महिलांनी गावातून जाणार्‍या दारु तस्करांना पकडून चोप दिला

महिलांनी पकडली अवैध दारू

चंद्रपूर : घुग्घुसच्या जवड असलेला उसगाव येथे दारू तस्कर व विक्रेत्यांनी धुमाकुळ घातल्याने गावातील महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी शनिवारी सकाळी अवैध दारू पकडून दारू तस्करांना चांगलाच चोप दिला. उसगावच्या महिला सरपंच निविता ठाकरे, ग्रा. पं. सदस्य गिता भोयर, शारदा ठाकरे, सुरेखा मुके, माया जुमनाके, गोपिका भोयर या महिलांनी गावातून जाणार्‍या 7 दारु तस्करांना पकडून चोप दिला. महिलांनी चोप देताच 6 दारू तस्करांनी शेतातून पळ काढला. परंतु हरीदास निळकंठ विधाते (35, रा. बेलसनी) हा दारू तस्कर महिलांच्या हाती लागला. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती कळताच गुन्हे शोध पथकाचे रंजीत भुरसे, निलेश तुमसरे व होमगार्ड यांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याजवळून 3 हजार रुपये किंमतीची देशी दारू जप्त करून अटक केली. त्यानंतर महिलांनी घुग्घूस पोलिस ठाण्यात धडक देत पोलिस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांना निवेदन दिले.

उसगाव हे गाव वर्धा नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव असून, नदीच्या पलिकडे यवतमाळ जिल्ह्याची सिमा आहे. या नदी पात्रात पाणी कमी असल्याने दारु तस्कर पोत्यात अवैध देशी दारूच्या शिश्या भरून या नदीपात्रातून पायदळ उसगावमार्गे चंद्रपूर जिल्हात येतात. मात्र, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने दारू तस्करीत वाढ झाली असून, या दारू तस्करीला आळा घालण्याची मागणी यावेळी महिलांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *