आणखी एक कोरोना बाधीत ; चंद्रपूरमध्ये कोरोना बाधीतांची संख्या पोहोचली 43 वर

◼️( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

Ø  आतापर्यंत 23 बाधित कोरोना मुक्त

Ø  अॅक्टिव्ह बाधीतांची संख्या 20

Ø  एक हजारावर नागरिक संस्थात्मक अलगीकरणात

चंद्रपूर, दि.10 जून : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री तीन व आज एक असे चार कोरोना बाधीत आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या 43 झाली आहे. चंद्रपूर शहरांमध्ये बुधवारी तुकूम परिसरातील सुमित्रा नगर भागात रहिवासी असणारे 45 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी आलेल्या अहवालात 45 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या आठ दिवसांपासून बाधीताला लक्षणे होती. वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्यांना 8 जून रोजी खासगी रुग्णालयातून दाखल करण्यात आले होते. काल 9 जूनला त्यांचा स्वॅब घेण्यात आला. त्यांच्या परिवारात त्यांच्यासह पाच जण असून अन्य सदस्यांचीही स्वॅब तपासणी केली जाणार आहे. या बाधीताची प्रवासाची कोणतीही नोंद नाही.

जिल्ह्यामध्ये काल मंगळवारी रात्री तीन नागरिकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार ब्रह्मपुरी तालुक्यातील जुगनाळा गावातील 43 वर्षीय एका बाधीतांची 33 वर्षीय पत्नी व पाच वर्षाचा मुलगा संपर्कातून पॉझिटिव्ह झाला आहे. या बाधितांना चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.अन्य एक बाधीत ब्रह्मपुरी तालुक्यातील बरड किन्ही येथील 22 वर्षाचा युवक असून अड्याळ टेकडी येथील बाधीताच्या संपर्कातील आहे. संस्थात्मक अलगीकरण कक्षात असलेल्या या युवकाला उशीरा लक्षणे दिसायला लागली. त्यामुळे त्याचे स्वॅब घेण्यात आले होते.

काल मंगळवारी एक कोरोना बाधीत कोरोना मुक्त झाल्यामुळे  सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत 23 बाधीतांना कोरोना मुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.सध्या अॅक्टिव्ह बाधीतांची संख्या 20 आहे. या सर्व बाधीतांची प्रकृती स्थिर आहे.

12 कंटेनमेंट झोन बंद तर 9 कंटेनमेंट झोन कार्यरत:

जिल्ह्यात एकूण 21 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे. यापैकी 12 कंटेनमेंट झोनचे 14 दिवस पूर्ण झाले आहे. त्यामुळे सदर झोन बंद करण्यात आलेले आहे. सध्या जिल्ह्यात 9 कंटेनमेंट झोन कार्यरत आहेत. आजपर्यंत एकूण 21 कंटेनमेंट झोनमधील आयएलआय रुग्णांचे 45 स्वॅब घेण्यात आलेले आहे. यापैकी सर्वच 45 नमुने निगेटिव्ह आले आहेत.

सर्व कंटेनमेंट झोनमध्ये रुग्णांचा व इतर सर्व रुग्णांचा नियमित पाठपुरावा सुरू आहे. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे.आयएलआय व सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे. तसेच आयएलआय व सारी रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्यात येत आहेत.

कोविड-19 संक्रमित 42 बाधीतांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून,रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधीतांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -2, हरियाणा (गुडगाव)-1,हैद्राबाद-1, मुंबई-7, ठाणे -3, पुणे-6, यवतमाळ -4, नाशिक -3, गुजरात-1, जळगांव-1, ओडीसा-1, कोणत्याही प्रकारचा प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटिव्ह रुग्णांचे सहवासीत – 13 आहेत.

कोविड-19 ची  सर्वसाधारण माहिती:

जिल्ह्यामध्ये 1 हजार 914 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 43 नमुने पॉझिटिव्ह,        1हजार 663 नमुने निगेटिव्ह तर 208 नमुने प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यातील एकूण संस्थात्मक अलगीकरणात 1हजार 180 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 485 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत. तालुकास्तरावर 409नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत. तर, जिल्हास्तरावर 286 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात 76 हजार 653 नागरिक दाखल झाले आहेत.तसेच 71 हजार 673 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 4 हजार 980नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.

चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधीत ), 13 मे ( एक बाधीत), 20 मे ( एकूण 10 बाधीत ), 23 मे ( एकूण 7 बाधीत),24 मे ( एकूण 2  बाधीत), 25 मे ( एक बाधीत ), 31 मे ( एक बाधीत ), 2 जून (एक बाधीत), 4 जून ( दोन बाधीत), 5 जून ( एक बाधीत),6 जून ( एक बाधीत), 7 जून ( 11 बाधीत),9 जून ( एकुण 3 बाधीत),10 जून ( एकुण 1 बाधीत),अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधीत 43 झाले आहेत. आतापर्यत 23 बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 43 पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता 20 आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *