◼️ वैचारिक लेख : प्रेम…. आई – वडील

◼️प्रेम…. आई – वडील

प्रेमचं करायचयं तर आई, वडिलांवर करा
प्रत्येकाच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर कित्येक नवीन नाती निर्माण होतात.पण आयुष्यभर सोबत राहणारं आणि टप्प्या – टप्प्यावर नव्याने उलगडणारं केवळ एकच नातं असतं आणि ते म्हणजे आई – वडिलांसोबत असणारं आपलं नात.माझे आई – बाबा म्हणजे माझ्या जीवनाचे ते दोन खांब, जे माझ्या अडखळत्या रस्त्यावर माझ्या मदतीसाठी खंबीर उभे असतात.मार्ग तोच असतो,खड्डे तेच आसतात पण किस्से वेगळे,मदत वेगळी.अशाच काही आई-बाबांच्या आठवणींना आज प्रेमाच्या दिवशी उजाळा देवू या…!!!
बालपण हे खेळण्याचं वय असत.एवढ्याश्या हाताने बाबांचं बोट धरून चालतांना – खेळतांना आपण बऱ्याचदा धडपडायचो,लगेच रडायला लागायचो.तेंव्हा बाबांनी कडेवर घेतल्याशिवाय व आईने मायेचा हात फिरवल्याशिवाय आपण शांत होणे असंभव असायचो.आपण पडल्यामुळे त्या बिचाऱ्या जमिनीला बाबांनी रागावल्याचा आनंद काही वेगळाच असायचा.आईने सांगितलेल्या सर्व गोष्टी जणू काळ्या दगडावरची रेघचं असायची.लहान असतानाचं ते निरागस प्रेम काहीतरी निराळंच होतं.आता मात्र ह्या नात्यानं एक नवंच रूप घेतलं आहे.तरुणावस्थेत अन पुढची पिढी असल्यामुळे आपले काही वेगळेच विचार चालू झाले.आई – बाबा,हे असं नसतं,तुम्हांला नाही माहिती नसता तुम्हांला नाही कळत..!!हा संवाद आता वाढायला लागतो पण तरीही आपल्या आईने समजावणे काही सोडले नाही.मोठ झाल्यावर आई म्हणून नव्हे तर मैत्रीण म्हणून ती माझ्याशी गप्पा मारू लागली,मला माझे विचार मांडू द्यायला लागली व तिच्या भावनाही मोकळेपणाने व्यक्त करू लागली.माझे बाबाही काही कमी बदलले नाहीत,बरं का! बाळा म्हणून रोज जवळ घेणारे माझे बाबा आता मला माझ्या जखमांना स्वतःहून सहन करायला शिकवू लागले.मला त्यांच्या बरोबरीचे मानून ते माझ्याशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करू लागले.हा बदल होता होता मी किती मोठा झालो हे मला कळलच नाही! आयुष्याची पण गंमत वाटते,रोज समोर असलेल्या आई-बाबांबरोबरही किती वेगवेगळी नाती अनुभवायला मिळतात.
आई-वडील जगातल्या कुठल्याही नात्याची कमतरता पूर्ण करू शकतात. म्हणूनच तर म्हणतात ना,देव सगळीकडे राहू शकत नव्हते,म्हणूनच त्यांनी आई-बाबांना बनवलं.आई-बाबा या दोन शब्दांचं इतके महत्व आहे आपल्या आयुष्यात की,सांगता येणार नाही,कारण हे फक्त शब्द नाहीयेत तर आपले आयुष्य आहे.आई म्हणजे ती जिने फक्त जन्मचं नाही तर हे आयुष्य दिलं हे विश्व दाखवले,आणि बाबा ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची झीज करून आपल्या आयुष्याला गती दिली असे आई-बाबा असतात.
अगदी जन्माच्या पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत ते आपल्यासाठी झटत आहेत,नको ते कष्ट,हव्या त्या नको त्या सर्व गरजा पुरवत आहेत.पण खरं म्हंटल तर आजच्या मुलामुलींना सर्व काही भेटूनही ते आईबाबांचं महत्व विसरत चालले आहेत.कारण आई-बाबा हे शब्द आता फारसे ऐकूही येत नाही त्यांची जागा आता मम्मी,मॉम,पपा, ड्याड ह्या शब्दांनी घेतली आहे आणि या शब्दांमुळेच आईबाबांचं महत्व कमी झालंय असं वाटायला लागलं आहे.पण खरं म्हंटल तर आजच्या मुलामुलींना सर्व काही भेटूनही ते आईबाबांचं महत्व विसरत चालले आहेत.
काळ बदलतोय तसं
आईबाबांसोबतचे जे संबंध आहेत ते काळानुसार आजच्या मुलामुलींचे बदलताना दिसत आहेत,तो आदर ती नम्रता ह्या गोष्टींची कमतरता भासायला लागली आहे असं वाटतं. जसे जसे मुलंमुली मोठे होत जातात तसं आईबाबांच्या सोबतचे ते बोलणं बसणं कमी होत जातं,जे निर्णय घ्यायचे असतात मुलामुलींना ते जवळच्या मित्रांना ते सांगत असतात पण आईबाबांना सांगत नाहीत का? तर ते बोलतील,रागावतील त्यांना त्यातलं काही कळत नाही अशी आजच्या मुलामुलींची स्थिती होत चालली आहे,आणि यातच आईबाबांचे महत्व आपण विसरत चाललोय असं वाटतं.
आपल्यापेक्षा जास्त पावसाळे त्यांनी पाहिले,काय योग्य,काय अयोग्य हे त्यांना चांगलं माहित असते तरी आज आपण त्यांना बोलू देत नाही,बोलले तर त्याचा आपल्याला त्रास वाटतो सहन होत नाही,कारण बदलत्या वेळेनुसार आपणही बदललो आणि त्यांचा त्रास होतो म्हणून त्यांना आपण वृद्धाश्रमात ठेवतो का तर ते नसले की आपलं आयुष्य असं मोकळं आपणंच आपल्या मनाचे राजे.खरं तर त्यांनी असे दिवस पाहायला आपल्याला जन्म दिलेलं नसतो,पण आपण त्यांचा मनाचा विचार कुठं करतो.त्यांचा भावना आपण कुठे समजून घेतो.
आईबाबा हे दोनच असे व्यक्ती आहेत की,जे आपल्या प्रत्येक गोष्टीत सोबत असतात तेच आपल्या जवळ असतात पण आपण त्यांना आपल्या जवळच समजत नाही,ज्यांनी स्वतःचे पंख कापून आपल्या पंखांना उडायचे शिकवले त्यांना आज आपण महत्व देत नाही.खरं तर आईबाबा हे दोनच असे आहेत ह्या विश्वावर ज्यांची जागा कोणी नाही घेऊ शकत आणि हेच आजचे मुलंमुली विसरत चालले आहेत.
आई- वडील म्हणजे नक्की काय असतं? – आयुष्य जगण्यासाठी देवाने दिलेलं,अँडव्हान्स पाठबळ असतं…!!!तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं, तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरण्यापर्यंत त्यांनी आपलं आयुष्य खर्चलेलं असतं…!!!आई तुमच्या
आयुष्याच्या गाडीचं योग्य दिशा देणार स्टीयरिंग असतं…!!!तर अचानक आलेल्या संकटात सावरायला,वडील म्हणजे अर्जेंट ब्रेक चा पर्याय असतं…!!!आईचं प्रेम हे रोजच्या आयुष्यात कामाला येणारं बँक बॅलन्स असतं…!!!तर वडील म्हणजे गरजेच्या वेळी मिळणारा तुमचा बोनस किंवा व्हेरिएबल पेमेंट असतं…!!!आई म्हणजे,तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलचं नेटवर्क असतं…!!!आणि कधी नेटवर्क थकले,तर वडील अर्जंट एस.एम.एस.असतं…!!!आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं अँटीव्हायरस असतं…!!!तर शोधून काढलेले व्हायरस संपवायचं वडील हे क्वारनटाईन बटण असतं…!!!आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं शिक्षणाचं विद्यापीठ असतं…!!!तर वडील म्हणजे चालती बोलती अनुभवाची फॅक्टरी असते…!!!आई म्हणजे तुमच्या आयुष्यातली साठवलेली पुण्याई असते…!!!तर वडील म्हणजे कंबर कसून आयुष्यभर मिळवलेली कमाई असते…!!!आई म्हणजे तुमच्या आयुष्यातला मागर्दशर्क गुरू असतो…!!!तर दाखवलेल्या वाटेवर वडील हा जवळचा मित्र असतो…!!!आई म्हणजे साक्षात भगवंत,परमेश्वर असतो…!!!तर त्या परमेश्वरापर्यंत पोचवणारा वडील एक संत असतो…!!!आई म्हणजे तुमचे शरीर, मेंदू,हृदय आणि मन असतं…!!! तर वडील म्हणजे भक्कम ठेवणारा पाठीचा कणा आणि शरीरातलं हाड अन् हाड असतं…!!!कधी वेदना झाल्यास तोंडी वाक्य आई गं…असतं…!!!आणि भले मोठे संकट आले की उच्चारात बाप रे बाप असतं…!!!परमेश्वर समोर आला तरी उभे राहायला वीट फेकलेल पुंडलिकाचं मन असतं…!!!त्यांच्या आई-बापाच्या रुपात,विठ्ठलाने स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं…!!!म्हणूनच म्हणतो…परमेश्वर,अध्यात्म,
भगवंत हे सगळे अजब गणित असतं…!!!त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं आई- वडील हे कनेक्शन असतं…!!!आई- वडील म्हणजे नकळत मागे असलेली मायेची सावली असते…!!!उगाच नाही आपल्या संस्कृतीत”मातृ देवो भव”अन् “पितृ देवो भव” असे म्हणलेलं आहे…खरंच आई वडिलांच्या सेवेसाठी कधीही नाही म्हणू नका कारण आपण सर्वजण जग हे पाहतोय ते आपल्या दैवत असलेल्या आई वडिलांमुळेचं.म्हणूनच म्हणतो,खरचं मनापासून प्रेम करायचं तर आई-बाबा यांच्यावर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *