अंतराळ
डोक्यावरती पसरले जसे
अथांग अमर्याद अंतराळ
मन:लहरींचे रूपही तसेच
अनाकलनीय नि विक्राळ
एक ना अनेक अनुभवांचे
ग्रहचक्र असती फिरतीवर
सकारात्मक विचार वलय
करी संरक्षण या धरतीवर
अगणित भावतारका पुंज
सभोवताली घालती पिंगा
अधांतरीच तरंगणारे पाय
करी अस्तित्वासाठी दंगा
व्यक्ततेची खोली जितकी
सामंजस्याची उंची तेवढी
तोल राखण्या काळजाचा
उरे न अंतरी कसली अढी
सुख दुःखांची वादळं येती
तनामनास घुसळून जाती
वेग:स्थितीत संयमी अन्
स्थीरत्व प्राप्तीने बागडती
पावलोपावली उलगडती
अविश्वसनीय गुप्त रहस्य
खोल जखमांचे व्रण कधी
खुले ओठांवर स्मितहास्य