गडचिरोली-चामोर्शी राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामास पुन्हा झाला प्रारंभ
युवक काँग्रेसच्या आंदोलक इशाराला आले यश
गडचिरोली : दि.१५ फेब्रुवारी ( चंद्रपूर सप्तरंग, जिल्हा प्रतिनिधी – श्री कृष्णकुमार निकोडे – ९४२३७१४८८३) गडचिरोली शहरातून जाणार्या गडचिरोली-चामोर्शी या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम अंदाजे एक वर्षापासून बंद पडले होते. त्या कामास अखेर युवक काँग्रेसच्या आंदोलनाच्या कडक इशाऱ्यामुळे पुन्हा तडकाफडकी प्रारंभ झाला आहे.
चामोर्शीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम गेल्या वर्षभरापासून कासव गतीने सुरू आहे. यासंदर्भात वारंवार संबधित अधिकारी व कंत्राटदार यांना विनंती करूनही ते हेतुपुरस्सर याकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे आठ दिवसांत काम सुरू न केल्यास युवक कॉंग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडून संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिला. सदर बांधकाम हे एका बाजूने करण्यात आले. तर दुसऱ्या बाजूचा रस्ता खोदून ठेवला आहे. अरुंद रस्ता आणि वन वे ट्रॉफिकमुळे जड वाहने तसेच शहरी वर्दळ यांची कोंडी होत आहे. दररोज छोटेमाठे अपघात होत आहेत. शहरातील जनतेला धुळीमुळे अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सामान्य जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करणारे अधिकारी व कंत्राटदार यांच्या विरोधात युवक काँग्रेसने दंड थोपटले आहे. या बांधकामात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. अखेर या आंदोलनाच्या तीव्र इशाऱ्याची दखल घेऊन शासकीय विज्ञान महाविद्यालयापासून दुसऱ्या बाजूचेही बांधकाम सुरू करण्यात आले आहे.◼️