◼️लेख : हरिप्रिया तुळशी

◼️ हरिप्रिया तुळशी

दिसायला मी इवलीशी
महती असे माझी खूप
पहा औषधी तत्वसत्व
नका पाहू सौंदर्य रूप

सखी म्हणून की माय तू !….तुळशी माझ्या अंगणातली जशी दुधावरची साय तू !….. मला कळायला लागल्यापासुन मला तुझ्या संगतीचा लळाच लागलाय……बघ तुळशी षोडश वयात मनात असलेले पहिले प्रेम मी तुझ्याजवळच व्यक्त केलं होतं…..आठवतं का तुला? लाजेनं किती मी चूर झाले होते……..पुढे लग्नही झाले.तुझी माझी ताटातूट होईल या विरहानंच माझ्या डोळ्यातून अश्रू गळत होते. सासरी जाताना तुझ्या गळ्यात पडून रडावसं वाटलं मला खूप!
पाच परतवणीनं परत आले नि काय!!…..बंगल्याच्या गेटजवळच तुझ्या मंजुळांच्या मंद सुगंधाने नासिकाग्रांना मोहून टाकले आणि माझी पावले तुजजवळ थबकली. मंजुळा आपल्या सुगंधाने जणू उल्लासित करत होत्या. सुंदर रंगीबेरंगी तुळशीवृंदावन आणि काळसर हिरव्या रंगाचे तुझे रोपटे पाहून मनातून खुशी वाटली. आणि………….
तुळशीच कानाशी हितगुज करू लागली, “अगं माझ्यामुळेच या घराला, अंगणाला आणि परिसराला पावित्र्य मिळते ना ! दुसऱ्या कोणत्याही सुंदर फुलांच्या, फळांच्या रोपट्याला ,झाडाला नाही मिळत!….. आमचे महत्त्व विठ्ठलाच्या चरणापाशी जाताच कळते. विठुरायाला आम्ही फार आवडतो. त्यामुळेच आम्हाला हरिप्रिया नाव मिळालेले आहे .वारकरी आमची माळ गळ्यात घालतात. स्त्रिया आम्हांला डोईवर घेऊन पंढरीची वारी करतात. आरोग्यदृष्ट्या आम्ही महान आहोतच. खोकला, सर्दी, ताप या आजारावर तसेच त्वचा रोग,दंतरोगावरील रामबाण औषधी आहोत. शुभ प्रसंगी आमच्या पानांने जल शिंपडून पावित्र्य निर्माण केले जाते……
आमच्या मंजिऱ्या पाण्यात टाकून पिल्यास पोटाचे विकार ,उष्णता दाह कमी होतो. कीड कृमींपासून मुक्ती मिळते. आमच्या वासाने ते दुर पळतात. पहाटेला सुवासिनी तुळशीवृंदावनाजवळ सडा-रांगोळी घालून आमची पूजा करतात……….. आम्ही इतरांप्रमाणे ओबडधोबड नाही तर नाजूक पाने आणि इवल्या मंजुळांनी बनलो आहोत. परंतु आजीच्या बटव्यातील काढ्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. सासुरवाशीणीची सखी म्हणून आम्हाला गणले जाते. सासरी होणारा त्रास जाच ती आमच्याजवळ बोलून,आपली आसवे ढाळून मोकळी होते. मन हलकं करते…… माहेरची आठवण, आईचे प्रेम मलाच सांगते. ती दुःखाचा कड सोसत माझ्यापाशी टेकते. अंगणात तुळशीचे रोपटे नाही असे नसतेच. आमची पाने पाण्यात टाकून स्नान केल्यास गंगास्नान केल्याचे पुण्य मिळते. आमच्याजवळ प्राणवायूचा प्रचंड साठा आहे. त्यामुळे तुमचा श्वास सुलभ होतो….. अशी ही तुळशी उपयोगीच नव्हे तर एक सखी म्हणून मला फार जवळची वाटते आणि तिच्या सहवासात मी माझे दुःख विसरते.
इतकंच नाही तर मला बाळाची चाहूल लागली तशी मी धावतच तुळशीपाशी गेले ना! आईला माझे गुज सांगावे तसे तुळशीलाच सांगितले.माझ्या गालावर फुललेली लाली पाहून तिने देखील आपली पाने फडफडली अन् मंजुळांचा डोईवर अभिषेकच केला…….
संध्याकाळी कितीतरी वेळ मी तिच्याजवळ बसुन राहिले……ती जणू मायेची सावलीच देत राहिली नि मला चिडवत राहिली. बाळ घेऊन आले तेव्हा बाळालाही तुझ्या चरणी आधी ठेवले होते मी !!!…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *