◼️ प्रासंगिक लेख : विश्वविख्यात भारतीय भौतिकीविज्ञ ! [होमी भाभा स्मृती दिन]

 

विश्वविख्यात भारतीय भौतिकीविज्ञ !

[होमी भाभा स्मृती दिन]


अणुऊर्जेच्या शांततामय उपयोगाचे पुरस्कर्ते, भारतातील अणुसंशोधन व अवकाश संशोधन कार्यक्रमाचे प्रमुख शिल्पकार होमी जहांगीर भाभा होते. त्यांचा जन्म मुंबई येथे सधन पारशी कुंटुंबात दि.३० ऑक्टोबर १९०९ रोजी झाला. त्यांचे शिक्षण मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेजात व इन्स्टिटयूट ऑफ सायन्समध्ये झाले. तत्पश्चात त्यांनी केब्रिंज येथील गॉनव्हिले अँड कायस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सन १९३०मध्ये ते मेकॅनिकल सायन्सेस ट्रायपॉस ही परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे दोन वर्षांच्या काळात त्यांना गणिताची राऊस बॉल प्रवासी शिष्यवृत्ती मिळाली होती. इ.स.१९३४मध्ये त्यांना केंब्रिज विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी मिळाली. त्यांना सैद्धांतिक विज्ञानाची विशेषतः गणिताची फार आवड होती. पी.ए.एम्. डिरॅक या सुप्रसिध्द गणितीय भौतिकीविज्ञांकडे त्यांनी गणिताचे अध्ययन केले. ते कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत सैद्धांतिक भौतिकीचे अध्ययन करीत असताना जे.डी.कॉक्रॉफ्ट, ई.टी.एस्.वॉल्टन, पी.एम्.एस्.ब्लॅकेट व जेम्स चॅडविक हे भौतिकीविज्ञ अणुकेंद्राच्या संरचनेवर महत्त्वाचे संशोधन करीत होते. भाभा यांनी झुरिक येथील डब्ल्यु.पाउली, उत्रेक्त नेदर्लंड्स येथील एच्.ए.क्रॅमर्स आणि रोम येथील एन्रीको फेर्मी यांच्या संशोधन केंद्रांना भेटी दिल्या होत्या. कोपनहेगन येथील नील्स बोर यांच्या संशोधनकेंद्रातसुद्धा त्यांनी संशोधन केले. अशा प्रकारे त्यांचा अनेक प्रसिद्ध भौतिकविज्ञांसोबत प्रत्यक्ष संबंध आलेला होता.
होमी भाभा यांचे पहिले संशोधन इलेक्ट्रॉन व पॉझिट्रॉन म्हणजेच इलेक्ट्रॉन इतकेच द्रव्यमान असलेला पण धन विद्युत भारयुक्त कण यांच्या परस्पर प्रकीर्णनाच्या काटच्छेदाच्या अर्थात या कणांचे एकमेकांवर आघात होऊन ते विखुरले जाण्याच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या लक्षणीय क्षेत्रफळाच्या गणनेसंबंधी असून हे प्रकीर्णन त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. डब्ल्यू हायलाइटर यांच्या बरोबर भाभा यांनी संशोधन करून विश्वकिरणांमध्ये – अवकाशातून सर्व दिशांनी पृथ्वीवर येणाऱ्या भेदक किरणांमध्ये जे द्वितीयक इलेक्ट्रॉन वर्षाव मिळतात. प्राथमिक विश्वकिरणांतील कणांचे वातावरणातील रेणूंवर आघात होऊन निर्माण होणारे इलेक्ट्रॉन वर्षाव मिळतात. त्यांचे ‘प्रपात प्रक्रिया’ या नावाने ओळखण्यात येणारे स्पष्टीकरण दिले. या मीमांसेप्रमाणे विश्वकिरणांतील उच्च ऊर्जायुक्त प्राथमिक कण (प्रोटॉन) पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो, तेव्हा त्याची वातावरणातील अणूंबरोबर विक्रिया होऊन शेवटी गॅमा किरण मिळतात. गॅमा किरणांचे योग्य परिसरात इलेक्ट्रॉन-पॉझिट्रॉन युग्मात परत रूपांतर होते. गॅमा किरणनिर्मिती व इलेक्ट्रॉन-पॉझिट्रॉन युग्मनिर्मिती या घटना पुनःपुन्हा एकामागून एक होत गेल्यामुळे इलेक्ट्रॉनांच्या संख्येत झपाटयाने वाढ होऊन म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळच्या भागात त्याचे वर्षावात रूपांतर होते. हा सिद्घांत ‘भाभा-हाइलाइटर सिद्धांत’ या नावाने प्रसिद्ध आहे. भाभा यांनी ’मेसॉन’ या मूलकणाचे अस्तित्त्व ओळखण्याच्या दृष्टीने विशेष कार्य केले आहे. भाभा यांनी केलेल्या कार्याला सर्वत्र मान्यता मिळाली आणि सन १९४१ साली त्यांची लंडनच्या रॉयल सोसायटीचे सभासद म्हणून निवड झाली.
इ.स.१९३९ मध्ये भाभा सुट्टीकरिता भारतात आले होते. परंतु त्यावेळेस दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाल्यामुळे ते भारतातच राहिले. तेव्हा त्यांनी बंगलोर येथील इंडियन इन्स्टिटट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत विश्वकिरण संशोधन विभागाचे प्रभारी प्रपाठक पद स्वीकारले. हा विभाग त्यांच्याकरिता सर दोराबजी टाटा विश्वस्त निधीतून निर्माण करण्यात आला होता. त्यानंतर तेथेच त्यांना प्राध्यापकपद मिळाले. इ.स.१९४५मध्ये भाभा यांच्या पुढाकाराने मुंबई येथे ‘टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे ते संचालक आणि सैद्धांतिक भौतिकी विषयाचे प्राध्यापक होते. भारत सरकारच्या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली. ऑगस्ट १९५४ मध्ये स्वतंत्र अणुऊर्जा खात्याची स्थापना करण्यात आली. या खात्याचे सचिवपद यांच्याकडेच होते. या खात्याचे तुर्भे – मुंबई येथील अणुसंशोधन केंद्र हे अणुसंशोधनाचे व विकासाचे प्रमुख केंद्र होते. तद्नंतर होमी भाभांच्या मार्गदर्शनाखाली तुर्भे येथे रशिया व्यतिरिक्त आशिया खंडातील पहिला अणुकेंद्रीय विक्रियक (अणुभट्टी) सुरू करण्यात आला. भारतामध्ये अवकाश संशोधन कार्यक्रम सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. अवकाश संशोधनासाठी इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या समितीची स्थापना झाली.
इ.स.१९४४ मध्ये म्हणजे हिरोशिमा शहरावरील अणुस्फोटाच्याही पूर्वी भाभा यांनी अणुऊर्जेचा वापर फक्त शांततामय उपयोगांकरिता व्हावा, असे विचार मांडले होते. अणुऊर्जा वीज निर्मितीकरिता यशस्वीपणे वापरता येईल, असे त्यांनी त्या वेळी लिहून ठेवले होते. जिनीव्हा येथे संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेल्या अणुऊर्जेच्या शांततामय उपयोगांवरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे भाभा अध्यक्ष होते. त्यावेळेस त्यांनी प्रतिपादन केले की, अणुकेंद्रीय संघटन विक्रियेच्या अर्थात हलक्या अणुकेंद्रांचा संयोग होण्याच्या विक्रियेच्या नियंत्रणाद्वारे मानवाला औद्योगिक उपयोगांकरिता अमर्यादित शक्ती उपलब्ध होऊ शकेल. अणुकेंद्रीय ऊर्जानिर्मितीवर आंतरराष्ट्रीय नियंत्रण असावे आणि सर्व राष्ट्रांनी अणुबाँब तयार न करण्याचे ठरवावे, असेही त्यांनी प्रतिपादन केले. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अँप्लाइड फिजिक्स या संस्थेचे अध्यक्ष आणि संयुक्त राष्ट्रे व इंटरनॅशनल अँटॉमिक एनर्जी एजन्सी यांच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे सभासद म्हणून भाभा यांनी काम केले. जुलै १९६५ पासून आजीवन ते भारत सरकारच्या मंत्रिमंडळाला सल्ला देणाऱ्या शास्त्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष होते. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी समितीचे अध्यक्ष पदसुद्धा त्यांच्याकडे होते. ते अनेक शास्त्रीय संस्थांचे सभासद होते.
भाभा यांना सन १९४२ मध्ये केंब्रिज विद्यापीठाचे अँडम्स पारितोषिक आणि सन १९४८ मध्ये केंब्रिज फिलॉसॉफिकल सोसायटीचे हॉपकिन्स पारितोषिक मिळाले. इ.स.१९५४ साली त्यांना पद्मभूषण हा बहुमान भारत सरकारतर्फे देण्यात आला. भारतीय व परदेशीय विद्यापीठांच्या अनेक सन्माननीय पदव्या त्यांना मिळाल्या. भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती.
होमी भाभा यांनी पुंज सिद्धांत व विश्वकिरण या विषयांवर अनेक संशोधनपर निबंध लिहिले. ऑक्टोबर १९३३ मध्ये त्यांचा पहिला वैज्ञानिक निबंध प्रकाशित झाला. त्यांच्या प्रकाशित झालेल्या निबंधांपैकी ५० निबंध उच्च ऊर्जा भौतिकीसंबंधी होते. भाभा हे एक उत्तम चित्रकार, संगीत, वास्तुशिल्प इ.कलांचेही ते चांगले जाणकार होते. दि.२४ जानेवारी १९६६ रोजी स्वित्झर्लंडमधील माँट ब्लाँक या उंच शिखरावर झालेल्या भयंकर विमान अपघातात त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ दि.१२ जानेवारी १९६७ रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते तुर्भे येथील अणुसंशोधन केंद्राचे ‘भाभा अणुसंशोधन केंद्र’ असे नामकरण करण्यात आले.
भाभांना व त्यांच्या संस्मरणीय संशोधन कार्यांना चंद्रपूर सप्तरंग परिवाराचे विनम्र अभिवादन !

– संकलन व शब्दांकन –

श्री कृ. गो. निकोडे गुरुजी.
मु. पिसेवडधा, पो. देलनवाडी,
तह. आरमोरी, जि. गडचिरोली.
मधुभाष – ७७७५०४१०८६.
email – krishnadas.nirankari@gmail.com

🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *