🔷 काव्यरंग

🔵 कुठे हे चालले लोंढे..
•••••••••••••••••
मुक्यानी बांधुनी तोंडे, कुठे हे चालले लोंढे…
मनाचे मारुनी मांडे, जणू सैराटले लोंढे ?…

कसे पायास समजावू? जिवाची चाळणी झाली,
लुळा संसार मग भांडे, कुठे रक्ताळले लोंढे?…

निघावी श्र्वास कोंडूनी, जसी दिंडी दिवाण्यांची,
जवळ कर विठ्ठला तांडे! विकल भक्ताळले लोंढे…

कुठे माझे? कुठे तुमचे? कुणाच्या ओळखीचे रे?
इमानीपण दगडधोंडे, बरळले – “आपले लोंढे “…

दिसे अक्षांस कोरोना, दिसे रेखांस कोरोना-
गरिब,पाटील,धन-दांडे! जिणे अंधारले लोंढे…

उगवली की खुरटली ती, कुणाला काळजी आहे?
कपाशीची मुकी बोंडे, तसे दुष्काळले लोंढे….

जिवा-या लेकरासाठी हंबरती गाय गहिवरते
स्थनातिल चासणी सांडे, असे पान्हावले लोंढे…

◼️ शब्दांकन: लोकराम शेंडे
बुट्टेबोरी,नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *