⬛ लघुकथा : बाळकाका

🔻बाळकाका

बाळ काका साऱ्या गावचेच काका.खूप वर्ष त्यांच्या समवेत त्यांच्या शेजारी राहिलो.पण बाळ काका असे असे आहेत असं ठामपणे त्यांच्याविषयी कोणी सांगू शकत नव्हतं. उंचपुरे म्हणजे साधारणपणे सहा फूट ! बारीक अंगकाठी, घोगरा आवाज ,सावळा वर्ण! हे शारीरिक वर्णन झालं,पण बाळकाकांच्या स्वभावाचं वर्णन ?केवळ अशक्य .ते कधी कुणाशी कसे वागतील ते सांगता यायचं नाही.

माया लावली तर पोटच्या पोरासारखी,किंबहुना त्याहीपेक्षा जास्त ,नाहीतर शिव्यांचा भडीमार,पण त्या शिव्या कधी लागल्या नाहीत.बाळकाकांचं लग्न झालं ,त्यांना मुलगी झाली.गावभर बाळकाका साखर वाटत फिरले ,आपल्या घोगऱ्या आवाजात ह्या गल्लीपासून त्या गल्लीपर्यंत “पहिली बेटी धनाची पेटी” असं ओरडत. साखर वाटून काही दिवस होता न होता तोच बाळकाकांची बायको आजारी पडली.आधी नुसताच ताप. बाळकाकांनी चुलीचा ताबा घेतला.

आपल्या घोगऱ्या आवाजात सगळ्या गल्लीला सांगत ” बायको आजारी पडली.. चूल माझी रडली” यातून त्यांना काय म्हणायचे असते देव जाणे, पण बायकोचा आजार वाढतच गेला,बाळकाका गावात भिक्षुकी करायचे.गरिबीचा जन्मजात श्रापच !पण बाळकाकांनी कद्धी हात नाही पसरवला. सतत आपलं घोगऱ्या आवाजातील काव्य चालूच

एकदा त्यांना पूजेत काही बदामा आणि काही खारका मिळाल्या होत्या ,आजारी बायकोला औषधपाणी नाहीतर बदाम तरी द्यावा म्हणून त्यांनी तो फोडला तर सगळे बदाम कडवट आणि तु-हट ,शेवटी त्यांनी ते त्यांच्या गायीला घातले आणि आपल्या घोगऱ्या आवाजात म्हणाले “आमची गाय बदाम खाते..हौद भरून दूध देते”

बाळकाकांच्या आत एक अभिजात कवी असावा असं सारखं वाटतं. कसलं हौद भरून दूध अन कसलं काय.. घरी गाय असूनही बाळकाकांना मी कोराच चहा पितांना खूप वेळा पाहिलं.दहाव्या दिवशी बाळकाकांची बायको भल्या पहाटे गेली

झोपेतच !, सगळी गल्ली धावून आली. बाळकाका नुसतेच खांबाला बसून राहिले होते.जवळ 11 वर्षांची त्यांची मुलगी धाय मोकलून रडत होती,बाळकाका तिच्या डोक्यावरून नुसताच हात फिरवत राहिले होते

एक शब्द नाही,डोळे किंचित ओले पण बाळ काका खचून गेल्यासारखे दिसत होते.मी जेमतेम 13 वर्षांचा .सगळा गाव शेवटच्या तयारीला लागलेला.बाळ काकांनी मला पटकन कुशीत घेतले तोच मोठा घोगरा आवाज ” राज्या गेली तुझी काकू…माझ्या सोनिशी कसं वागू ?”

यातून सोनिशी म्हणजे मुलीशी असं त्यांना म्हणायचं होतं. तेव्हढंच काय बस,बाळकाका म्हणाले,”चला उचला तिला आता” पुन्हा घोगऱ्या आवाजात म्हणाले “नशीब फूटक रे साडी चोळी सुद्धा नाही माझ्या पाशी” अर्थात हे सारं गावतल्यांन माहीत का नव्हतं ?सारी तयारी झाली होती. बाळकाका एका जागी बसून होते त्रयस्था सारखे ! डोळे लालबुंद झालेले.

दुसऱ्या दिवशी काहीही न झाल्यासारखे बाळकाका कामाला लागले.मुलीची काळजी घेऊ लागले.अगदी हसत खेळत बायकोच दुःख अगदी सहज विसरले किंवा पचवले.दहावं बारावं काही नाही.अस्थी तेवढ्या विसर्जित केल्या गंगेत.

बाळाकाका अगदी रमून गेले.कधीतरी मला खारका दयायचे आणि आपल्या त्याच घोगऱ्या आवाजात म्हणायचे ,”खाशील खारका तर नाही रहाणार बारका” बाळकाकांचं हे काव्य मला फार गमतीदार वाटायचं.ते हे सहज कसं जमवायचे याचे मला फार कौतुक वाटायचे. बाळकाकांची आणखी एक सवय मी जेवायला बसलो की बरोबर त्याच वेळेला ते यायचे,मी जेवत असतांना पटकन माझ्यासमोर अगदी मांडी वळून बसायचे म्हणायचे “एक्कच घास..एक्कच दे आsss “मी घास भरवायला घेतला की पटकन उठून जायचे.

म्हणायचे त्याच लयीत त्याच घोगऱ्या आवाजात

“भरवायला हजार हात.. पण तोंडात नाही दात”

बाळकाकांची मुलगी एक दिवस अचानक आजारी पडली .सकाळी ताप आला ,दुपारी वाढला रात्रभर बाळकाका तिच्याजवळ बसून होते ताप काही कमी होत नव्हता.आणि भल्या पहाटे बाळकाकांची मुलगी गेली.बाळकाकांची बायको जाऊन जेमतेम चार महिने झाले असतील. त्या धक्क्यातून फार बरेच लवकर सावरले होते.तोच हा आघात.पुन्हा सारी गल्ली धावून आली,तेच सारं जे त्यांच्या बायकोच्या वेळी झालं होतं.अकरा साडे अकरा वर्षांचं वय.काय वाटलं असेल बाळकाकांना ? तो दिवस मला जसाच्या तसा आठवतो. बाळकाका आपल्या गायीच्या पाठीवरून सारखा सारखा हात फिरवत होते ,समोर मुलीचं प्रेत !मला काही कळत नव्हतं.डोळ्यातून आसवांचा टिपूस नाही.हे कसं शक्य आहे ? “चिमणी माझी उडाली

आईला जाऊन बिलगली” एवढंच काय ते सारखं सारखं म्हणत होते. मग मात्र रडले..खूप नाही ..पण रडले.एखाद्या माणसात देव किती बळ देतो.बाळकाकांना काळानेच भक्कम बनवलं होतं हेच खरं !दिवसांचे पक्षी पुन्हा भुर्रकन उडून गेले. बाळकाका पुन्हा त्याच लयीत जगू लागले.

नेहमीप्रमाणेच बाळकाका आले दुपारची जेवणाची वेळ,पटकन समोर उकिडवे बसून म्हणाले ,”एक्कच घास.. आsss एक्कच घास”

पण आज ते एवढ्यावर थांबले नाहीत पुढे म्हणाले ” भूक लागली पोटाला..विस्तव नाही चुलीला…एक्कच घास” पण खाल्ला मात्र नाही.

मार्च महिन्यातली गोष्ट! मी शाळेतून धावत घरी आलो .दप्तर फेकत वडिलांना म्हणालो “नाना मी चाललो खेळायला ” त्यावर नाना पटकन म्हणाले “अरे थांब त्या बाळ ला पाहून ये..विचार काही जरा..सकाळपासून तापलाय तो .. जा तर “

मी उद्या मारत गेलो तो बाळकाका झोपलेले!

मी परत फिरणार एवढ्यात त्यांचा आवाज..पण आता तो घोगरा नव्हता ,क्षीण झालेला..”,राज्या थांब त्या तिथे खारका आहेत ..टाक तोंडात जा”

मी नको म्हणालो आणि परतलो .दुसऱ्या दिवशी सकाळीच बाळकाकांना पाहण्यासाठी सारी गल्ली गाव उलटलं.नाना ..माझे वडीलही घाईतच होते.मला काहीच कळेना..मी विचारल्यावर नाना म्हणाले “बाळ चा ताप काही केल्या उतरत नाहीये ..रात्रभर आम्ही आहोत इथं,तुला नाही उठवलं” बाळकाकांच्या बायकोचीही अशीच अवस्था होती.मुलींचीही.. मला उगाचच काहीतरी वाटायला लागलं.वर्दळ वाढली.डॉक्टर येऊन बघून गेले. बाळकाकांना त्यांचं असं कुणीच नव्हतं.त्यामुळे सगळी गल्ली लगबग करत होती.

एक तासाने मी परतलो.घर माणसांनी गच्च भरलं होतं. मला पाहताच बाळकाकांनी मला खुणावले आता बोटं हलवायचीही ताकद नव्हती पण मला कळलं ,मी त्यांच्या कानाला लागलो.घोगरा आवाज पार क्षीण झाला होता..सूर थकले होते

लय गडबडली होती.कविता क्षीण झाली होती

तरीही ते शेवटचे शब्द माझ्या कानावर आलेच कसेबसे “एक्कच घास…”माझ्याकडून नाही राहवलं गेलं.मी धावत घरात गेलो, घरात रात्रीची पोळी होती ती घेतली मी जाताच बाळकाकांनी छोटासा “आss”केला मी एक कण तोंडात टाकला.गल्ली हुंदके देत होती. पाण्याचा एक थेंब टाकला, बाळकाकांनी तो गिळला. पुन्हा तो क्षीण स्वर काहीतरी सांगत होता,मी पुन्हा कानाला लागलो ” शेवटचा अध्याय..वाट पाहे लेक माय” बाळकाका हे जे बोलले ते फक्त आणि फक्त मलाच ऐकू आलं इतकं क्षीण होतं.

बाळकाकांनी डोळे मिटले अचानक जोरदार श्वास घेतला किंवा लागला म्हणा..माहीत नाही.त्यानंतर एक शब्द नाही ,हालचाल नाही मंद मंद छाती तेवढी हलत होती. नंतर ती हि शांत झाली..

मी घरात गेलो माझ्या..सगळं घर हुंदके देतंय असं वाटत होतं. बाळकाका बरोबर म्हणाले..शेवटचा अध्याय …एका कवितेच्या संग्रहाचा !

जी.ठाणे

pkbhave71@gmail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *