◼️ काव्यरंग : पाऊल

🔴 पाऊल….

सगळं काही ठीक होईल म्हणायचं
आणि एक एक पाऊल पुढे टाकायचं…

उचलायची जळलेल्या वातीची राख
फुलवायची चितेखाली आयुष्याची बाग…
जमीन नसेल तर उकिरड्यातून उगवायचं
आणि एक एक पाऊल पुढे टाकायचं…

बंदिस्त विचारांना फुलपाखरू करून
बिनधास्त भरारी घ्यायची हिम्मत करून
आयुष्याच्या आकाशात मनसोक्त उडायचं
आणि एक एक पाऊल पुढे टाकायचं…

प्रत्येकच फुल सुगंध देईल असे नाही
प्रत्येकच काटा वेदना देईल असेही नाही
दुःख असो सुख असो हसतच झेलायचं
आणि एक एक पाऊल पुढे टाकायचं…

रक्त सांडवून झेंड्यांना रंग देऊ नका
माणसांनो माणसातून दुभंगू नका
धर्म….जात…पात मातीत पुरायचं
आणि एक एक पाऊल पुढे टाकायचं…

कितीही संकटे आली तरी डगमगायचे नाही
मैदान सोडून युद्धाचे मागे पळायचे नाही
अपयशाच्या मानगुटीवर एक दिवस बसायचं
आणि एक एक पाऊल पुढे टाकायचं…

सगळं काही ठीक होईल म्हणायचं
आणि एक एक पाऊल पुढे टाकायचं…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *