🔷 प्रासंगिक लेख : बुडत्या नावाचा नावाडी

🔷बुडत्या नावाचा नावाडी

कॉंग्रेस कार्यकारिणीची अत्यंत महत्वाची बैठक आज होत असून त्या आधीच कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंब बाहेरील व्यक्ती येऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे.विशेष म्हणजे या पदासाठी इच्छुकांची रस्सीखेच असल्याचे भासवत अशोक गेहलोत, मीराकुमार, सूशीलकुमार शिंदे ही नावे शर्यतीत असल्याची बातमी बाहेर सुटली आहे. त्यात अशोक गेहलोत हे आपल्या राज्यावरील पकड सोडायला तयार नाहीत असे ही म्हटले आहे. आणि तेही खरे आहे. कुठलाही लोकनेता राजकारणात आपली पकड सोडायला सहजासहजी तयार होत नाही. अशा वेळी निव्वळ जनाधार नसलेले पण हायकमांडची मेहेर नजर असलेले पुढारी, होय !* *आपल्या हुकमी हक्काचा जनाधार असलेल्या व्यक्तीला ‘लोकनेता’ आणि खांद्यावर पक्षप्रमुखांचा हात असलेल्या व्यक्तीला पुढारी म्हणायला हरकत नाही*.
*त्यानुसार गांधी कुटुंबाकडून काॅंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.याचा अर्थ काय समजायचे ?*
*काॅंग्रेस संपली असे म्हणणारे संपून जातील पण काॅंग्रेस संपणार नाही. हे वाक्य निष्ठावंत(?) कार्यकर्त्यांसमोर बोलून टाळ्या मिळविण्यापर्यंत ठीक आहे.परंतु वस्तुस्थिती आज तरी काॅंग्रेस संपली अशीच आहे.एके काळी म्हणण्यापेक्षा अगदी कालपर्यंत गांधी घराण्याचा करिष्मा होता.म्हणून तर राजीव गांधींच्या हत्येनंतर संपलेल्या, ढासळलेल्या काॅंग्रेसचा डोलारा सांभाळून सोनिया गांधींनी काॅंग्रेसमध्ये अक्षरश: जान आणली. नव्हे, मृतवत कॉंग्रेस पक्षाला दहा वर्षे सत्ताही मिळवून दिली.परंतु लाचार,कर्तृत्वहीन आणि केवळ भाटगिरी करणा-यांचे नेतृत्व कुणालाही कधीही अधिक काळपर्यंत करता येत नाही. आता काही केल्या काॅंग्रेस उभारी घेणं अशक्य आहे ही गोष्ट गांधी कुटुंबातील चाणाक्ष माय-लेकाने हेरूनच नेतृत्व नाकारलेले असणार. काॅंग्रेस ज्या ज्या वेळी संकटात असते तेव्हां दलित आणि अल्पसंख्याकांचे कार्ड खेळते हा आजवरचा इतिहास आहे.आणि या गोष्टींवर संतुष्ट होऊन तर दलित आणि मुस्लिम पुढारी,(नेते नव्हे !) कु-हाडीचे दांडे होऊन बहुजन समाजाच्या महावृक्षाचे फांद्या छाटायच्या कामात त्यांच्या मदतीला येतात.त्यांच्या झोळीत मोठमोठी पदं टाकली जातात पण पाॅवरचे काय ? पॉवर शून्य(0). धोरणात्मक निर्णय घेण्याच्या कामात त्यांना कधीही सामावून घेतले जात नाही.केवळ मोठमोठे पद आणि माया जमविण्याच्या कामात अडथळा निर्माण न होण्यालाच हे अल्पसंतुष्ट पुढारी पाॅवर समजून त्यांची चाकरी करायला लागतात.*
*भाजप हा जातीयवादी पक्ष आहे या एकाच भीतीचा गोळा दाखवून वर्षानुवर्षे दलित आणि मुस्लिमांना दावणीला बांधण्यात काॅंग्रेस यशस्वी होत आली आहे.तसा इतिहासच तपासायचा झाला तर खरा जातीयवादी पक्ष काॅंग्रेसच आहे.तसे नसते तर अख्या जगाने बुद्धीवंत म्हणून गौरविलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना काॅंग्रेसने निवडणुकीत दोन वेळा पराभूत केलेच नसते. अशारितीने डॉ.आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देणा-या पुढा-यांची किमान भूक ओळखून काॅंग्रेसने त्यांना सतत प्रसिद्धीच्या झोतात ठेवायची काळजी घेतली आहे.*
*बहुजनातील शिक्षीतांनी मनुवाद जोपासायला व त्यांच्या हां ला हां मिळवून लाचारी पत्करायला भाग पाडणा-या पक्षप्रमुखांच्या पायात लोळण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत होऊन राहणे केव्हांही योग्यच. डॉ बाबासाहेब आंबेडकर दोन वेळा लोकसभा निवडणुकीला उभे राहीले आणि दोन्हीही वेळा कॉंग्रेस कडून पराजित झाले .
थोडासा विचार करा जगजीवनराम आठ वेळा लोकसभेला उभे राहिले आणि आठही वेळेस निवडून आले.इतकेच काय कायम मंत्रीमंडळात राहिले.दोघेही दलित बहुजनांचे नेते.पण आज उपेक्षित,वंचित,भटके,दलित आणि बहुजनांसाठी प्रेरणा स्थान म्हणून डॉ.आंबेडकरांना मानले जाते जगजीवनराम यांना नाही. आंबेडकरवाद लाचारी शिकवत नाही म्हणून हारूनही बाबासाहेब घरा घरात विराजमान आहेत. जगजीवनरामांचा एक साधा फोटोही कॉंग्रेस कार्यालयात लागत नाही. इतकंच काय निवडून येणार नाही हे ढळढळीत सत्य असतानाही उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत उमेदवारी देऊन शिंदेंची नाचक्की करण्यात आली.आणि निवडून येण्याची पक्की शास्वती असतांना मात्र त्यांना उमेदवारी दिली नाही.याचा अर्थ काय ? शिंदे हे लोकमानसातले नेते नाहीत.ते हायकमांडने सोयीनुसार वापरायचे दलित कार्ड आहेत हे वेळोवेळी समोर आले आहे.अशा काॅंग्रेसची नाव आता बुडायला लागली आहे.नावाडी गांधी घराण्यातील नको आहे. यात एका दगडात दोन पक्षी मारण्याचे कारस्थान आहे. कर्मधर्मसंयोगाने काॅंग्रेस तरलीच तर गांधी घराण्याचे मार्गदर्शन होतेच असे म्हणायचे.बुडालीच तर एका दलित अध्यक्षाच्या काळात बुडाली असा इतिहास मागे ठेवायचा. म्हणून शिंदेंना बुडत्या नौकेचा नावाडी म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

🔷 ✍️ विठ्ठलराव वठारे
उपाध्यक्ष
पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशन, महाराष्ट्र

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *