◼️स्वामी विवेकानंद जन्मदिन : राष्ट्रीय युवा दिवस] भारतीय अध्यात्मविचारातून विश्वशांती ! ✍️श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.

[स्वामी विवेकानंद जन्मदिन : राष्ट्रीय युवा दिवस]

भारतीय अध्यात्मविचारातून विश्वशांती !

स्वामी विवेकानंद [१२ जानेवारी १८६३ – ४ जुलै १९०२] हे मूळचे बंगालचे रहिवासी असलेले भारतीय हिंदू विचारवंत होते. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि गुरुवर्य रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी ‘रामकृष्ण मिशन’ सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंदजींचा जन्मदिवस हा ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणून साजरा केला जातो. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर १२ ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा होत असतो. दरवर्षी यानिमित्ताने युवकांशी निगडीत विशिष्ट पैलूंवर चर्चा घडवून आणली जाते. यासाठी ‘शांती स्थापनेत युवकांचा सहभाग’ (युथ बिल्डींग पीस) हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे. सृजनशील अशा युवाशक्तीच्या माध्यमातून जगभरात शांततेची स्थापना व्हावी, हा त्या मागचा उद्देश आहे. संयुक्त राष्ट्रांनी सन १९८५मध्ये पहिले आंतरराष्ट्रीय युवा वर्ष साजरे केले. या घटनेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त सन १९९५मध्ये जगातील युवावर्गाच्या स्थितीत अनुकूल बदल घडवून आणण्यासाठी ‘वर्ल्ड प्रोग्राम ऑफ ॲक्शन फॉर युथ’ स्वीकारण्यात आले. त्या माध्यमातून मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली.
उत्तर कोलकत्तामधील सिमलापल्ली येथे दि.१२ जानेवारी १८६३ सोमवारी सकाळी ६-३३ वा. (पौष कृष्ण सप्तमी, मकरसंक्रांतीच्या दिवशी) स्वामी विवेकानंदजींचा जन्म झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात वकीलाचे अ‍ॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथांच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा अनमोल वाटा होता. नरेंद्रनाथांना दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुचीसह गतीही होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवतगीता आदि धार्मिक साहित्यात त्यांनी विशेष आवड दाखवली. त्यांना शास्त्रीय संगीताची देखील जाण होती. त्यांनी बेनी गुप्ता तथा अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच ते व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत. जुनाट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा आणि जातीवर आधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्याने लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते. सारासार विचार व व्यावहारिक दृष्टिकोन यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेकानंदजी हे मित्र परिवारात प्रिय होते. त्यांचे मित्र त्यांना ‘बिले’ नावाने हाक मारत तर त्यांचे गुरू ‘नरेन’ या शब्दाने. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इत्यादी छंद होते.
स्वामीजी हे एक द्रष्टे महापुरुष होते. धर्म हा भारतीय जीवनाचा मूलाधार आहे आणि विज्ञानयुगात होरपळणाऱ्या साऱ्या जगाला भारतातील अध्यात्मविचारामुळे शांती लाभणार आहे, अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांनी भारताला स्वतःच्या अस्मितेची जाणीव करून दिली आणि पाश्चात्य जगाला भारताचा परिचय करून दिला. धर्माबरोबरच शिक्षण, राजकारण, समाजकारण, स्त्रियांची उन्नती, जनसामान्यांचा विकास अशा अनेक विषयांवर त्यांनी मूलगामी विचार व्यक्त केले आहेत. जगामध्ये यानंतर श्रमिकांच्या सत्तेचा उदय होणार आहे, हे भविष्यदर्शी उद्‌गार त्यांनी इ.स.१८९८मध्ये काढले. दरिद्रीनारायण हा त्यांचा शब्द आहे. त्यांनी त्यागाला सेवेची जोड दिली आणि भारतात आजवर चालत आलेल्या संन्यासाच्या संकल्पनेत मूलभूत क्रांती केली. भारतातील अध्यात्म आणि पाश्चात्यांचे आधुनिक विज्ञान यांच्या समन्वयातून उद्याची आदर्श मानवसंस्कृती उदयाला येणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. बुद्धी व श्रद्धा, विचार आणि भावना, सामर्थ्य आणि करुणा, ऐहिक व आध्यात्मिक यांचा स्वामी विवेकानंदजीइतका उत्कृष्ट समन्वय दुसऱ्या कोणीही घातलेला नाही. भारताच्या आधुनिक युगाशी मेळ घालणारा व भविष्यातील समन्वयशील मानवसंस्कृतीची दिशा दाखवणारा असा श्रेष्ठ महापुरुष दुसरा दाखविता येत नाही. इ.स.१८९९च्या जूनमध्ये ते पुन्हा यूरोप व अमेरिकेत गेले आणि सन १९००च्या डिसेंबरमध्ये परत आले. दीड-दोन वर्षांपासून चाललेल्या अविश्रांत परिश्रमामुळे त्यांचे शरीर थकत आले होते. दि.४ जुलै १९०२ या दिवशी रात्री त्यांनी बेलूर मठात महासमाधी घेतली.
महाज्ञानी स्वामी विवेकानंदजींच्या अविस्मरणीय स्मृतींना चंद्रपूर सप्तरंग परिवारातर्फे साष्टांग प्रणाम !

– संकलन व शब्दांकन –
श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.
[सदस्य, विश्वबंधुत्व मिशन तथा मराठी साहित्यिक विदर्भ प्रदेश]
मु. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक,
रामनगर-२०, गडचिरोली
पो. ता. जि. गडचिरोली.
फक्त व्हा.नं. ९४२३७१४८८३.
email – krishnadas.nirankari@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *