◼️ प्रासंगिक लेख : आत्मनिर्भरतेचा अखंड झुळझुळणारा झरा ! [पू.बाबा आमटे पुण्यस्मरण दिन

आत्मनिर्भरतेचा अखंड झुळझुळणारा झरा !

[पू.बाबा आमटे पुण्यस्मरण दिन]

कर्मयोगी संतश्रेष्ठ पूज्य बाबा आमटे हे एक मराठी समाजसेवक होते. महाराष्ट्रात आदिवासी बहुल क्षेत्रातील रुग्णांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे ‘लोकबिरादरी’ नावाचा आश्रम सुरू केला. ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटत. याशिवाय वन्यजीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पू.बाबा आमटे यांना ‘अत्याधुनिक भारताचे कर्मयोगी संत’ या नावाने गौरवले जाते. इ.स.१९४९ सालामध्ये त्यांनी महारोगी सेवा समिती स्थापन केली. याशिवाय कुष्ठरोग्यांसाठी काही संस्था स्थापन केल्या – चंद्रपूर जिल्ह्यात आनंदवन-वरोरा, सोमनाथ प्रकल्प-मूल, नागपूरमध्ये अशोकवन, गडचिरोलीत लोकबिरादरी प्रकल्प-हेमलकसा आदी. पू.बाबांनी आनंदवनाच्या मूळच्या खडकाळ जमिनीत शेतीविषयक विविध प्रयोग केले. ते राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते होते. इ.स.१९८५ साली शंभर दिवसांच्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. मेधा पाटकर यांच्यासोबत ते नर्मदा बचाव आंदोलनातही सक्रिय होते. सामाजिक व पर्यावरण क्षेत्रांत त्यांनी भरीव कार्य केले आहे. त्यांचे पुत्र डॉ.प्रकाश आमटे व डॉ.विकास आमटे हे त्यांचे कार्य पुढे नेत आहेत.
पूज्य बाबांनी लिहिलेली पुस्तके : ज्वाला आणि फुले-कवितासंग्रह, उज्ज्वल उद्यासाठी-काव्य, माती जागवील त्याला मत, इत्यादी. त्यांना प्राप्त झालेले पुरस्कार : आंतरराष्ट्रीय – सामाजिक सुधारणांसाठीचा डॉ.आंबेडकर, रॅमन मॅगसेसे, डेमियन डट्टन-अमेरिका, कुष्ठरोगी-सेवेबद्दल -अत्युच्च, संयुक्त राष्ट्रे-मानवी हक्क, जिराफे-अमेरिका, टेंपल्टन बहुमान-अमेरिका मानवतावादी कार्यासाठी, पर्यावरण विषयक कामासाठी संयुक्त राष्ट्रे-रोल ऑफ ऑनर, पर्यावरणासंबंधीचा ग्लोबल ५००, पावलोस मार ग्रेगोरियस, राईट लाइव्हलीहुड-स्वीडन -पर्यायी नोबल, नर्मदा बचाव आंदोलनासाठी मेधा पाटकर यांच्यासोबत संयुक्तपणे, आदींचा समावेश आहे. राष्ट्रीय पुरस्कार : पद्मश्री, पद्मविभूषण, अपंग कल्याण, महाराष्ट्र-सावित्रीबाई फुले, गांधी शांतता, महाराष्ट्रभूषण, मध्यप्रदेश-इंदिरा गांधी, प्रथम जी.डी.बिर्ला, महाराष्ट्र-दलित मित्र, राष्ट्रीय भूषण, जमनालाल बजाज, एन.डी.दिवाण, राजा राम मोहनराय, भरतवास, जी.डी.बिर्ला अंतरराष्ट्रीय, महाराष्ट्र-आदिवासी सेवक, कुमार गंधर्व, जस्टिस के.एस.हेगडे-कर्नाटक, डी.लिट-नागपूर विद्यापीठ, डी.लिट-पुणे विद्यापीठ, देशिकोत्तम सन्मानीय डॉक्टरेट-विश्वभारती, शांतिनिकेतन-पश्चिम बंगाल आदींचा समावेश आहे.
पू.बाबा आमटेंचे पूर्ण नाव मुरलीधर देविदास आमटे होते. त्यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील जमीनदार कुटुंबात दि.२६ डिसेंबर १९१४ रोजी झाला. वरोड्यापासून पाच मैलांवरील गोरजे गावाची जमीनदारी आमटे घराण्याकडे होती. घरच्या सुबत्तेमुळे त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांना रेसर कार चालवण्याची व वृत्तपत्रांतून चित्रपट परीक्षणे लिहिण्याची आवड होती. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. त्यांनी येथील विद्यापीठातून बीए व एलएलबी या पदव्या संपादन केल्या. आपण स्वतः डॉक्टर बनावे, असे बाबांचे विचार होते. परंतु वडिलांच्या आग्रहास्तव ते वकील झाले. यानंतर त्यांनी काही काळ वकिलीही केली. इ.स.१९४९-५० या कालावधीत त्यांनी पं.जवाहरलाल नेहरूंच्या शिफारसीमुळे फक्त डॉक्टरांना करता येणारा कुष्ठरोग निदान व चिकित्सेवरील अभ्यासक्रम पूर्ण केला. गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्र्य प्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. इ.स.१९४३मध्ये वंदेमातरम्‌ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ‘भारत जोडो’ अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्‍न केला. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप-१२ वर्षे नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते.
असाध्य गोष्टींना स्वतःहून सामोरे जाण्याच्या आव्हानात्मक वृत्तीमुळे कुष्ठरोगासारख्या महाभयंकर रोगाने ग्रस्त झालेल्यांची सेवा करण्याचे अतिकठीण व्रत त्यांनी स्वीकारले. कुष्ठरोग्याचे आयुष्य हे मरणापेक्षा भयाण आणि कबरीपेक्षा भयंकर असे. कुष्ठरोग्याची शुश्रूषाच करायची नव्हे, तर त्याला आत्मनिर्भर करण्याची अखंड तपस्या बाबांनी केली. महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी त्या कार्याचा विस्तार केला. कोणत्याही व्यक्तीकडे समानतेने पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनामुळे आश्रमात आज सर्व धर्मांचे, सर्व थरांतील लोक आहेत. केवळ कुष्ठरोगीच नव्हे तर अंध, मूकबधिर यांकरिता विशेष शाळाही तेथे आहेत. कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन याकरिता त्यांनी रुग्णालयाची व अन्य प्रकल्पांची स्थापना केली. त्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी महाविद्यालयाचीही स्थापना केली. प्रौढ व अपंगांसाठी हातमाग, सुतारकाम, लोहारकाम असे व्यवसाय प्रशिक्षण सुरू करून त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. शेती व त्या अनुषंगाने येणारे दुग्धशाळा, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन आदि कुटिरोद्योगही सुरू करून दिले. अशोकवन-नागपूर व सोमनाथ-मूल या ठिकाणीही उपचार व पुनर्वसन केंद्रे स्थापन केली. येथे घनदाट जंगल, दळणवळण-संपर्काची साधने नाहीत, प्रचंड पाऊस, पावसात मार्गच अडवून टाकणारे नद्या-नाले, जंगली श्वापदांचा सुळसुळाट, अन्न-वस्त्र-निवार्‍याची कमतरता, काही वेळा शासनाचा असहकार, स्थानिकांचे अज्ञान, अंधश्रद्धा अशी प्रतिकूल परिस्थिती असूनही प्रचंड जिद्दीने पू.बाबांनी आपली कामे पूर्णत्वास नेली. भामरागड तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. गेल्या बर्‍याच वर्षांपासून या प्रकल्पाची जबाबदारी बाबांचे सुपुत्र डॉ.प्रकाश आमटे व स्नुषा डॉ.मंदाकिनी आमटे समर्थपणे सांभाळत आहेत. या प्रकल्पांतर्गत स्थानिकांना माहीत नसलेल्या शेतीच्या नवीन पद्धती शिकविल्या जातात. तसेच विद्यार्थ्यांना शाळा, ज्येष्ठ नागरिकांना उत्तरायण ही निवासी संस्था व वन्यप्राण्यांच्या रक्षणार्थ अनाथालय असे विविध उपक्रमही तेथे यशस्वीपणे चालू आहेत. डॉ.आमटे दाम्पत्य गरजूंना अथकपणे आरोग्य सुविधा पुरवीत आहेत. हे कार्य बाबांच्या प्रेरणेतूनच सुरू आहे.
एकदा रविंद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन आश्रमास बाबा आमट्यांनी भेट दिली. शांतिनिकेतनाच्या या भेटीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पुढे महात्मा गांधी यांच्या संपर्कात आल्यावर गांधींजींच्या सत्य, नीति व निर्भयतेवर आधारलेल्या विचारसरणीने प्रभावित होऊन दीनदलितांच्या सेवेसाठी काम करण्याचे त्यांनी ठरवले. गांधींजींनी त्यांना अभय साधक अशी पदवी दिली होती. गांधीप्रभावापूर्वी ते क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचेही सहकारी होते. आपल्यातील संवेदनशीलता, प्रखर बुद्धिमता, धाडस, प्रचंड कष्ट करण्याची शारीरिक व मानसिक तयारी, कामाचा झपाटा, ठरवले ते साध्य करण्याची निश्‍चयी वृत्ती, संघटन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य आणि प्रेरणासातत्य या सर्व गुणांच्या आधारे बाबांनी आपले सर्व प्रकल्प यशस्वी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली आमटे परिवार कार्यरत होताच, पण त्यांच्या कार्यामुळे अनेक क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ऊर्जा मिळाली. ते आनंदवनात मित्रमेळ्याचे आयोजन करत असत. या मेळ्यांना अनेक कलाकारांसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित रहात असत. यातूनच असंख्य कार्यकर्ते घडून कामांना दिशा मिळाली. रुग्णांची सेवा करण्याची प्रेरणा सर्वांत पेरून पू.बाबा आमटेंनी दि.९ फेब्रुवारी २००८ रोजी वरोडा येथील निवासस्थानी रक्ताच्या कर्करोगाने आपल्या पावन देहाचा त्याग केला.
!! पावन पुण्यस्मरण निमित्त चंद्रपूर सप्तरंग परिवारातर्फे त्यांना व त्यांच्या सेवा-शुश्रूषेला विनम्र अभिवादन !!

– संकलन व शब्दबद्ध –

श्री कृष्णकुमार जी. निकोडे गुरुजी.
(मराठी-हिंदी साहित्यिक तथा संत-लोक साहित्याचे गाढे अभ्यासक.)
मु. पॉवर स्टेशनच्या मागे, रामनगर
वॉर्ड नं.२०, गडचिरोली, पो. ता. जि. गडचिरोली.
फक्त व्हा.नं – ७४१४९८३३३९.
इमेल – nikodekrishnakumar@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *