नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राथमिकता द्या – ना. विजय वडेट्टीवार

🔷’मिशन बिगीन अगेन’साठी लोकप्रतिनिधींच्या प्रशासनाला सूचना.
🔷पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची बैठक
◼️( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )
चंद्रपूर,( दि. 1 जून) : जिल्ह्यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना 3 जून ते 30 जून पर्यंतच्या मिशन बिगीन अगेनची अर्थात लॉकडाऊन शिथील करताना जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राथमिकता देण्यात यावी. तसेच शेतकरी व हातच्या कमाईवर रोजचे पोट असणाऱ्या कामगारांच्या हिताचे देखील यामध्ये लक्ष वेधण्यात यावे,अशी सूचना राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन,इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केली.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील महिन्याभराच्या काळातील लॉकडाऊन संदर्भातील नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत लवकरच जारी होणार आहे. यासाठी आज सकाळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची एक तातडीची बैठक पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतली. या बैठकीला खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर, आ.किशोर जोरगेवार, आ. सुभाष धोटे, आ. प्रतिभा धानोरकर यांची उपस्थिती होती. तसेच या बैठकीला जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे, जिल्हाआरोग्य अधिकारी राजकुमार गेहलोत आदींची उपस्थिती होती.
यावेळी सर्व लोकप्रतिनिधींनी दैनंदिन व्यवहारात अडचण येणार नाही,अशा पद्धतीच्या वाहतूक व्यवस्थेची परवानगी देण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना सूचना केली. ऑटोचालक,टुव्हिलर चालक, खाजगी वाहन धारक, यांच्या काही मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.मात्र जिल्ह्यांमधील प्रत्येक नागरिकांनी यापुढे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मास्क वापरण्याची सवय लावणे अनिवार्य करण्याबाबत सर्व लोकप्रतिनिधींनी एक मत व्यक्त केले.
यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यांमधील नागरिकांच्या प्रतिकारशक्तीमध्ये वाढ व्हावी यासाठी आयुष मंत्रालयामार्फत औषधी वितरणाच्या संदर्भात प्रयत्न करण्याबाबतची सूचना केली.नागरिकांनी कोरोना या आजारावर केवळ एकमेव उपचार म्हणजे शक्यतो घराबाहेर अत्यावश्यक कामाशिवाय न पडणे आहे. यासंदर्भात ज्येष्ठ नागरिक व दहा वर्षाखालील मुलांची देखील काळजी घेण्याबाबत अशा सूचना केल्या.
यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे यांना तातडीने नवीन कोरोना चाचणीची प्रयोगशाळा सुरू करण्याबाबतचे निर्देश त्यांनी दिले.या कोरोना चाचणी प्रयोगशाळेचा उपयोग चंद्रपूर सोबतच गडचिरोली जिल्ह्याला देखील व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सोबतच जिल्ह्यामध्ये सैन्य दलातील निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये आवश्यक तेथे सहभागी करण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणखी बळकट करून प्रत्येक नागरिकांना आरोग्य विभागामार्फत आवश्यक सूचना औषधोपचार व त्याचा ताण तणाव कमी करण्याबाबत उपाययोजना करण्याची सूचना यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गेहलोत यांना करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *