◼️ वैचारिक लेख : रस्ता सुरक्षा : काळाची गरज

रस्ता सुरक्षा : काळाची गरज
—— चौकट——-

माणसांना शिस्तीची ओळख बालवयातच करुन देणे गरजेचे आहे.पण त्याचबरोबर ती पाळण्यासाठी तसेच वातावरण घरात व आजूबाजूला असण्याचीही नितांत आवश्यकता असते.त्यामुळे शिस्तीने वागणे ही एक जगण्याची पध्दतच होऊन जाईल.मग ते घरात असो की बाहेर! थोडक्यांत ज्याप्रमाणे इतरांबद्दल वाटणा-या सहानुभूतीची सुरुवात घरातून होते त्याचप्रमाणे शिस्तीने वागण्याची सुरूवातही घरातूनच होत असते.वाहतूक सुरक्षेची जबाबदारी केवळ विशिष्ट विभागाची नसून ती समाजाचीदेखील आहे.रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणा-यांचा आकडा भारताचा सर्वाधिक आहे.हा आकडा कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असून ही चिंतेची बाब आहे.शालेय विद्यार्थ्यांनी ‘छोटा पोलीस’ बनून वाहतूक नियमांबाबत जागरूकता आणावी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ‘वाहतूक सुरक्षा दूत’ म्हणून भूमिका बजवावी.वाहतूक म्हणजे मानवाकडून,जनावरे आणि वस्तूंची एकाच ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्याची हालचाल.दुसर्‍या शब्दांत,वाहतुकीची क्रिया एखाद्या जीव किंवा वस्तूची विशिष्ट हालचाल म्हणून बिंदू ए ते बिंदू बी पर्यंत परिभाषित केली जाते.वाहतुकीच्या पद्धतींमध्ये हवा,जमीन,पाणी,केबल,पाइपलाइन आणि जागा समाविष्ट आहे.वाहतुकीच्या सर्वात सामान्य पाच पद्धती – रेल्वे,रोडवे,एअरवे,जलमार्ग आणि पाइपलाइन आहेत.
—————————————–
बालवाडीत असलेल्या मुलांना रस्तासुरक्षेच्या प्राथमिक कल्पनांची ओळख करुन द्यावी.प्राथमिक शाळेतील मुलांना पादचारी मार्गाचा वापर करण्याचे महत्त्व व रस्ता क्रॉस करताना घ्याव्या लागणा-या काळजीची माहिती करुन द्यावी.माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना रस्त्यावर लावलेल्या वाहतुकीच्या नियमासंदर्भात लावलेल्या वेगवेगळ्या चिन्हांचे अर्थ,महत्त्व आणि त्या-त्या भागांतील पादचा-यांची अथवा वाहनचालकांची जबाबदारी समजावून द्यावी.सरतेशेवटी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना वाहन चालवताना घ्याव्या लागणा-या दक्षतांची म्हणजेच दोन वाहनांत किती आणि का अंतर ठेवायचे,बचावात्मक वाहन चालवण्याचे फायदे,अंमली पदार्थाचे सेवन करुन गाडी चालवण्यांतील तोटे अशा गोष्टींची ओळख करुन द्यावी.मला वाटते या पध्दतीने भारतीय नागरिकांना आपण वाहन आणि वाहतूक या दोनही बाबतीत जबाबदार बनवून त्यांना वाहन चालवण्याचा व अंतिम मुक्कामाच्या ठिकाणी सुरक्षितरित्या पोहोचण्याचा आनंद उपभोग देऊ शकू.
वाहतुकीची कर्तव्ये न पाळल्यामुळे भारतात दरवर्षी अंदाजे ५ लाख अपघात होत असतात.त्यात राष्ट्रीय उत्पन्नाच्या तब्बल ३ टक्के इतके नुकसान आपल्याला सोसावे लागते.यातून होणारी मनुष्य हानी आणि त्यातल्या त्यात क्रियाशील मनुष्यांची हानी आपल्या आर्थिक विकासात अडथळा निर्माण करते.या अपघातांची कारणे शोधता असे लक्षात येते की,बहुतांश अपघात हे सिग्नल तोडल्यामुळे झालेले आहेत.जगभरातील रस्त्यावरील जीवघेण्या अपघातांच्या क्रमवारीत भारताचा क्रमांक बराच वर लागतो.वाहतूक अपघाताची पहिली नोंद १८९६ सालात सापडते आणि त्यानंतर मात्र वर्षागणिक ती पटीपटीने वाढल्याचेच आपल्याला पहावे लागते आहे.आपल्या इथे नियम हे मोडण्यासाठीच असतात,हे फार अभिमानपूर्वक सांगितले जाते.पण अशा वक्तव्याची लाज वाटण्याची वेळ समोर येऊन ठेपली आहे,असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.मग ते वातावरण प्रदूषित करणे असो वा वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणे असो,वा विनातिकीट प्रवास असो,वा रांगेच्या शिस्तीचा अपमान असो.माफ करा तुम्ही म्हणाल मी वाहतुकीच्या नियमावरुन चालू केलेली ही चर्चा कुठवर घेऊन जातेय? पण,शिस्त या शब्दाचा आवाकाच फार मोठा आहे.
वाहतूक नियमांची माहिती मोठ्यानाही दिली जात असली तरी ती शाळास्तरावर निरंतर दिली जावी,असा मतप्रवाह जोर धरू लागला असून तसे केल्यास तो पुढील आयुष्यात खऱ्या अर्थाने सुजाण नागरिक होईल,असे अनेक नागरिकांना वाटते.हलगर्जीपणाने वाहन दामटून एकापेक्षा जास्त प्राणांतिक अपघात करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याचे तसेच अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास देणाऱ्या पालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत.विद्यार्थ्यांना शाळेतच वाहतूक नियमांचे धडे देण्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्याची गरज आहे.हे शिक्षण देणाऱ्या शाळांची संख्या वाढवण्याची गरज असून शाळांनीही त्यासाठी स्वत:हून पुढे आले पाहिजे.शिक्षण संस्था पुढे येत नाहीत असे म्हणत हातावर हात ठेवत न बसता पोलिसांनीही पुढे येण्याची गरज आहेच.वाहतूक नियमनासाठी विद्यार्थ्यांची मदत घेता येऊ शकते.मात्र,विद्यार्थी असल्याने त्यांच्यावर कामाचा बोझा पडता कामा नये,याचीही काळजी घेतली गेली पाहिजे.किमान त्यांच्या शाळाच्या परिसरात काहीवेळ वाहतूक नियमन केले तरी पुरेसे आहे.वाहतूक जनजागृतीसाठी अनेक संघटना काम करीत आहेत.सिग्नल्सची नियमित देखभाल संबंधित यंत्रणेने लक्षपूर्वक करणे गरजेचे आहे.अनेक ठिकाणी सिग्नल्स व झेब्रा क्रॉसिंग तयार होणे गरजेचे आहे.रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होणार नाही,अशाच रितीने नागरिकांनी वाहने ठेवावी.मात्र,पार्किंगची योग्य जागा ठरवून देणे ही संबंधित यंत्रणेचीही जबाबदारी ठरते.अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक नियमनाबाबत लोकशिक्षण व समाज प्रबोधन,तेही संस्कारक्षम वयात शालेय माध्यमातून शिकवण्याची गरज आहे.शहरांमध्ये वाहन असणे ही अपरिहार्य बाब आहे.बदलत्या काळाबरोबर चालायचे तर या वेगाला न घाबरता त्याचा अतिरेक टाळला पाहिजे.प्रत्येक वाहन चालकाने साध्या सोप्या वाहतूक नियमांचे पालन केले तर वाहनांमुळे होणारे अपघात,त्यामुळे सोसाव्या लागणाऱ्या शारीरिक यातना व हानी बऱ्याच अंशी कमी करता येतील.‘शिस्त पाळा दंड टाळा’, प्रवेश बंद,एकेरी वाहतूक,पार्किंग,हेल्मेट हे सारे काही आपल्या सुरक्षिततेसाठी आहे.शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी या बाबत स्वतंत्र वाहतूक रस्ता सुरक्षा व नियम हा विषय असणे काळाची गरज आहे.‘प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करावे’.बेशिस्त वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी पोलीस त्यांची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी रोजच झटत असतो.उपलब्ध मनुष्यबळात व साधनसामुग्रीत पोलिसांची धडपड सुरू असते.‘स्पीड गन’,ब्रीथ अॅनालायझर,क्रेन्स वगैरे आवश्यक असून ते उपलब्ध आहेत.अपघात टाळायचे असतील तर वाहतूक नियमांचे प्रत्येकानेच पालन गरजेचे आहे.आपण सुशिक्षित असाल पण सुजाण,सुसंस्कृत नागरिक आहोत काय,याचा शोध आपणच घ्यायला हवा आणि वाहतूक समस्या दूर करायला जोमाने प्रयत्न करायला हवा.अपरिपक्व तरुण,व्यसनाधीन चालक आणि वाहन निष्काळजीपणे हाताळणाऱ्या बेदरकार वृत्तीची माणसे यांचा वाहन अपघातांचे प्रमाण वाढण्यात मोठा वाटा आहे.उपाय सोपा आहे.आपण तो प्रत्यक्षात आणला तरच त्याचे चांगले परिणाम समोर आल्याशिवाय राहणार नाही.प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करायलाच हवे व इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करायला हवे.
वाहतूक सुरक्षा सप्ताहात मिळालेल्या माहितीच्या आधारे वाहतुकीच्या नियमांची वर्षभर प्रामाणिक अमलबजावणी होणे अपेक्षित आहे.प्रत्येक नागरिकाने जबाबदारी ओळखून संपूर्ण योगदान देणे गरजेचे आहे.तर आणि तरच वाहतूक सुरक्षेचे कायमस्वरूपी कवच निर्माण होईल.
माणूस जगण्यासाठी त्याच्या शरीरातील रक्तवाहिन्यांचे जाळे जितके महत्त्वाचे आहे,तितकेच महत्त्व कोणत्याही देशातील वाहतूक मार्गाचे आहे.कोणत्याही देशाची आर्थिक व्यवस्था देशातील वाहतूकीची साधने आणि मार्ग यावर अवलंबून असते.भारत आशियाई राष्ट्रांतील प्रगत राष्ट्र म्हणून वेगाने पुढे येत आहे.स्वातंत्र्यानंतरच्या अनेक वर्षांतील ही प्रगती आम्हाला सुखावणारी आहे.मात्र या सुखद चित्राला खंत वाटावी अशी काळोखी किनार आहे,ती रस्त्यावरील वाढणारे अपघात व त्यातील बळी पडणाऱ्यांच्या संख्येची.वाहतुकीची साधने विकसित व विस्तृत झाली.मात्र त्याचा वापर करणाऱ्या वाहन चालक व मालकांची मानसिकता तशीच जुनी-पुराणी राहिली.त्यामुळे विकासाच्या वाटेवर आपण खूप मागे राहिलो हे कबूल करावे लागेल.यासाठी वाहतुकीच्या नियमांबाबत अधिक दक्ष होणे गरजेचे आहे.वाहतुकीचे नियम दंड आकारण्यासाठी नव्हे,तर वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आहेत.याची जाणीव नागरिकांना व्हावी,म्हणून वाहतूक सुरक्षा सप्ताह प्रत्येक वर्षी पाळला जातो.या दरम्यान वाहतुकीचे नियम,त्यांचे महत्त्व,सदर नियमांचे उल्लंघन केल्यानंतर होणारी दंडात्मक कारवाई सर्वांना माहीत व्हावी म्हणून प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.वाहतूक सुरक्षा सप्ताहात मिळालेल्या माहितीच्या आधारे वाहतुकीच्या नियमांची वर्षभर प्रामाणिक अमलबजावणी होणे अपेक्षित आहे.प्रत्येकाने जबाबदारी ओळखून योगदान देणे गरजेचे आहे.तर आणि तरच वाहतूक सुरक्षेचे कायमस्वरूपी कवच निर्माण होईल.आपण मुक्त आथिर्क धोरणांचा स्वीकार करून जागतिक स्तरावर आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर वाटचाल करीत असता उद्योग विश्वात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.जागतिक वाहन निमिर्ती उद्योगात वेगाने बदल घडत आहेत.पारंपारिक वाहनांच्या तुलनेत अधिक गती,आकर्षक अंतर्गत सजावट,मनमोहक बाह्य रंगरूप आणि विविधांगी उपयुक्तता यामुळे वाहन उद्योग कात टाकत आहे.दैनंदिन जीवनातील गरज,वेळेची बचत,अल्प व्याजाने दीर्घ मुदतीच्या कर्जाची सुविधा आणि काही वेळा प्रतिष्ठेचे चिन्ह म्हणून रस्त्यावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.सागर व नद्यांतील जलस्त्रोतांची अभाव तसेच विमानतळ किंवा रेल्वे मार्ग उभारणे आर्थिक व भौगोलिक रचनेमुळे काहीवेळा परवडत नाही.त्यामुळे भूमार्ग वाहतूकीसाठी सर्वाधिक पसंतीचा ठरतो.परंतु या भूमार्गाचा वापर करते वेळी वाहतुकीचे नियम आपणा सर्वांच्या सुरक्षिततेसाठी तयार केले आहेत,याचा सोईस्कर विसर पडतो आहे.आमच्या गतीमान जीवनात प्रवास अविभाज्य घटक बनला आहे.शाळा,कॉलेज किंवा ऑफिसची वेळ गाठणे,पर्यटन करणे अशा एक ना अनेक कारणाने कुटुंबातील प्रत्येक सदस्य अपरिहार्यपणे दररोज प्रवास करीत असतो.विकसित रस्ते व आरामदायी वाहनांमुळे प्रवास सुखकर बनला,मात्र सुरक्षित राहीला नाही हे खेदाने मान्य करावे लागेल.प्रवासादरम्यानची जीवित सुरक्षितता प्रत्येक नागरीकाचा हक्क आहे.परंतु वेळ व वेग यांच्या मधील संतुलन बिघडल्याने अपघातांची संख्या वाढली आहे.वाहतूक अपघातात केवळ प्रवाशीच नाही,तर पादचारी व निरपराधी व्यक्तीही बळी पडतात.प्रत्येक वाहन चालकाने रस्त्यावरील अपघाताला त्याची वैयक्तिक चूक कारणीभूत होऊन पुढील सारा अनर्थ घडणार नाही यासाठी सजग असणे काळाची गरज आहे.पादचाऱ्यांच्या सुरक्षितता व सुविधेसाठी पदपथ बांधले जातात.दुदैर्वाने फेरीवाल्यांच्या आक्रमणामुळे पदपथांचे अस्तित्व कोठेही दिसून येत नाही.कागदावरील पदपाथ प्रत्यक्षात मात्र माणसांच्या व वाहनांच्या गर्दीत हरवून जातात.महाविद्यालयीन तरुणांना वाहनांची गती भुरळ घालते.तरुणांच्या वाहनांवरील करामतीमुळे एखाद्या तरुणीचे लक्ष वेधले जात असेल.मात्र रस्त्याच्या कडेने मार्गक्रमण करणाऱ्या एखाद्या पादचाऱ्याच्या जीवनाशी मात्र चांगलाच खेळ होतो.रस्त्यावर कोठेही वाहन थांबविणे,रस्त्यामध्ये आपले वाहन चालू ठेवून इतरांशी गप्पा मारणे हा तर प्रत्येक वाहन चालकांचा जन्मसिद्ध हक्क बनत चालला आहे.आपली सोय पाहताना इतरांच्या गैरसोयीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्याची सुखनैव प्रवृत्ती जोम धरत आहे.मोठ्या शहरात तर अपार्टमेंट वा बंगल्यात राहणाऱ्या आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला बोलावण्यासाठी कर्कश हॉर्नचा वापर एखाद्या कॉलबेलप्रमाणे केला जातो.मोबाईल फोनच्या जमान्यात एखाद्या मिसकॉलने होणारे काम कर्कश हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषण किंवा शांतता भंग होण्यासाठी कारणीभूत होते,याचा कोणी विचार करते का?मनात येईल तेंव्हा थांबला,डावीकडे वा उजवीकडे वळला,यामुळे इतर वाहन चालकांना स्वत:चे वाहन चालविताना संभ्रम पडतो.वृद्ध वाहन चालवत असेल,तर योग्य समयसूचकतेअभावी अपघाताची शक्यता वाढते.पश्चिम महाराष्ट्र साखर कारखानदारीमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला आहे.गळीत हंगामाच्या वेळी उसाची वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या,ट्रॅक्टर यांना जणू भारतीय प्रशासनाचे कोणतेच नियम लागू नसावेत असेच वाटते.रात्रीच्या दरम्यान झालेल्या अधिकांश अपघाताचे कारण हे अंधारात ट्रॅॅक्टर वा बैलगाडी न दिसणे हेच असते.ट्रॅक्टरचा एकुलता एक दिवा आणि गाड्यांना ब्रेकलाईट,इंडीकेटर व रिफलेक्टर नसणे यामुळे गैरमसमजुतीने रात्री वाहने ओव्हरटेक करताना अपघातास आमंत्रण मिळते.अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांमधून १५-१६ प्रवासी कोंबून भरधाव वेगाने चालविली जातात.दिवसभरातून जास्तीत जास्त फेऱ्या करून पैसे मिळविण्याच्या हव्यासापोटी वाहतूकीचे नियम सर्रास पायदळीला तुडवले जातात.आपली सुरक्षितता आपल्याच हाती आहे.वाहन चालविण्याचे नियम सरकारसाठी नसून आपला प्रवास सुखकर व निधोर्क व्हावा यासाठीच तयार केलेले आहेत.बाजारपेठा समृद्ध होण्यासाठी मालाची वाहतूक जितकी महत्त्वाची आहे,तितकेच या देशाचे मानवी बळ राष्ट्राच्या विकासात हातभार लावण्यासाठी उपयोगी आहे.त्यांचे मूल्य अपघातातील मृत्यूने कवडीमोल ठरविण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला नाही.
एकूण काय तर वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे,प्रत्येक प्रवाशी व वाहन चालकाच्या सुरक्षिततेसाठी गरजेचे आहे.त्यांची सक्ती करावयाची वेळ पोलिसांवर येऊ नये या जबाबदारीचे भान प्रत्येकाने जपले पाहिजे.दुदैर्वाने प्रत्यक्षातील चित्र निराश करणारे आहे.वाहन चालकांच्या चुका दाखविणे,त्यांनी केलेले गुन्हे नजरेस आणून देणे व पर्यायाने शिस्त व कायदा राबविणे पोलिसांची सर्वात मोठी कसोटी बनत आहे.यासाठी प्रत्येकाने रस्ता सुरक्षतेच्या नियमांचे पालन करणे काळाची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *