◼️ प्रासंगिक लेख : प्यार को प्यार ही रहने दो… उसे कोई नाम ना दो…

💕प्यार को प्यार ही रहने दो… उसे कोई नाम ना दो…💕

प्रेम…! प्रेमाचं नाव घेताच मन आनंदाने उत्साहित होतं. सर्वांगावर रोमांच उभा राहतो. हृदयाच्या कोणत्यातरी कोपऱ्यात अलगत हुंदका दाटून येतो. खर तर प्रेम ही सृष्टीवरील तरल, सुंदर भावना आहे. मानवी मनाच्या भावभावनांची उत्कट, कोमल संवेदना आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच प्रेमाचा ओलावा हवा असतो. जगात आजवर सर्वात जास्त ज्या विषयावर बोलल्या, लिहिल्या जात असेल तर ती गोष्ट म्हणजे प्रेम. असे म्हणतात की, प्रेम हे देवाघरचे देणे आहे. प्रेमाला उपमा नाही, प्रेम हे आंधळे असते. कदाचित प्रेमात पडलेल्या व्यक्तीला काही दिसत नसावे, याचा अर्थ प्रेम कुणाला सांगून होत नाही. आणि ते कसे करावे, हे कोणी सांगितल्याने ती मात्रा पूर्ण होत नाही. प्रेम म्हणजे नेमकं काय हे सांगणे फार कठीण आहे. प्रेमात ज्याचा त्याचा स्वतंत्र अनुभव असतो. व्यक्तिपरत्वे प्रेमाची व्याख्या बदलते. व्यक्तीनुसार प्रेमाची तीव्रता, प्रेमभावनेची पातळी बदलते. तरी पण सर्वांच्या हृदयाला स्पर्शून जाणारे ही भावना आहे. सर्वांना जाणवते, स्पर्शाने उसासे सोडायला लावते. हाच या भावनेचा समान दुवा, समान धागा आहे. खरंच प्रेम या अडीच अक्षरांमध्ये खूप सामर्थ्य आहे. प्रेमामुळे माणुस माणसाच्या जवळ येतो. मनातील सर्व भावना एकमेकांजवळ कथन केल्या जातात. सुखदुःखाच्या गोष्टी केल्या जातात. प्रेमामुळे रागाच्या मजबूत भिंती पत्त्या सारख्या कोसळून जातात. प्रेमाने वैर्‍यांना जिंकता येते. प्रेम कुठल्याही स्वरूपाचा असलं तरी इतर कोणत्याही भावनेपेक्षा कधीच सरळ असतं.

प्रेम खरोखरच सुंदर असते का ? हो..असतच..! पहाटेच्या प्राजक्ती गंधात न्हाऊन निघतात. वयात येणारी पोरं त्यां नाजूक फांदीला स्पर्श करत रंगू लागतात. तो जणू प्राजक्त असतो. प्रेमाची भावना किती हळवी असते यावरून त्याची प्रचिती येते. हळव्या भावननेने प्रेमाची संकल्पना समजू शकतात. प्रेमाची उत्पत्ती हळव्या भावनेतून झाली आहे. प्रेम असं करावं जे झंकाराच्या तारेतून स्वरलहरी च्या रूपात कानातून थेट हृदयात उतरावं, थंडीची शिरशिर आणि मादकता असावी. प्रेमात शीशिराचा विरह आणि ग्रीष्माची दाहकता असावी. तरच प्रेमाची खरी अनुभूती येईल. दोन तन एकत्र होण्यापेक्षा दोन मन एकरुप होण्यातच खरा विजय असतो.

प्रेमात कुठलेही बंधन, मर्यादा नसावी. प्रेम ही सृष्टीची अनमोल देणं आहे. प्रेम आहे म्हणूनच शिशिराची पानगळ आणि शरदाचं चांदणं आहे. प्रेमाचा हा नैसर्गिकपणा मानवी आयुष्याला रंगगंधात निखळ आनंद देऊ शकतो. प्रेम मनुष्यास जगण्यास शिकवते. त्याच्यासमोर जगण्याचं एक नव ध्येय ठेवते. प्रेम हे नेहमी निस्वार्थ असावं. त्यात कुठलाही स्वार्थ, कुठलीही अपेक्षा नसावी. प्रेम हे नेहमी ह्रदयाच्या गाभाऱ्यातून यायला हवं.

प्रेम हे पृथ्वीच्या कणाकणात सामावलेला आहे. दिवसभर दाण्याच्या शोधात रानोमाळ हिंडणारी चिमणी दिवस मावळतीकडे गेला की, आठवणींनी चोचीत दाणे घेऊन परतते. दिवसभर चरण्यासाठी रानात गेलेली गाय दिवस मावळताच हंबरत गोठ्याकडे धाव घेते व हळूहळू पान्हा सोडते. फूल फूलल्यावर त्यावर विविध फुलपाखरे बसतात. मृग नक्षत्राला पहिला पाऊस जमिनीवर बरसण्यास आतुर असते. हे सर्व एकसारखे प्रेमच आहे. म्हणूनच कोणी तरी म्हटलं आहे. प्यार को प्यार ही रहने दो उसे कोई नाम दो…◼️

◼️✍️ विठ्ठल आवळे, चंद्रपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *