◼️ रविवार सप्तरंगातील – साहित्यरंग

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔴 शिक्षक कर्तव्य

बाजारातल्या कोपऱ्यात बसून गजू आपलं नेहमीचं चपला-बुट शिवण्याचं काम करत होता. कुणाची तरी चाहूल लागली म्हणून त्याने आपली मान वर केली.
“अरे ही चप्पल शिवायची आहे”
समोरची व्यक्ती त्याला ओळखीची वाटली.
“तुम्ही पाटील सर ना?”
त्याने विचारलं.
“हो.तू?”
“मी गजानन. गजानन लोखंडे. झेड.पी. च्या शाळेत दहावी ब च्या वर्गात होतो बघा. तुम्ही आम्हांला इंग्रजी आणि इतिहास शिकवायचे.”
“बरोबर. पण तुझा चेहरा ओळखू येत नाहीये” पाटील सर त्याला निरखत म्हणाले.
“असू द्या सर. मी कुणी हुशार विद्यार्थी नव्हतो की तुमच्या लक्षात राहीन”
“पण तू हा व्यवसाय का…..?”
“सर हा आमचा पिढीजात व्यवसाय! आजोबा, वडील दोघंही हेच करायचे. दहावी सुटलो. तेव्हापासून वडिलांची तब्येत ठीक नाहीये. त्यामुळे शिक्षण सोडून गेली तीन वर्षे हेच करतोय.”
“काय झालं वडिलांना?
“सतत दारु पिऊन त्यांचं लिव्हर खराब झालंय. त्यामुळे ते नेहमी आजारीच असतात”
“ओह!आणि तुझे भाऊ?”
“दोन भाऊ आणि एक बहीण तिघंही लहान आहेत. शिकताहेत. आई अशिक्षित.”
“अच्छा” पारील सर विचारात गढून गेले. गजूनं त्यांची चप्पल शिवून दिल्यावर तो नाही नाही म्हणत असतांनाही त्याच्या हातात दहा रुपये कोंबून निघून गेले.
काही दिवसांनी ते परत आले. गजूला म्हणाले “अरे माझ्या मापाचा एक बुट तयार करुन देशील?”
गजू तयार झाला. त्याने माप घेऊन दोन दिवसात तयार बुट करुन दिला. सरांना तो आवडला. त्यांनी गजू नाही म्हणत असतानाही पाचशे रुपये दिले. गजूला खुप आनंद झाला. इतके पैसे त्याला आजपर्यंत मिळाले नव्हते.
आता त्याच्याकडे नियमितपणे चपला बुट बनवण्यासाठी ग्राहक येऊ लागले. सगळे पाटील सरांनी पाठवलंय असं सांगायचे.
काही दिवसांनी सर आले. गजू त्यांना ग्राहक पाठविल्याबद्दल धन्यवाद देऊ लागला. त्यांनी त्याला थांबवलं. म्हणाले “गजू तुझ्या हातात कला आहे. तू असं का करत नाहीस इथंच एक टपरी टाकून त्यात वेगवेगळ्या साईजचे डझनभर चपलाबुट ठेवले तर गिर्हाईकांना थांबावं लागणार नाही”
“सर कल्पना चांगली आहे पण त्याला दहा पंधरा हजार लागतील. तेवढे पैसे नाहीयेत माझ्याजवळ”
“हरकत नाही. मी देतो तुला. पण मला तू ते सहा महिन्यात परत करायचे. चालेल?”
गजू तयार झाला. आठवड्यातच तो बसायचा तिथं टपरी उभी राहीली. महिन्याभरातच गजूचे पंधरा हजार वसूल होऊन दहा हजार नफाही हातात पडला. पाटील सर आल्यावर त्याने त्यांना पंधरा हजार दिले. त्यांनी ते त्याला परत केले.
“मी तुला सहा महिन्यांची मुदत दिली होती. सहा महिन्यानंतरच मला परत कर. तोपर्यंत तुझा धंदा वाढवण्यासाठी त्याचा उपयोग कर.”
गजूचा आता उत्साह वाढला. त्याने जास्त माल ठेवायला सुरवात केली. उत्तम दर्जा आणि कमी किमतीमुळे त्याच्या टपरीवर खुप गर्दी व्हायला लागली. आता त्याला वेळ पुरेनासा झाला.
सहा महिन्यांनी सर आले. गजूच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास फुलून आला होता.
“सर खुप चांगलं चाललंय. पण आता पुढं काय करायचं”
“गजू आता चांगल्या मार्केटमध्ये दुकान भाड्याने घ्यायचं. तिथे हे सगळं शिफ्ट करायचं. मी पाहून ठेवलंय दुकान. अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. आणि हो! स्माँल स्केल इंडस्ट्रीसाठी जे कर्ज मिळतं ते तुला मिळवून देतो. एम.आय.डी.सी.मध्ये फँक्टरी टाकून दे”
“काय?फँक्टरी?”गजू थरारला” सर मला जमेल का?”
“सगळं जमेल. मी आहे ना” सर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले.
गजूने खाली वाकून त्यांचे पाय धरले.
“सर खुप करताय माझ्यासाठी”
“अरे ते माझं कर्तव्यच आहे” त्याला उठवत ते म्हणाले” माझे बाकीचे विद्यार्थी परदेशात नोकऱ्या करताहेत. कोणी इथे मोठे अधिकारी आहेत. तूच एकटा मागे रहावा हे मला कसं पटावं?” गजूच्या डोळ्यात पाणी आलं.
दोन वर्षात गजू खुप पुढे गेला. फँक्टरी वाढली.एकाची तीन दुकानं झाली. गजूचा गजानन शेठ झाला. झोपडपट्टीतून तो थ्री बी.एच.के.फ्लँटमध्ये रहायला गेला. भाऊबहीणी चांगल्या शाळा काँलेजमध्ये जाऊ लागले. दरम्यान त्याचे वडील वारले. वडील गेल्यावर एका वर्षाने त्याचं लग्न झालं. मुलगी पसंत करायला तो पाटील सरांनाच घेऊन गेला होता. काही दिवसांनी त्याची आई वारली.
इकडे पाटील सरांना निवृत्त होऊन पाच वर्षे झाली होती. सर आता थंकले होते. त्यांच्या मुलाने इंग्लंड मध्येच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. मुलगी अगोदरच आँस्ट्रेलियात स्थायिक होती. त्यामुळे सर दुःखी होते. त्यात त्यांच्या पत्नीची तब्येतही आजकाल ठीक नसायची.
एक दिवस सरांची पत्नी गेल्याचा संदेश गजूला मिळाला. सर्व कामं सोडून तो त्यांच्या घरी धावला. सरांची मुलगा,मुलगी वेळेवर पोहचू शकले नाहीत. ते येण्या अगोदरच अंत्यविधी पार पाडावा लागला. पण गजूने सरांना कोणतीच कमतरता तर जाणवू दिली नाही. शिवाय तेराव्या दिवसापर्यंतचा सगळा खर्चही त्यानेच केला.
सगळं आटोपल्यावर सरांच्या मुलाने त्यांना इंग्लंडला चलायचा खुप आग्रह केला पण सरांनी मायदेश सोडायला साफ नकार दिला. सगळे निघून गेल्यावर सरांचं एकाकीपण सुरु झालं ते गजूला बघवत नव्हतं पण त्याचाही नाईलाज होता.
एक दिवस बायकोला घेऊन तो सरांच्या घरी पोहचला. त्याला पाहून सरांना आश्चर्य वाटलं.
“सर तुमचे माझ्यावर खुप उपकार आहेत. आज मला अजून एक मदत कराल.?”
“अरे आता तुला मदतीची काय गरज? तू आता खुप मोठा झालाय. बरं ठिक आहे सांग तुला काय मदत हवी आहे?”
“सर माझे वडील व्हाल?”
सर स्तब्ध झाले. मग म्हणाले”अरे वेड्या मी तर तुला कधीचंच आपला मुलगा मानलंय”
“तर मग मला मुलाचं कर्तव्य करु द्या. मी तुम्हाला माझ्या घरी न्यायला आलोय. तुमचं उरलेलं आयुष्य तिथंच काढावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे” गजू हात जोडत म्हणाला.
“अरे पण तुझ्या बायकोला विचारलं का?”
“सर तिला विचारुनच मी हा निर्णय घेतलाय. तिलाही वडील नाहीयेत. तुमच्यासारखे सासरे वडील म्हणून मिळाले तर तिलाही हवेच आहेत. शिवाय पुढे मुलं झाल्यावर त्यांनाही आजोबा हवेतच की!”
“बघ बुवा. म्हातारपण फार वाईट असतं. मी आजारी पडलो तर तुलाच सर्व करावं लागेल.
“मुलगा म्हंटलं की ते सगळं करणं आलंच. सर तो सारासार विचार करुनच मी आलोय”
सर विचारात पडले. मग म्हणाले” ठीक आहे येतो मी पण माझी एक अट आहे. मला तू सर म्हणायचं नाही”
“मी माझ्या वडीलांना अण्णा म्हणायचो तुम्हालाही तेच म्हणेन”
सर मोकळेपणाने हसले.
“अजून एक अट. तुझ्यासारखे अनेक गजू आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. त्यांना गजानन शेठ व्हायला मला मदत करायची”
😥गजूला गहिवरुन आलं. त्यानं सरांना मिठी मारली. दोघंही बराच वेळपर्यंत रडत होते.

🔵 संकलन- फुलचंद भगत,
         मंगरूळपीर जि. वाशिम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सध्या लॉकडाऊनमुळे फेसबुकवर बरीच मित्र मंडळी आपले अनुभव कथन करताना आपण बघतो, वाचतो. फेसबुकवर साधारणतः मी सांस्‍कृतीक या विषयावर लिखाण करतो. दररोज नाटय तसेच इतर विधांशी संबंधीत एका कलावंताच्‍या कार्यावर प्रकाशझोत टाकण्‍याचा प्रयत्‍न मी आजपासुन करणार आहे. माझा हा प्रयत्‍न लॉकडाऊन दरम्‍यानच नाही तर नेहमीसाठीच मी सुरु करतोय. एक-दोन दिवसाचा खंड पडेलही कदाचित पण मी माझ्या या सहका-यांवरचे प्रेम माझ्या परीने व्‍यक्‍त करणे सुरुच ठेवणार आहे. या मालिकेतील माझे पहिले पुष्‍प म्‍हणजे माझे सन्‍मित्र, चित्रकार, अभिनेते, नाटककार असे बहुमुखी प्रतिभेचे धनी, झाडीपट्टी रंगभुमीवरचे गाजलेले नाव श्री. सदानंद बोरकर…

        सदानंद बोरकर माझे अतिशय जवळचे मित्र. माझा सदाभाऊ. चंद्रपूर जिल्‍हयाची नाटयपंढरी गौरवील्‍या जाणा-या नवरगावचे हे सुपुत्र. कै. बालाजी पाटील बोरकर यांचे नातु. व्‍यंकटेश नाटयमंडळ या नाटयसंस्‍थेच्‍या माध्‍यमातुन संपन्‍न नाटय परंपरा बालाजी पाटलांनी निर्माण केली आहे. घरातच नाटकाचे संस्‍कार, बाळकडू मिळालेले सदाभाऊ केवळ अभिनेते नसुन चित्रकार, नाटय लेखक, नाटय दिग्‍दर्शक, नेपथ्‍यकार आहे. नाटकाशी संबंधीत सर्व जवाबदा-या ते यशस्‍वीपणे व लिलया पार पाडतात. नागपूरच्‍या शासकीय चित्रकला महाविद्यालयातुन व नंतर कॅम्‍पस मधुन शिक्षण घेतलेल्‍या सदाभाऊंनी प्रामुख्‍याने ग्रामीण घटकांना रेखाचित्रांचा विषय बनवुन हजारो चित्रे काढलीत, प्रदर्शने भरविलीत. गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्‍या शांतीनिकेतनची प्रेरणा घेवुन नवरगाव सारख्‍या छोटयाशा गावात 25 वर्षापुर्वी चित्रशाळेची निर्मिती केली. ग्रामीण कलावंतासाठी चित्रकलेचे हक्‍काचे व्‍यासपीठ निर्माण करुन दिले. चित्रकार स्‍व. धनंजय नाकाडे यांचा त्‍यांच्‍या व्‍यक्‍तीमत्‍वावर विशेष प्रभाव. या प्रभावातुनच चित्रकार धनंजय नाकाडे आर्ट गॅलरीची निर्मिती त्‍यांनी केली. या ठिकाणी शेकडो पेंटींग्‍ज कायम स्‍वरुपी असतात. नियमित राष्‍ट्रीय कॅम्‍पचे आयोजन ते सातत्‍याने करतात.

चित्र आणि नाटय या दोन्‍ही अंगाने विचार केला तर सदानंद बोरकर हा खराखुरा रंगवेडा माणुस आहे. वयाच्‍या 10 व्‍या वर्षी नाटकात त्‍यांनी पहिल्‍यांदा काम केले. श्री. व्‍यंकटेश नाटयमंडळाचे वय 130 वर्षाहुन अधिक आहे. अशा या वयोवृध्‍द नाटयमंडळाचे तरुण दिग्‍दर्शक असलेले सदाभाऊ कुशल दिग्‍दर्शक आहे. 100 हुन अधिक नाटकांमधुन त्‍यांनी भुमिका केल्‍या. 8 नाटकांचे लेखन त्‍यांनी केले. नाटकांचे विषय सामाजिकच असावे असा त्‍यांचा कायम आग्रह असतो. वास्‍तवाचे भान ठेवुन सजगतेने नाटक लिहिणारा हा माणुस प्रतिभावान नाटय लेखक आहे. माझं कुंकू मिच पुसलं हे त्‍यांचे नाटक सत्‍य घटनेवर आधारीत होतं. हे नाटक प्रचंड गाजलं. रेकॉर्डब्रेक प्रयोग या नाटकाने केले. त्‍याचप्रमाणे आत्‍महत्‍या हे नाटकसुध्‍दा खुप गाजले. ही दोन्‍ही नाटके गोंडवाना विद्यापीठाच्‍या मराठी विभागात एम.ए. च्‍या अभ्‍यासक्रमात समाविष्‍ट करण्‍यात आली ही बाब त्‍यांच्‍या चाहत्‍यांसाठी निश्चित भुषणावह आहे. 99 वे अखिल भारतीय मराठी नाटय संम्‍मेलन गेल्‍या वर्षी नागपूरात झाले. या संम्‍मेलनात अस्‍सा नवरा नको गं बाई हे नाटक सादर करण्‍याचा सन्‍मान सदाभाऊंना मिळाला. विशेष म्‍हणजे उत्‍तररात्री सादर झालेल्‍या या नाटय प्रयोगाला सभागृह खचाखच भरले होते. ही सदानंद बोरकर या नावाच्‍या श्रेष्‍ठत्‍वाची पावती होती.

आत्‍महत्‍या या नाटकाची निवड सार्क इंटरनॅशनल थिएटर महोत्‍सवात भारताकडुन निवड होणे ही बाब त्‍यांच्‍यासह चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या सांस्‍कृतीक वर्तुळाची मान अभिमानाने उंच करणारी ठरली. अनेक प्रतिष्‍ठेच्‍या पुरस्‍कारांनी त्‍यांना सन्‍मानीत करण्‍यात आले आहे. नुकतेच नाटककार रत्‍नाकर मतकरी यांचे निधन झाले. मतकरींच्‍या संस्‍थेने सुध्‍दा सदाभाऊंचा गौरव केला. लोकमत महाराष्‍ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्‍कारासाठी नामांकन, जेसीजचा यंग इंडियन हा राष्‍ट्रीय पुरस्‍कार, विदर्भ रत्‍न पुरस्‍कार अशी मोठी मालिका या कलावंताने निर्माण केली व स्‍वतः सन्‍मान मिळवत चंद्रपूर जिल्‍हयाचा गौरव वृध्‍दींगत केला. महाराष्‍ट्र टाईम्‍स आणि पुण्‍यनगरी या वर्तमान पत्रांच्‍या पुरवणीमधुन ललित कलेवर लेख मालिका सुध्‍दा ते लिहितात. बोरकर परिवाराशी माझा विशेष स्‍नेह. परमानंद काका, काकू यांचे प्रोत्‍साहन आणि सौ. योगीता वहिनींची खंबीर साथ हे सदाभाऊंचे बलस्‍थान आहे.

साधारणपणे तीन वर्षांपूर्वी सदाभाऊ गंभीर आजारी झाले , ब्रेन स्ट्रोक च होता तो. मोठा धक्का होता तो सर्वांसाठी. मेहरा डॉक्टरांकडे ऍडमिट असताना सदाभाऊना बघवतच नव्हते. शुद्ध नसलेला सदाभाऊ बघताना काळीज चिरून निघत होते. योगिता वहिनीच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. प्रोग्रेस नव्हती म्हणून पुढे नागपुरला हलवले.सुधार होईना . मी मुंबईत होतो . एक दिवस त्यांचा साळा कोमल चा फोन मला आला , ओक्सोबोक्षी रडला.माझ्या पायाखालची जमीन सरकली. टॅक्सीने थेट सिद्धिविनायकाच्या मंदिरात गेलो . साकडे घातले विनायकाला. त्याची कृपा सदाभाऊ पूर्ण बरे झाले . पुन्हा जेव्हा ते एकदा मुंबईत आले तेव्हा मी त्यांना घेऊन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला नेले. पण त्या कालावधीत झाडीपट्टीत सदाभाऊंच्या प्रकृतीसाठी अनेक ठिकाणी पूजा अर्चा झाली. ही या माणसाची खरी कमाई आहे .

माझे सर्वाधिक गाजलेले चिंधी बाजार या नाटकाचा प्रयोग सदाभाऊ ने नवरगाव येथे लावला . प्रयोगाला भरभरून दाद मिळाली. मध्यंतरात सदभाऊंनी मला आणि दिग्दर्शक जयाताई ला मंचावर बोलावले. पुढे नजर टाकली तर 6 हजारावर प्रेक्षक . मी जाहीर सभेलाच बघितले होती एवढी माणसं . तो प्रचंड प्रतिसाद बघून झालेला आनंद अवर्णनीय होता. नंतर कळलं की हाऊसफुल्ल चा बोर्ड लावला गेला होता व उद्या पुन्हा प्रयोग आहे असे सांगून प्रेक्षकांना परत पाठविण्यात आले होते. उत्तमोत्तम कलाकृती देणाऱ्या सदभाऊंसारख्या कलावंतांमुळेच असं घडू शकत.

बहुआयामी प्रतिभेचे धनी असलेले सदानंद बोरकर म्‍हणजे सळसळती ऊर्जा, कलेवर प्रचंड प्रेम करणारा कलंदर, त्‍यांच्‍या सोबतच्‍या चर्चेत नाटक, चित्रकला यांच्‍या संदर्भांना कमतरताच नसते. मी माझ्या पुरते बोलायचे झाल्‍यास मी ब-याच गोष्‍टी त्‍यांच्‍या सोबतच्‍या चर्चेतुन आत्‍मसात केल्‍या. हा कलावंत जिंदादील मित्र सुध्‍दा आहे. ज्‍येष्‍ठ दिग्‍दर्शक अरुण नलावडे यांनी दिग्‍दर्शीत केलेल्‍या ताटवा या चित्रपटाचे कला दिग्‍दर्शन करण्‍याची संधी सदाभाऊंना मिळाली. हा चित्रपट किती गाजला हा भाग वेगळा मात्र चित्रपटाच्‍या कला दिग्‍दर्शनाचे विशेष कौतुक झाले. लिहिण्‍या सारखे बरेच आहे. सदाभाऊंच्‍या हातुन नाटय, चित्रकला या क्षेत्राची सदोदीत अशीच सेवा घडावी हीच या निमित्‍ताने सदिच्‍छा आणि शुभेच्‍छा…

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

◼️ नवरगाव ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर येथील श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाची विद्यार्थिनी पल्लवी राजू निमसटकर हिने काढलेल्या रांगोळीची निवड अखिल भारतीय (National) आॅनलाईन रांगोळी स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔴 ‘रिटर्नगिफ्ट

               ‘ जसे  पेराल तसे उगवेल ‘  ह्या म्हणण्या प्रमाणेच आपण जर प्रत्येकाला प्रेम देत गेलो तर मग ते कोणीही असोत मित्र-मैत्रिणी किंवा आप्तस्वकीय वा निसर्ग असो ते तुम्हाला रिटर्न प्रेम देतेच, जसे की आपण शुभेच्छा देतो त्याच शुभेच्छा आपल्याला आठवणीने ती व्यक्ती परत देते अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या आपल्याला परत मिळते तसेच सृष्टिचे सुद्धा, निसर्ग शाश्वत सत्य आहे मानव एखाद्यावेळी बेईमान होईल परंतु निसर्ग कधीच बेईमान होत नाही तो रिटर्न गिफ्ट देतोच देतो कधीकधी तर तो दुपटीने, तिपटीने सुद्धा देतो.

आता कोरोनाचेच उदाहरण घेऊया, कधी कुणी स्वप्नातही विचार केला नसेल की अशा प्रकारचा विषाणू कधी आपल्या आयुष्यात येणार म्हणून आतापर्यंत बरेचसे विषाणू आले-गेले महामारी, प्लेग यासारखे असाध्य आजार आले आणि गेले देखील परंतू कोरोना हा विषाणू भयंकरतेचा कळस आहे याचे हेच कारण असावे कदाचित, काही काळ मागे वळून बघता मानवाने जी प्रगती केली आहे ती मानवाची उन्नती आहे आणि ते गरजेचे आहे, परंतु कुठेतरी ते निसर्गाला धोकादायक ठरत आहे आणि त्याचे परिणाम म्हणजे प्रदूषण, दुष्काळ, चोरी मारामारी हे सगळे अनुभव आपण अनुभवतोच आहोत मोठ मोठ्या कंपन्या, अत्याधुनिक यंत्रे, वाहने प्रदूषणाला वाढवण्याचे काम करत होते ह्या दोन महिन्यांत थोड्याफार प्रमाणात प्रदूषणाची लेवल खूप कमी झालेली दिसून आली कारण बाहेर पडणारे किंवा कामानिमित्ताने प्रवास करणारे लोक यांच्यामुळे जी गर्दी झाली होती ती काही काळ थांबली. वाहनांची रेलचेल रस्त्यावर वाढत्या प्रमाणात होती रस्ते दिवस-रात्र धावत होते त्यांना थोडा विश्राम मिळाला, काही का असेना अपघाताचे चे प्रमाण कमी म्हणजे नाही च्याबरोबर झाले त्यामुळे ट्राफिक पोलीस यंत्रणा इकडे व्यस्त न राहता कोरोना मुळे जी परिस्थिती निर्माण झाली तिकडे पोलीस यंत्रणा पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकली. त्याचप्रमाणे हाॅर्नचा आवाज किंवा पेट्रोलच्या धुरामुळे प्रदूषण वाढले होते प्राणी पक्षी स्वच्छंद विहार करू शकत नव्हते आज प्राणी जंगलातून बाहेर पडताना दिसत आहे पक्षांचे थवे त्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला. आकाशामध्ये विमान फिरताना दिसत नाही त्यामुळे आकाशात पक्षी स्वच्छंद विहार करू लागले त्याचप्रमाणे विदेशी पदार्थ, हॉटेलिंग, ऑनलाइन पदार्थ मागवून खाणे यासारखे पदार्थ खाण्यावर लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचाच कल होता, वेगवेगळे आकर्षक रंगीबेरंगी पदार्थांचे फोटो पाहून ते खाण्यासाठी सर्व बाहेर पडू लागले. कधी कधी सुट्टी म्हणून बाहेर जेवायला जावेसे वाटणे हा वेगळा भाग आहे. कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असो घरी करायचा नाही पूर्वी लग्नापासून ते बारशापर्यंत घरीच स्वयंपाक होत असे आता केटरर्स आहेत. ह्या सर्व गोष्टी सोईसाठी पण अतिरेक व्हायला नको ह्या सर्व गोष्टींना कुठेतरी आळा बसला. सर्व परिवार एकत्र येऊन नवनवीन पदार्थ करून आवडीने खात आहेत घरातील लहान मोठी पुरुष मंडळी देखील स्वयंपाक घरात डोकावून बघताना दिसली पूर्णपणे कुठलीच गोष्ट चांगली किंवा वाईट नसते यामध्ये फायदे पण होते एकटी राहणारी बाहेर शिकणाऱ्या मुलांना अडीअडचणीला पटकन जेवण मागवता येत होते हा फायदा देखील होता परंतु त्याचा आता अतिरेक व्हायला लागला होता. आता लाॅकडाऊन मुळे पर्यायच उरला नाही बाहेर सर्व बंद त्यामुळे आपण सर्व घरात बंद, आईच्या हातचे वेगवेगळे पारंपारिक पदार्थच नाही तर फास्टफूड सुद्धा सर्व घरीच बनवले जाऊ लागले, अनावश्यक खर्च बंद झाले घरात सर्व असल्याने एकमेकांना वेळ मिळतो एकमेकांसोबत तो घालवता येतो ‘मला वेळ नाही’ हे वाक्य खोडल्या गेले काही काळापुरते तरी, मोबाईल वर गेम खेळणे सोबतच इतरही इनडोअर खेळ आता सर्व कुटुंब मिळून खेळताना दिसते माझ्या लहानपणीचे खेळ मला आठवले ते दिवस परत आले असे वाटून गेले घरातच वेळ कसा जाईल याची खबरदारी आपण सर्व घेऊ लागलो. आता घरात आजी आजोबांच्या गोष्टी आवडू लागल्या, घर कामात मदत करणारी मावशी येत नसल्याने छोट्या-मोठ्या कामात आईला पती, मुलं मदत करू लागले ह्या सगळ्या गोष्टींचा कंटाळाही येतो परंतु असे दिवस येणार नाही ह्याच आशेने सर्वजण जगत आहे, त्या वेळेचा संधीचा सर्व सदस्य उपयोग करून घेताना दिसतो, वाळवणाचे पदार्थांपासून ते प्रत्येक गोष्ट जी लोप पावत चालली होती ती परत नव्याने होताना करताना दिसली सोशल मीडिया पूर्वीपेक्षा जास्त एक्टिव झाला आपण काय करतो हे इतरांना दाखवण्यासाठी लाईक कमेंट किंवा कौतुक करून घेण्यासाठी का होईना आपण तिथे केलेल्या कामाची पोस्ट करतो तो आनंदही निराळाच. वाढदिवस, मुंज, साक्षगंध, लग्नाचा वाढदिवस ह्यासारख्या कार्यक्रमांना उत येत होता हे सर्व पैशावर अवलंबून असते तरी पण देखा देखी मध्ये करणाऱ्यांची सुद्धा काही कमी नव्हती, मग तो तसाच करण्यासाठी पैसे असो वा नसो हट्टाने कार्यक्रम करण्यावर भर देण्यात आला. अतोनात पैसा खर्च करून कर्जबाजारी होण्यापेक्षा साधे पनाने वीस-पंचवीस लोकात विवाह उरकू लागले लग्न समारंभावर होणारा अतोनात खर्च, वेळ वाचवू लागलो हे आणि असे कितीतरी उदाहरणे देता येतील सर्व जीवनपद्धतीच बदलून गेली आहे त्या सर्व गोष्टी घडण्यासाठी हा बदल निर्माण होण्यासाठी कोरोना सारखा विषाणू यावा हे कुणीच अपेक्षीले नव्हते परंतु मानव प्रवाहासोबत इतका वाहवत चालला होता की त्याला आवर घालणे त्याला स्वतःलाच काय कुणालाही शक्य नव्हते तो फक्त निसर्गच आहे ज्याच्यामध्ये विलक्षण अफाट शक्ती आहे तो तारतोही आणि मारतोही.

                  आम्हाला शाळेत असताना निबंध असायचा ‘निसर्गाचा कोप’ किंवा ‘विज्ञान शाप की वरदान’ तो खरंच आता आठवायला लागला आहे प्रत्येक जण शहराकडे धावत होता आता सध्या खेड्यातले जीवन सुरक्षित आहे संतांनी सांगून ठेवल्याप्रमाणे जुनं ते सोनंच, खेड्यांकडे वळा… स्वच्छता पाळा सर्व म्हणींचा विसर पडत चालला होता. हे सर्व सांगायचे तात्पर्य म्हणजे कोरोना आला पाहिजे होता असे म्हणायचे नाही तर, जी गोष्ट आली आहे त्यापासून आपण काहीतरी शिकवण घेतली पाहिजे आपणच निसर्गावर ह्या सर्व प्रकारे अन्याय, अत्याचार केला त्यानेच आपल्याला हे ‘रिटर्न गिफ्ट’ दिले असे समजून ते चांगले आहे का वाईट आपणच ठरवू या. कोरोनामुळे तोटे तर खूपच आहेत त्याला पळवून लावू या आणि तो लवकर जाणार ही खात्रीच नाही तर विश्वास आहे. परंतु ज्यांनी ही शिकवण आपल्याला दिली जे काही घरात राहून आपण शिकलो त्याचा परत विसर पडायला नको, हे लाॅकडाऊन सुटल्यावर परत तोच अतिरेक व्हायला नको तर कोरोनाचे हे रिटर्न गिफ्ट आपण सुरक्षित राहून काळजी घेऊन तो पुन्हा कधी येणार नाही असे गिफ्ट त्याला देऊ आपल्याला निसर्गाने दिलेले हे रिटर्न गिफ्ट आहे कोरोना.

◼️लेखन ___
 सौ.किरण घनश्याम पिंपळशेंडे. ©
☎️ :- ९९६०३५२९०५

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

◼️कोविड – १९

कोरोना हे कोरोना तुझ्यामुळे
असे कसे बघा हे दिवस आले
दिवस रात्र चालणारी माणसे
अचानक सर्व घरातच बंद झाले

धरती सुखी अन् माणसे केली दुःखी
प्राणी पक्षी स्वछंद विहरू लागले
पुन्हा एकदा निसर्ग हसतांना बघितला
घरातच राहून मानव कंटाळू लागले

कोवीड १९ हा विषाणू आला कसा
वाटतो कधी हा निसर्गाचा घाला
अतिरेक केला प्रदूषण, भ्रष्टाचाराचा
मानवानेच त्याच्यावर अत्याचार केला

सेवा करून अहोरात्र मानवाच्या
डाॅक्टर, पोलीस बघा देवदूत झाले
जगावर आलेल्या संकटात धावून
मनामध्ये देवांचे स्थान प्राप्त केले

अदृष्य असूनही पसरतो सर्वदूर
माणूस माणसाला घाबरतो आता
कहर झाला एका विषाणूंमुळे
सांगा कोरोना तुम्ही कधी जाता

🔴 कवियत्री :- सौ. किरण पिंपळशेंडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *