जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उच्च गुणवत्तेचा कृषी निविष्ठा मुबलक प्रमाणात : डॉ.कुणाल खेमनार

⭕ ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

चंद्रपूर,दि. 12 जुन : खरीप हंगाम 2020 ला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उच्च गुणवत्तेच्या कृषी निविष्ठा (बी बीयाणे व रासायनिक खते) मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली आहेत.  पूर्ण हंगामात शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार उपलब्ध राहतील यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

◼️शेतकऱ्यांनी अशी घ्यावी कृषी निविष्ठा (बी-बीयाणे व रासायनिक खते) खरेदीच्या वेळी दक्षता:

कोविड-19 च्या  काळामध्ये स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत शेती संबंधित कामे करावी.

सर्व शेतकऱ्यांनी शक्यतो शेतकरी गटाच्या मार्फतीने बी बियाणे व रासायनिक खतांची खरेदी करावी, खरेदी करतांना  कृषी विक्री केंद्रात हॅंड सॅनिटायजरचा वापर करावा.

कृषी केंद्रात खरेदी करतांना शक्यतो एकमेकांपासून पाच फूट अंतरावर उभे राहावे,कृषी केंद्रात जातांना तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधणे आवश्यक आहे, कृषी विस्तार केंद्र,विक्री केंद्राच्या परिसरात गर्दी करु नये.

◼️रासायनिक खतांचा संतुलित व कार्यक्षम वापर करणे :

पिकांना एकूण विविध 16 अन्नद्रव्यांची आवश्‍यकता असते. जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य द्वारे व कृत्रिम रीत्या तयार केलेल्या रासायनिक खताच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची पूर्तता केली जाते.रासायनिक खतांची कार्यक्षमता ही 20 ते 80 टक्के दरम्यान असते. त्यामुळे सदर खतांचा कार्यक्षम व संतुलित वापर होणे गरजेचे आहे.

पिक पेरणीच्या वेळेस विद्यापीठाची शिफारस व आरोग्य पत्रिकेनुसार स्पुरद(पी) व पालाश(के) खतांची पूर्ण मात्रा द्यावी. नवयुक्त खतांची गरज मात्र सर्व अवस्थेत असल्यामुळे युरिया खताची मात्रा पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार विभागून द्यावी. पिकांना कमी प्रमाणात लागणारे परंतु अत्यंत आवश्यक असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा जमिनीतून अथवा फवारणी करून द्यावी. दर तीन वर्षांनी ते जमिनीतील मातीचे मृदा परीक्षण करून त्यानुसार रासायनिक खतांचा संतुलित व कार्यक्षम वापर करावा.

◼️खरीप हंगामात विविध बियाणांच्या खरेदीच्या वेळेस खालीलप्रमाणे शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी:

शेतकरी बांधवांनी खरेदी करत असतांना पिशवीला टॅग असल्याची खात्री करून घ्यावी, बियाणांची एक्सपायरी तारीख तपासून घ्यावी.विक्रेत्याकडून बि-बियाणे खरेदीची पक्की पावती म्हणजे बिल घ्यावे, बिलावर बियाण्यांची पीक आणि वान तसेच लॉट नंबर,बीयाणे खरेदीची तारीख लिहिल्याची खात्री करून घ्यावी.

बीयाण्याची तक्रार करता येण्याच्या दृष्टीने पेरतेवेळी पिशवीतून बियाणे टॅग असलेली बाजू सुरक्षित ठेवून खालील बाजूने फोडावी. बीयाण्यांचा थोडा नमुना पिशवीमध्ये किंवा बॉक्समध्ये राखून ठेवावा.जेणेकरून तो तक्रार निवारण अधिकाऱ्यास सादर करता येईल. बियाणे सदोष आढळल्यास तसेच एम आर पी पेक्षा अधिक रकमेची मागणी केली असता तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन नंबर 1800 233 4000 दूरध्वनी क्रमांक 07172- 27 1034 यावर तक्रार नोंद करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *