांमधली करारी वृत्ती व निपक्षपाती स्वभावाचा अंश आपसूकच शिवरायांमध्ये उतरला.

महाराष्ट्राची भूमी ही संतांची,विचारवंतांची आहे. जिजाऊंनी नेहमीच त्यांचा आदर केला. संत,महंत,विद्वानांचा परामर्श घेऊन वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन घेतले. पुण्यात राहण्यासाठी आल्यावर कसब्यात गणपतीची स्थापना केली. जोगेश्वरी,केदारेश्वर या मंदीरांचा जीर्णोद्धार केला. आई तुळजाभवानी नेहमीच शिवरायांचा प्रेरणास्रोत ठरली.

युगपुरूष घडविला जिने खास
राज्याचे उभारले तोरण
शिवनेरीच्या भूवरती सह्याद्रीच्या कुशीत
जन्मास आले नररत्न

आज आम्हां मातांना सुध्दा गरज आहे आपल्या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची. जी माणसे पायाने चालतात ती अंतर कापतात अन् जी माणसे डोक्याने चालतात ती ध्येय गाठतात. आम्हांला आपल्या मुलांना डोक्यानं चालवायला शिकवायचे आहे. मूठभर मावळ्यांच्या मदतीने जिजाऊंनी स्वराज्याचं तोरण बांधण्याची जबाबदारी शिवबांवर सोपवली. त्यामागे त्यांचा पुत्रावरील विश्वास व दृढ श्रध्दा होती. आई म्हणून त्यांच्यात नेहमीच पुत्रप्रेमाची आर्तता पहावयास मिळते. विलक्षण आवेश व दूरदृष्टी जिजाऊंमध्ये ओतप्रोत होती. बालवयातच त्यांनी स्वराज्यस्थापनेचं बीज शिवरायांच्या मनात पेरले होते. अन् आज आम्ही आमचे विचार मुलांवर लादतो हे चूकीचे आहे.

तसं पहाता जिजाऊ या लखोजी जाधवांच्या कन्यारत्न. पण तत्कालीन स्थितीत सुध्दा लखोजींनी आपल्या मुलांप्रमाणेच मुलीला सुध्दा राजनिती,युध्दनितीचे प्रशिक्षण दिले. त्यांनी राजघराण्याचा फक्त अभिमान न बाळगता सारं आयुष्य गोरगरीबांच्या कल्याणासाठी खर्च केले. बालवयात मिळवलेल्या युध्दकलेतील नैपुण्याचा उपयोग त्यांनी पुढे शिवरायांना घडवतांना केला. केवळ मुलगाच नाही तर नातू म्हणून संभाजी महाराजांमध्ये कमालीची मुत्सद्देगिरी भरण्याचं कार्य त्यांनी केले.

आज आपण ‘सिंहाच्या जबड्यात हात घालूनी मोजीन दात ही जात मराठ्यांची’ असं अभिमानाने म्हणतो,पण ही हिंमत संभाजी राजांमध्ये बालपणापासून जिजाऊंनी भरली होती हे लक्षात ठेवूनच आपण आपल्या कुटुंबात आत्मविश्वासाची बीजे कोणत्या वयात रूजवली पाहीजेत याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे.

आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत,महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला येण्याचं सद्भाग्य आम्हांला लाभलयं. पण आज आपण पहातो,मुलींमध्ये प्रचंड नैराश्य,न्यूनगंड व असुरक्षिततेची भावना आहे. कित्येक महिलांनी तर मर्यादेच्या नावाने स्वतःभोवती एक वर्तुळ आखून घेतले आहे ज्यातून त्या कधीच बाहेर पडत नाहीत. आज एकविसाव्या शतकात सुध्दा स्री ‘चूल व मूल’ यातच स्वतःला जखडून ठेवतांना स्वकेंद्रीत विचारांना जास्त प्राधान्य देतांना दिसतेय. उदात्त व व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून केवळ रयतेच्या स्थैर्यासाठी स्वराज्य स्थापनेचा जिजाऊ व शहाजी राजांचा उद्देश विसरत आहोत. आपले वतन किंवा जहांगिरी याचा स्वार्थी विचार न करता रयतेचे स्थैर्य व प्रजेला न्याय देण्याची त्यांची ध्येयनिष्ठा आज दुर्मीळ होत आहे.

जिजाऊंचा आणखी एक गुण मला खूप आवडतो तो म्हणजे त्यांचा प्रयत्नवाद. स्वराज्यनिर्मितीत व निर्मित स्वराज्यावर संकटांची अखंड मालिका सुरू असतांना जपमाळ करत न बसता घोड्यावर मांड टाकून स्वतः रणांगणावर जाणाऱ्या त्या रणरागिनी होत्या. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत असतांना महाराष्ट्राची इंचभर जमीनदेखील मिर्झा राजा जयसिंगला जिंकता आली नाही. कारण त्यावेळी स्वराज्याची सूत्रे आऊसाहेब मोठ्या हिमत्तीने सांभाळत होत्या. अन् आज आम्ही म्हणायला जिजाऊंच्या लेकी पण लहानसहान संकटांना घाबरून आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलतो. आत्महत्या हा पळकुटा विचार आहे आज आपल्याला खरी गरज आहे जिजाऊंच्या पुरोगामी विचारसरणीची. परखड पण ठाम समाजहित रक्षणाची.

माझी समस्त स्रीवर्गाला एकच विनंती आहे,’दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे खरे करून दाखवायचे असेल तर माझी मुले,माझे घर,माझे सगेसोयरे याच्या पलीकडे जाऊन सुसंस्कृत व पुरोगामी महाराष्ट्र घडवण्याचा निश्चय करूया. आपल्या आदर्श जिजामाता बुध्दीप्रामाण्यवादी होत्या. कठीण प्रसंगात पण हतबल,निराश न होता मोठ्या हिमतीनं संकटांचा सामना करणाऱ्या होत्या. त्यांच्या आदर्शांचा वसा आपल्याला चालवायचा आहे. अन् जर आपण यात यशस्वी झालो नाहीत तर नाईलाजानं म्हणावे लागेल,आऊसाहेब हरलो आम्ही,निष्फळ ठरलो आम्ही. आता एकच मार्ग आहे..”आऊसाहेब पुन्हा जन्माला या!..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *