⏹️ महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सर्व घटकांना

◼️ महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

◼️( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क)

चंद्रपुर, (दि. 4 जून) : कोविड 19 आजाराचा प्रार्दुभाव लक्षात घेऊन महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत राज्यातील सर्वच कुटुंबाना उपचारासाठी मोफत लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कोरोनाबाधित रुग्ण व कोरोनाची लागण नसलेल्या इतर आजाराच्या सर्व लोकांना या निर्णयामुळे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत  अंगीकृत  असलेल्या सर्व रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत.

सुधारीत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेशी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना संलग्नीकरण करून एकत्रित स्वरुपात 1 एप्रिल 2020 पासून अंमलात आली आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी व सनियंत्रण राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत केली जाते.

शासकीय व पालिका रुग्णालयाचे सध्या कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात येत असल्याने यापुर्वी, योजनेंतर्गत शासकीय रुग्णालयांसाठी राखीव असलेल्या 134 उपचारांपैकी 120 उपचारांचा लाभ यापुढे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील अंगिकृत खाजगी रुग्णालयात 31 जुलै 2020 पर्यंत घेता येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत काही किरकोळ, मोठे उपचार व तपासण्या समाविष्ट नाहीत असे उपचार व तपासण्या सदरील योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये सर्व लाभार्थ्यांना सीजीएचएसच्या दरानुसार (एनएबीएच / एनएबीएल) उपलब्ध करुन देण्यात येतील. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत 996 आजारावरील उपचाराची सोय असून, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत 1 हजार 209 आजारावर उपचार केले जातात.

राज्यातील जवळपास 85 टक्के नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत. 23 मे 2020 रोजी शासनाने काढलेल्या आदेशानुसार राज्यातील आता प्रत्येक व्यक्तीला म्हणजेच, पिवळे,केसरी अन्नपूर्णा आणि अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबासमवेत पुढील 2 महिन्यांकरिता शुभ्रशिधापत्रिका धारक कुटुंबांना सुद्धा  महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार घेण्याची सुविधा मिळणार आहे. चंद्रपूर जिल्हात,जवळपास एकूण 5 लाख 23 हजार 886 शिधापत्रिकाधारक कुटुंबाना  महात्मा  ज्योतीबा फुले जन  आरोग्य  योजनेचा लाभ हा मिळणार आहे.

या योजनेचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा व योजनेच्या अधिक माहितीसाठी अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्राशी संपर्क साधावा. दूरध्वनीद्वारे टोल फ्री नंबर 155388  किंवा 1800 233 22 00  या क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *