◼️सप्तरंगातील..साहित्यरंग..काव्यरंग…

प्रासंगिक लेख..

◼️अवघ्या जगामध्ये कोरोना विषाणू चा थैमान सुरू असून कित्येक लोकांचा बळी गेला.अश्या सत्य परिस्थिती वर श्री दुशांत बाबुराव निमकर…यांच्या लेखणीतून विशेष लेख.!!

🔴 युद्धखोरीचा विषाणू …

अणूपेक्षा इवलासा तू ..
अणु बाँम्ब पेक्षा मारक तू ..
चाहुलही लागू न देता येणारा तू ..
युद्ध न करताही विनाश करणारा तू…!!

वरील ओळी तामिळनाडू राज्यातील अव्वल दर्जाचे कवी वैरामुथु यांच्या कवितेतील असून सूक्ष्मतम असलेल्या विषाणूने जगभरात हाहाकार माजविला आहे.कोणतीही चाहूल लागू न देता अणुबाँबपेक्षाही मारक असलेला विषाणू जगभरातील जनतेला हैराण करून सोडलेलं आहे.अगदी युद्धाची कोणतीही परिभाषा न सांगणारा घातक विषाणूने संपूर्ण जगाचा नायनाट करण्याचा घाट घातला की काय? अशी जनमानसात शंका निर्माण झाली आहे हे अगदी तंतोतंत वाटते आहे.यापूर्वी देखील असेच संसर्गजन्य रोग आलेले होते.सार्स, कुष्ठरोग,गोवर,क्षयरोग,घटसर्प,डांग्या खोकला,अतिसार,कांजण्या,प्लेग यासारख्या रोगाने जनमानसाला हैराण करून सोडले होते.अनेक बळी ह्या संसर्गजन्य रोगाने घेतले,जीवितहानी व वित्तहानी झाली.सार्स व कोरोना या रोगांची लक्षणे समानच आहेत.म्हणजेच हे सारे युद्धखोरीचे विषाणू आहे का??असं वाटायला लागलं आहे.यासारख्या सर्व संसर्गजन्य रोगावर मानवाने संशोधन करून लस उपलब्ध करून दिली आहे.स्वाइन फ्ल्यू या आजाराने महाराष्ट्रात देखील संकट आलेला होताच पण मानवाच्या संशोधनातून लस उपलब्ध करून त्यावर आळा घालण्यास मानवच अग्रेसर ठरला.

सार्स या रोगाचा देखील 2002 साली चिनमधूनच प्रसार व संसर्ग झालेला होता. सार्स व कोरोना हे साथीचे रोग असून कोरोना या विषाणूमुळेच पसरलेले आहेत.कोरोना विषाणू हा प्रथमतः चीन देशातील वूहान या ठिकाणी आढळून आला.त्या भागातील आरोग्य यंत्रणेत कार्य करणारे डॉक्टर ली वेनलियांग यांनी या रोगाचा प्रसार स्पर्शाने होतो असे भाकीत आधीच केले होते. हा नवीन विषाणू घातक आहे याचीही प्रचिती त्यांनी दिली होती पण चीनच्या प्रशासनाने त्यांना मूर्खात काढले होते.शेवटी रुग्णालयात रुग्णाची सेवा करीत असतांना नकळत त्यांनाही या विषाणूने घेरले नि अखेर त्यांनाही कोरोनाची बाधा होऊन मृत्यूला तोंड दयावे लागले. त्यानंतर चीन प्रशासन खडबडून जागे झाले.आणि त्या विषाणूची चर्चा होऊ लागली त्याचसोबत प्रसार ही होऊ लागला तेव्हाच जगभरात कार्यरत असलेली जागतिक आरोग्य संघटनेने संशोधन करून या विषाणूला कोविड-19 हे नाव दिले. शिक्षण,आरोग्य,व्यापार,परराष्ट्र धोरण यासारख्या बहुविध कामानिमित्य देशविदेशातील व्यक्तीचा चीनमध्ये जाण्याचा प्रसंग आला.तिथून नंतर आपापल्या देशात गेल्यावर कोरोना घेऊनच गेले अस वाटायला लागलं.कारण की तीच लक्षणे त्यांनाही दिसू लागलेत. म्हणजे विदेशातून आपापल्या देशात कोरोना घेऊन आलेत असं म्हटलं तरी चुकीचे होणार नाही.कोविड-19 हा विषाणू घातक असल्याने जागतिक आरोग्य संघटनेनी जागतिक आरोग्य संकट म्हणून घोषित केले.

कोरोना विषाणूची ओळख नोव्हेंबर-डिसेंम्बर 2019 मध्ये सर्व जगभरात झाली पण केवळ पाच महिन्याच्या कालावधीत संपूर्ण जगाला आपल्या जाळ्यात ओढून घेण्यात विषाणू अग्रेसर ठरला.आज जगाचा विचार केला असता 14 लाख 47 हजार लोक कोरोनाग्रस्त आहे.जवळपास 88 हजार बळी कोरोनाने घेतले असून अजूनही आपले जाळे घट्ट करण्यास कोरोना विषाणू आसुसलेला आहे असं वाटत आहे.आज विकसित देशात आरोग्य व्यवस्था सुसज्ज असतांना देखील दर दिवशी इटली,स्पेन,फ्रान्स, ब्रिटन,दक्षिण कोरिया यासारख्या देशात सरासरी 700 बळी एका दिवसात जात आहेत तेथील आरोग्य यंत्रणा देखील विषाणूपुढे हतबल होतांना आपण पाहत आहोतच.अमेरिका या विकसित देशात देखील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या चार लाखापेक्षा अधिक आहे.सुरुवातीला बेरजेच्या रुपात वाढणारा हा विषाणू आज गुणकाराच्या पटीने वाढत आहे.त्यामुळे कोरोना विषाणू हा युद्धखोरीचा विषाणू आहेच अशी जनमानसात भीती निर्माण झाली आहे.यापूर्वी झालेली दोन महायुद्धे यामध्ये देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचे हाल होत होते फक्त दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने अणुबाँबचा वापर केला होता.त्याचे परिणाम आजही जपानी नागरिकांना भोगावे लागत आहे पण आज अणुबाँबही न वापरता कोरोना विषाणू हा आपल्या सर्व देशवासियांनासह जगाला डोईजड ठरू पाहत आहे.

आपल्या भारत देशात 130 कोटी जनता आहे.आपल्या देशातील अनेक नागरिक या ना त्या कामानिमित्य विदेशात गेले व परत आले.या विषाणूची प्रसार क्षमता पहिल्या व दुसऱ्या स्टेजमध्ये खूप कमी असून तिसऱ्या स्टेजमध्ये वणव्यासारखी रोद्र रूप घेऊन प्रसार पावते.भारत देशात फेब्रुवारी मध्ये बोटावर मोजण्या इतपत रुग्ण आढळून आले पण एका महिन्यात 5 हजाराच्या वर यांचा आकडा गेला आहे त्यामुळे याचा आणखी प्रसार होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून प्रथमतः जागतिक जल दिनी संपूर्ण भारतभर संचारबंदी लागू करण्यात आली त्याला योग्य प्रतिसाद मिळाला पण कोरोना विषाणू हा हानिकारक आहे याची योग्य पावले उचलत भारताचे प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली.जर संचारबंदी लागू केली नसती तर आज अनेकांचे बळी या युद्धखोरीच्या विषाणूने घेतला असता हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही.कोरोना या विषाणूने फक्त जीवितहानीच होत आहे असं नाही तर संपूर्ण जग मंदीच्या खाईत लोटला गेला आहे,माणूस माणसापासून दुरावत चालला आहे.सामाजिक जाणिवा देखील पुसट होत आहे.यामध्ये शिक्षण,आरोग्य,समाज,उद्योग,पर्यटन,दळणवळण,रोजगार या सर्वच क्षेत्राला झळ हा युद्धखोरीचा विषाणू पोहचवत आहे.

आता यानंतरची युद्धे अणुबाँम्ब न वापरता विषाणूनेच खेळले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.जागतिक महासत्ता बनण्याच्या नादात एका देशाने दुसऱ्या देशाला पाण्यात पाहणे सुरू आहे.सातत्याने असे होत असल्यास सामान्य नागरिकांना जीवन जगणे कठीण होणार आहे.सदर विषाणूची बाधा झालेल्या रुग्णाला बरे करण्यासाठी वापरली जाणारी लस अजूनही कोणत्याही देशाने काढली नाही त्यामुळे जोपर्यंत या विषाणूला आळा घालणारी लस उपलब्ध होत नाही तोपर्यत स्वतःच स्वतःचा रक्षक बनून स्वतःच्याच घरी राहणे हे आपले कर्तव्य आहे.युद्धखोरीच्या विषाणूच्या जगात शक्यतो त्या रुग्णाच्या संपर्कात जाण्यास स्वतःला कसं रोखता येईल याकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे.जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या दिशानिर्देशानुसार व शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.आज आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य,पोलीस,स्वच्छता कर्मचारी यांनी हे आपल्यासाठी एवढे करीत असतील तर काही काळासाठी आपण स्वतःला अलिप्त ठेवायला काय हरकत आहे. ‘हे विश्वची माझे घर’ हे जरी योग्य असलं तरी सध्या स्वतःला वाचविण्याकरिता ‘हे घरची माझं विश्व’ आहे असं समजून राहायला हवं. ही परिस्थिती अशीच राहणार नसून मानव व मानवाची संशोधवृत्ती या विषाणूचा नायनाट करणारच आहे यासाठी थोडा संयम व शिस्त बाळगणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा युद्धखोरीचा विषाणू आपल्याला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही.

◼️श्री दुशांत बाबुराव निमकर
        चक फुटाणा, चंद्रपूर

************************************

काव्यरंग…..

◼️|| कुठे हे चालले लोंढे ||

मुक्यानी बांधुनी तोंडे, कुठे हे चालले लोंढे…
मनाचे मारुनी मांडे, जणू सैराटले लोंढे ?…

कसे पायास समजावू ? जिवाची चाळणी झाली,
लुळा संसार मग भांडे, कुठे रक्ताळले लोंढे ?…

निघावी श्र्वास कोंडूनी, जसी दिंडी दिवाण्यांची,
जवळ कर विठ्ठला तांडे ! विकल भक्ताळले लोंढे…

कुठे माझे ? कुठे तुमचे ? कुणाच्या ओळखीचे रे ?
इमानीपण दगडधोंडे, बरळले – “आपले लोंढे “..

दिसे अक्षांस कोरोना, दिसे रेखांस कोरोना-
गरिब, पाटील, धन-दांडे ! जिणे अंधारले लोंढे..

उगवली की खुरटली ती, कुणाला काळजी आहे ?
कपाशीची मुकी बोंडे, तसे दुष्काळले लोंढे…

जिवा-या लेकरासाठी हंबरती गाय गहिवरते
स्थनातिल चासणी सांडे, असे पान्हावले लोंढे…

◼️ कवी :- लोकराम शेंडे , बुट्टीबोरी , नागपूर

*************************************

◼️ संपादक संंकल्पना :- विठ्ठल आवळे

     चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क टीम..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *