कोंढाळा-देसाईगंज मार्गावर १२ प्रवासी बचावले सुखरुप

कोंढाळा-देसाईगंज मार्गावर १२ प्रवासी बचावले सुखरुप

कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बस घसरली कडेला

गडचिरोली : दि.१३ फेब्रुवारी (चंद्रपूर सप्तरंग, वार्ताहर – श्री कृष्णकुमार निकोडे, ९४२३७१४८८३) कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खोलगट भागात सरकली. मात्र दैव बलवत्तर म्हणून बस पलटली नाही. त्यामुळे बसमधील १२ प्रवासी व ड्रायव्हर-कंडक्टर सुखरुप बचावले. ही घटना कोंढाळा-देसाईगंज मार्गावर दि.१२ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ४.०० वा.च्या सुमारास घडली.
मागील पावसाळ्यात रस्त्याच्या कडेवरील माती वाहून गेली. त्यामुळे रस्त्यालगतच खड्डे पडले आहेत. डांबरी रस्ता व बाजूची माती यादरम्यान सुमारे एक फुटाचे अंतर पडले आहे. त्यामुळे एखादे वाहन डांबरावरून कडेला घेतल्यास ते पलटण्याची शक्यता जास्त असते. MH-06 S-8832 क्रमांकाची एसटी बस गडचिरोलीकडून देसाईगंजकडे जात होती. दरम्यान हा अपघात घडला. उपविभागीय अधिकारी मा.विशाल मेश्राम यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. आता जनतेकडून कडा भरण्याची मागणी होऊ लागली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मार्गांचे नव्यानेच डांबरीकरण करण्यात येत आहे. या मार्गांच्या बाजूच्या कडा गिट्टी-मुरूमाने भरल्या जात नाहीत. भरल्या गेल्या तरी त्यांची जाडी खुपच कमी असते. डांबरीकरणासोबतच जाडसर कडाही भरून देण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर सोपविण्याची गरज निर्माण झाली आहे, हे येथे उल्लेखनीयच!◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *