चामोर्शीत परतीच्या बसफेरीअभावी विद्यार्थ्यांची होते पायपीट

चामोर्शीत परतीच्या बसफेरीअभावी विद्यार्थ्यांची होते पायपीट

मानव मिशनची बसफेरी नाही : विद्यार्थ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

 

गडचिरोली : दि.१७ फेब्रुवारी (चंद्रपूर सप्तरंग, जिल्हा प्रतिनिधी : श्री कृष्णकुमार निकोडे – ९४२३७१४८८३) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शाळांमधील उपस्थिती वाढावी म्हणून शासनाने मानव विकास मिशनच्या माध्यमातून मुलींकरीता मोफत बससेवा उपलब्ध करून दिली. मात्र सदर सेवेचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना परतीचा प्रवास पायीच करावा लागत आहे. ही समस्या चामोर्शी तालुक्यात ऐरणीवर आली आहे. मुलींच्या शैक्षणिक विकासासाठी बारावीपर्यंतच्या मुलींना निःशुल्क पासेस देऊन या मिशन अंतर्गत बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली. परंतु हे वेळापत्रक योग्यरीत्या बनविले नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मुरखळा (चक), जुनी व नवी वाकडी, नागपूर चक, वागदरा आदी गावामधून जवळपास १०० विद्यार्थी चामोर्शीला येतात. बल्लू वाकडी या गावावरून महामंडळाची बस विद्यार्थ्यांना चामोर्शीला घेऊन येते. परंतु दुपारी सुट्टी झाल्यानंतर त्यांना पुन्हा गावी परतण्यास बसफेरीच नाही. परिणामी त्यांना उपाशीपोटी १२ ते १५ किमीचे अंतर पायी कापावे लागत आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, ताप व अशक्तपणा यासारख्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे.
मानव मिशनच्या दु.१२ व सायं.५ वा. अशा आणखी दोन बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी होत आहे. बसफेऱ्या न वाढविल्यास एसटी.महामंडळ विरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विद्यार्थी रोहन बुरांडे, सोनल रोहणकर, स्नेहल लाकडे, प्रणाली वाळके, स्नेहा ठेमस्कर, सुप्रिया शेंडे, पायल रोहणकर, रागिणी सोनटक्के, निकिता ठेमस्कर, काजल काकडे, आकांशा पोरटे आदींसह त्यांच्या पालकांनीही दिला आहे.

◼️जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी वंचित
गडचिरोली, आरमोरी, धानोरा, कोरची या सर्वच तालुक्यातील अनेक मोठ्या गावात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. कोरोना संसर्ग आटोक्यात आला असला तरी मानव विकास मिशनच्या बसगाड्या मानापूर, देलनवाडी, वडधा यासारख्या भागात सुरू झाल्या नाहीत. गडचिरोली जिल्ह्याभरातील शा हजारो विद्यार्थ्यांना यासेवेपासून वंचित रहावे लागत आहे, हे येथे उल्लेखनीयच !◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *