◼️ आध्यात्मिक लेख : पराधीन आहे जगती

पराधीन आहे जगती

तुजं मागतो मी आता, मागतो आता” रस्त्यावरून जाणाऱ्या पालखी जवळच्या रिक्षातील स्पीकरवरून या आळवणीच्या ओळी कानावर पडल्या आणि टाळ लेझीम कुटत, कपाळी काळा बुक्का, गळ्यात तुळशीची माळ घातलेले पांढऱ्या कपड्यातील वारकरी “जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल” म्हणत जवळून पुढे गेले आणि माझा हात माझ्याही नकळतपणे पालखीतल्या त्या विठ्ठलाला जोडला गेला. आज कसली तरी एकादशी असावी. त्यामुळे भगवी पताका खांद्यावर वागवत वारकऱ्यांचा समूह रस्त्यावरून पालखी घेऊन पायी पायी जात होता….
मनात आले, “संसार आणि परमार्थाचा मेळ साधत रस्त्यावरून विठ्ठलनामाचा गजर करत जाणारे हे वारकरी महान श्रेष्ठ, की रोज लोकलच्या हँडलला पकडून लोंबकळत मस्टरवरची सही चुकू नये म्हणून धडपडत पळणारे आम्ही चाकरमानी श्रेष्ठ……. कुणाची पुण्याई जास्त? त्यांची की आमची? खरेच! दीड वीतीच्या पोटासाठी पळापळ करणारे आम्ही चाकरमानी आणि डोळ्याला झापड बांधून एकाच रेषेत पळणारा टांग्याचा घोडा यात फारच साम्य आहे. घोड्याला चाबकाची भीती आणि आम्हाला नोकरी गमावण्याची…….
दिवसेंदिवस मानवीजीवन धकाधकीचे होऊ लागले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतची धावपळ करायची. पोटाची खळगी भरायची! ना आराम,ना मुखात हरिनाम…. नाही जीवाला चैन आणि सुखाची झोप! का करतो आहोत आपण एवढी धावपळ? त्यातून साध्य काय? या प्रश्नाचे उत्तरही ठाऊक नाही….. तो पळतो म्हणून मी पळतो….. जीवनभर स्पर्धा चालू आहे. आयुष्यात थोडा उशीर झाला तर नोकरी सुटेल. बॉसची बोलणी खावी लागतील…….. आपली नोकरी सुटली तर! घर संसाराचे काय! मुलांच्या शिक्षणाचे काय! प्रश्नच प्रश्न!….. डोईवर जणू टांगती तलवार असते. आपली नोकरी सुटली तर ती जागा बळकवायला हजारोजण पुढे येणार आहेत…… म्हणून पळायचे का? आपण बेरोजगार झालो तर उद्या काय खायचे? याची भ्रांत निर्माण होईल म्हणून धावायचे का?
‌ पण नशिबातली पळापळ अटळच. नाही संसारात सुख नाही मिळवलेल्या पैशाचे खायला वेळ! मनुष्यजीवन की घड्याळाचा काटा! जणूकाही सूर्य उगवतानाच टिकटिक करणारे घड्याळ सोबत घेऊन येतो. त्यामुळे धावाधाव करतच अचूक ठिकाण गाठावे लागते. कधी कधी वाटते, नको हे शहरी जीवन! जावे गावाकडे ,कसावी काळी आई! मुखात घेत हरिनाम! होईल तेवढे करावे काम ! सुखाची शांत झोप घेत राहावे, पडले की झोप यावी! असे जगणे जगावे. परंतु मानवाची हाव अन् अधाशी वृत्ती आडवी येते ना! त्यामुळेच दुरूनच विठ्ठलाचे स्मरू आणि पोटासाठी काम करू!!

जीवन असते क्षणभंगुर
घेऊया त्याचा लाभ सारे
हसू खेळू बागडू आनंदें
वाहू दे सुखाचे हे वारे

◼️सौ.भारती सावंत, मुंबई
    9653445835

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *