दिल्लीच्या महाराष्ट्र राज्य परिचय केंद्रातर्फे आयोजित कवितावाचन उपक्रमांतर्गत
गडचिरोलीच्या श्री रोहणकर सेवानिवृत्त शिक्षकाची झाली निवड
गडचिरोली : दि.२० फेब्रुवारी (चंद्रपूर सप्तरंग, जिल्हा प्रतिनिधी : श्री कृष्णकुमार निकोडे – ७४१४९८३३३९) नक्षलग्रस्त व मागास जिल्हा अशी गडचिरोली जिल्ह्याची ओळख असली, तरी या जिल्ह्यात प्रज्ञावंताची कमी नाही. हे वेळोवेळी सिद्ध होत आहे. नुकतीच दिल्लीच्या महाराष्ट्र राज्य परिचय केंद्रातर्फे आयोजित कवितावाचन उपक्रमात गडचिरोली शहरातील रहिवासी सेवानिवृत्त श्री उपेंद्र रोहणकर यांची निवड झाली आहे.
‘मराठी भाषा गौरव दिन’ या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी वि.वा.शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त दिल्ली येथील महाराष्ट्र राज्य परिचय केंद्राने कवी कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात राज्यातून व राज्याबाहेरूनही साहित्यप्रेमी सहभागी होत आहेत. यातील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक श्री उपेंद्र रोहणकर यांची सुस्पष्ट उच्चारण व उत्तम सादरीकरण या गुणांमुळे निवड झाली आहे. त्यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची ‘माझी मराठी’ ही कविता उत्तमरित्या वाचन करून सादर केली.
शिक्षक श्री उपेंद्र रोहणकर यांनी एन.सी.आर.डी. नागपूर संचालित विनोबा भावे आश्रमशाळा कोटमी, गेदा, तलवाडा, बिनागुंडा व पंदेवाही या स्थानिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल व दुर्गम भागात २४ वर्षे अध्यापनाचे कार्य केले आहे. त्यांना कविता लेखन, वाचन व गायनाचा छंद आहे. शिवाय ते अनेक सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घेत असतात. त्यांच्या निवडीबद्दल अनेक चहाते, मित्र व गोत्रपरिवार त्यांच्यावर फोन, फेसबुक व व्हॉट्सअॅपद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून अक्षरशः अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत.◼️