◼️ [गुरुपुष्यामृत योग विशेष] : शक्ती व मुक्तीची ओढ : गुरुपुष्यामृत योग !

शक्ती व मुक्तीची ओढ : गुरुपुष्यामृत योग !

[गुरुपुष्यामृत योग विशेष]

आज गुरुवार दि.२८ जानेवारी २०२१ ला गुरुपुष्यामृत योग आहे. त्या निमित्ताने त्याचे महत्त्व विशद करणारा हा विशेष लेख सविनय सादर…
गुरुपुष्यामृत योग हे आपण दिनदर्शिकेमध्ये नेहमीच बघतो. पण आपल्याला माहीत असतेच असे नाही. तो योग काय आहे? काय असते या दिवशी? तर आज आपण या गुरुपुष्यामृत योगाचे थोडक्यात महत्व जाणून घेणार आहोत. गुरुपुष्यामृत योग वर्षभरात फार कमी वेळा येतो. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरुपुष्यामृत योग्य असतो. हा शुभ दिवस मानल्या जातो. या नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा संबोधल्या जाते. या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे. या दिवशी कुठलेही काम केल्यास सफलता प्राप्त होते. या दिवशी माता लक्ष्मीची व कुलदैवतांची पूजा केली जाते. तर आध्यात्मिक क्षेत्रात गुरुपूजा व गुरुवचनामृत प्राशन केले जाते. अर्थात गुरुवचनाचे काटेकोरपणे पालन करणे महत्त्वाचे ठरते. सर्वसामान्य मनुष्य देखील या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो. गुरु हा ग्रहगोलांचा तर सद्गुरु हा संतकुळीचा राजा असतो. भौतिक सुखाची कामना लोक नऊ माया व पंच महाभुतांकडे करतात. तर ईश्वरभक्त-संत हे शाश्वत सुखाची कामना सद्गुरुकडे करतात. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात –
“गुरु हा संतकुळीचा राजा । गुरु हा प्राण विसावा माझा ।।
गुरु मोठा देव दुजा । पाहता नाही त्रिलोकी ।।”
अभाविकांसाठी गुरु म्हणजे मोठा तर भाविकांसाठी गुरु हा तमाकडून तेजाकडे नेणारा असतो. गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे तेज, असा गुरुचा गर्भित पण खरा अर्थ आहे. पुष्य नक्षत्र म्हणजे काय? तर पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा आणि ऊर्जा देणारा. कदाचित पुष्य हे एखाद्या फुलाचा वाईट प्रकार असू शकतो. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे होते. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख व संपदा देणारा. या नक्षत्रात तीन तारका बाणाप्रमाणे दिसून येतात. या बाणाचा वरचा टोक म्हणजे वरचा तारा हा पुष्य क्रांतीवर पडतो. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगळदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हटले आहे. अध्यात्म ज्ञान यास नऊ मायांचे जाळे संबोधते. संतशिरोमणी शहंशहा अवतारसिंहजी महाराज स्पष्ट करतात –
“एह नवं चींजा दृष्टमान नें जिसनूं कहंदे माया ए ।
दसवां ब्रह्म इन्हा तों न्यारा एहनां विच समाया ए ।।”
[सम्पुर्ण अवतार बाणी : पद क्र.१०]
या गुरुपुष्यामृत योगामध्ये केलेले पूजा, जप, तप, ध्यान, दान, धर्म, कर्म, विचार आदी फार मोठे फळ देणारे असतात. जर आपणास नेहमी कुठल्याही कार्यात अपयश येत असेल, जसे की नौकरी, व्यवसाय, घरातील काही कार्य, काही बंद झालेले कार्य सुरु करायचे असेल तर आपणास गुरुपुष्यामृत योग हा लाभदायक ठरू शकतो. संतांना कार्य साधणे वा बिघडणे तसेच बरा वा वाईट असा काहीच खोडा जाणवत नाही. ते सदैव गुरुचरणाशी लिन होऊन समाधानी जीवन जगतात. गुरुपुष्यामृत योग अथवा सद्गुरुशी भेट होणे हा योग फार कमी वेळा येतो. कारण की जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा हा योग बनत असतो. तर शिष्यांच्या घरी गुरुचरण पडले असता त्यांना तो क्षण सर्वात महायोग वाटतो. या शुभ मुहूर्तावर सांसारिक लोक सोने-चांदी खरेदी, नवीन घर, घराचे बांधकाम, वाहन घेणे हे कार्य करत असतात. गुरुवारी कुठलेही शुभ कार्य करणे फार चांगले असते. तर गुरुकृपेने सर्व दिवस शुभच ठरत असतात. संतश्रेष्ठ हरदेवसिंहजी महाराजांनी पटवून दिले आहे –
“कहे ‘हरदेव’ ज्ञान उजाला सन्तजनों के पास रहा ।
कण कण में देखा ईश्वर को और सदा विश्वास रहा ।।”
[सम्पुर्ण हरदेव बाणी : पद क्र.२१७]
आपल्याला कुठल्याही कार्यात यश मिळू शकते, सहसा अपयशाचा सामना करावा लागणार नाही. जेव्हा गुरुवार व पुष्य नक्षत्र एकत्र येतात, तेव्हा अत्यंत शुभ फल देणारा अमृत योग तयार होतो. तर सद्गगुरुच्या सानिध्यात शिष्य येतो तेव्हा ब्रह्मयोग निर्माण होतो. आपण या दिवसाचा वा संतसंगाचा फायदा व परमानंद घेऊ शकतो.
एखादी व्यक्ती साधक असेल तर तीच्याकरीता देखील हा चांगला दिवस असतो. सद्गुरुचा आशीर्वाद तथा ईश्वराची कृपादृष्टी प्राप्त करण्याचा व त्यांना प्रसन्न करण्याचा हा दिवस आहे. ज्यांना या गुरुपुष्यामृत योगबद्दल माहिती आहे, असे जाणकार या दिवशी माता महालक्ष्मीची साधना करतात. संतमायबाप मोक्ष व जीवनमुक्ती दात्या परमगुरु-परमात्म्याच्या नामस्मरणात आकंठ डुंबून राहतात. या योग सामर्थ्यामुळे बळ, बुद्धी व यश वृद्धिंगत होतात. नेहमीच अपयशी होणारी व्यक्ती असेल तर काही उपाय करून गुरुपुष्यामृत योगात ही अडचण दूर सारू शकते किंवा थेट सद्गुरुला अनन्यभावे शरण गेल्यास मनःशांती लाभून ती व्यक्ती आजीवन ब्रह्मानंदी नाचू लागते. कारण संतशिरोमणी कबीर महाराजांनी समज दिली –
“नव दरवाजे खुल्लम खुला । दसवे को तो ताला हैं ।।
हाथ पकड़ कर गुरुजी बतावें । खुला ब्रह्म का ताला हैं ।।”
!! हा गुरुपुष्यामृत योग नरजन्म उद्धारक ‘सद्गुरुवचनामृत’ या महायोगात परावर्तित करो !!

– संतचरणरज –

श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.
[विश्वबंधुत्व मिशनचे सदस्य व मराठी साहित्यिक]
मु. रामनगर वॉर्ड क्र.२०, गडचिरोली, पो. ता. जि. गडचिरोली. फक्त व्हा.नं. ९४२३७१४८८३.
इमेल – krishnadas.nirankari@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *