◼️रविवारच्या साहित्यरंगातील-सप्तरंग

    बायको – (नवऱ्याला फोन करून) अहो,

           ट्रॅफिक पोलिसांनी मला दंड ठोठावलाय

   नवरा – का, गं?, कशासाठी?

  बायको – माझ्याकडे लायसन्स नाही म्हणून

   नवरा – अगं, पण तुझ्याकडे तर लायसन्स होतं ना.

  बायको – हो, पण त्यावरचा फोटो चांगला नाही आला.

            म्हणून मी त्यांना दाखवलाच नाही.

🔴  विहीर…

एका गृहस्थाने आपली विहिर शेजा-याला विकली. नवा मालक या विहिरीचे पाणी काढायला गेला असता, विहिरीचा पहिला मालक त्याला पाणी भरु देईना.

आश्चर्यचकीत झालेल्या नव्या मालकानं त्याला विचारलं, ‘अरे ! मी पूरेपूर पैसे मोजून तुझी जमीन विकत घेतली असताना, तू मला तिचे पाणी का भरु देत नाहीस?’

जुना मालक म्हणाला, ‘मी तुला केवळ विहीर विकली आहे. तिच्यातलं पाणी काही विकलेलं नाही. तेव्हा त्या पाण्यावर तुझा बिलकूल हक्क नाही.’

या अजब तर्कटाने संतापलेला त्या विहिरीचा नवा मालक न्यायालयात गेला. न्यायमुर्तींनी त्या विहीरीच्या नव्या व जुन्या दोन्ही मालकांना बोलावून घेतलं आणि त्या जुन्या मालकाला विचारलं, ‘तू तुझी विहीर या तुझ्या शेजा-याला विकलीस हे खरे आहे काय?’

जुना मालक – होय. पण विहिरीचं जे विक्रीखत झाले आहे त्यात मी माझी फ़क्त विहिरच काय ती याला विकली असल्याचा उल्लेख केला असल्याने, त्या विहिरीतील पाण्यावर या माझ्या शेजा-याचा बिलकूल हक्क नाही.

न्यायमुर्ती – तुझं म्हणणं अगदी शंभर टक्के बरोबर आहे.

जुना मालक – (आनंदून) न्यायमुर्ती ! आपल्यालासुध्दा माझं म्हणण रास्त वाटत आहे ना ? वाटणारच. पण असं असूनही हा माझा शेजारी, केवळ ती विहिर विकत घेतली, म्हणून तिच्यातील पाण्यावर हक्क सांगतो आहे !

न्यायमुर्ती – ते त्याचं म्हणणं चूक आहे, पण त्याचबरोबर, तू तुझी विहीर विकली असूनही पाणी ठेवण्यासाठी तिचा वापर करतोस. तेव्हा आता त्या विहिरीचा असा वापर करीत राहीपर्यंत दर दिवशी पन्नास रुपये भाडे त्या विहिरीचा आता मालक झालेल्या तुझ्या शेजा-याला दिले पाहिजेस.

न्यायमुर्ती असे म्हणताच, तो खट मनुष्य़ त्यांना शरण गेला व केल्या अपराधाबद्दल क्षमा मागून, त्याने ती विहिर शेजा-याला पाण्यासह विकत दिल्याचे मान्य केले.

🔴❗ चिंतन ❗

दूधाला दुःख दिले की दही बनते.
दह्याला दुखावले की ताक बनते.
ताकाला त्रास दिला तर लोणी बनते.
आणि लोण्याला लोळवले तर तूप बनते.
दुधापेक्षा दही महाग.
दह्यापेक्षा ताक महाग.
ताकापेक्षा लोणी महाग.
लोण्यापेक्षा तूप महाग.
परंतु या सर्वांचा रंग एकच, शुभ्र.
याचाच अर्थ पुन्हा पुन्हा संकटे आणि दुःख झेलुनही जो माणुस आपला रंग बदलत नाही अश्या माणसाची समाजातील किम्मत जास्त असते.
दूध उपयोगी आहे पण एक दिवसात नासते.
दूधाचे विरजण दही दोन दिवस टिकेल.
दह्याच्या घुसळलेल्या ताकाचे दिवस तीन.
ताकामधले लोणी आठवडाभर राहील.
पण लोण्याचे कढवलेले तूप मात्र कधीही खराब होत नाही.
आता बघा आहे की नाही गंमत, एका दिवसातच नासण्याऱ्या दूधात कधीही न नासणारे तूप लपले आहे…!
तसेच आपले मन अथांग आहे. त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा…!

चिंतन करा, मनन करा आणि आपले जीवन तावुन सुलाखून त्यातुनच बाहेर पडलेले तुम्ही..!
म्हणजेच कधीही न हरणारे एक सदाबहार व्यक्तीमत्व
बना…!!

🔴  कवितेच्याप्रत्येक ओळीत

लिहितांना कविता तुझी
एकेक शब्द सुचवायचो
कवितेच्या प्रत्येक ओळीत
सखे तुलाच मी बसवायचो

थकायचे हे नाजुक नयन
तुला गर्दित शोधताना
रडायचा गजराही मग तो
केसांत तुझ्या माळताना

पानावरचा दवबिंदू तो
पाहुन तुला हसायचा
चेहरा तुझा त्या दवबिंदूत
लाजताना सुंदर दिसायचा

हवेत उडणारे केस तुझे
एका हातानी सावरायचीस
हळव्या या माझ्या मनाला
तू पुन्हा पुन्हा आवळायची

चालतांना तुझ्या त्या सखे
पैजनांचा आवाज यायचा
माझ्या हातात हात तुझा
असा उगाच भास व्हायचा

यमक शोधता शोधता
अलंकारही मी सुचवायचो
कवितेच्या प्रत्येक ओळीत
सखे तुलाच मी बसवायचो..!!

◼️ विशाल मोहुर्ले
     मु.पवनपार ता. सिन्देवाही
     जि. चंद्रपूर

****************************

◼️आरसा….
कळले रे मजला कोण अन् कसा मी
आपल्याच सावलीला घाबरणारा ससा मी…

अंगणात चांदण्यांचा सुरेख दिखावा अन्
अंधारलेल्या झोपडीचा एकटाच कवडसा मी…

चोर म्हणून केली त्यांनी जगभरात माझी ख्याती (?)
अन् रोज कुरवाळते माय बाळ इवलासा मी…

ओळखीच्या गावात माझा जयजयकार ओळखीचा
जिथे अनोळखी गाव तिथे त्यांच्या ओळखीचा ठसा मी…

मी पाण्यात खोल खोल अन् ते वरती तेल तेल होते
लागलो चमकाया जेव्हा, म्हणे त्यांचाच घेतला वसा मी…

देऊ कोणास काय मी माझा मला न चेहरा
उकिरड्यावर रक्तबंबाळ, सडलेला घायाळ आरसा मी…

फाटलेल्या पदराला बांधलेला एक रूपया
भिक्षापात्रात खणाणनारा तोच एक भरवसा मी..
◼️ खुशाब लोनबले

          पवनपार ता. सिन्देवाही, जि. चंद्रपूर

प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते .
पण इथे तर ते सेम नसते तर एकतर्फी गेम ठरते, जे त्याचे किंवा तिचे आयुष्य बरबाद करते…
खर तर एकतर्फी प्रेम हा विषय फारच गहन आहे, कारणही तसेच आहे ना ?
या प्रेमात समोरच्याची संमती नसते आणि म्हणूनच तर एकतर्फी !!
एकतर्फी प्रेम आणि त्याहून अधिक गंभीर म्हणजे याचे दुष्परिणाम….
एकतर्फी प्रेम निस्वार्थ असेल तरच ते ठीक म्हणजे मनाच्या कप्प्यात त्या प्रिय व्यक्तीस आयुष्यभर जपून ठेवले जाईल. पण जर स्वार्थ डोकावला तर मात्र आपण एकतर्फी प्रेमाच्या बर्‍याच कथा ऐकून, वाचून आहोतच की…
त्यातून खून, बलात्कार हे असले प्रकार उघडकीस आले आहेतच की…
किती तरी ठिकाणी या एकतर्फी प्रेमाला मालकी हक्क समजून, तिने किंवा त्याने तिच्याशिवाय कोणाशी बोलू नये हि वृत्ती अथवा असमंजस पणा ह्यामुळे समज गैरसमज होऊन अनेक विपरीत गोष्टी घडत असलेल्या दिसून येतात.
अशा एकतर्फी प्रेमप्रकरणांमुळे अॅसिड हल्ले होत असलेले निदर्शनास येत आहेतच की …
तसे पाहिले तर अशा गोष्टी घडतात तेव्हा ते प्रेम नसतेच मुळी,
तर तिला कुठेतरी एक वासनेची झालर असते म्हणून तर अशा दुर्घटना घडतात ना…
नकळतपणे का असेना पण वयात येणाऱ्या मुलांमध्ये सिनेमा हा प्रेमाचे एक कारण ठरतो ,
एकतर या वयात होणारे शारीरिक व मानसिक बदल कुतूहल निर्माण करतात,
त्यात भर पाडण्याचे काम कित्येकवेळा सोशल मिडिया, सिनेमाचा प्रभावामुळे दिसून येतो…
एकतर्फी प्रेम हे फार विलक्षण प्रकार आहे यात एकाचे दुसर्‍यावर प्रेम असते पण समोरच्याचे असेल की नाही याची शाश्वती नाही, याचे प्रेम समोरच्यास जाणवत असते ही जाणीव पण काही कारणास्तव ती पुढची व्यक्ती ते नाकारत असते रिस्पॉन्स न येणं या मग कारण असू शकतात….
एक जण कोणावर प्रेम करत तेंव्हा त्याच्या मनात तेच समोरच असत….
पण असे हे एकतर्फी म्हणजे मनाची दोन टोक….
कोणतीही अपेक्षा.. प्रतिसादाची तमा न बाळगता जे होत ते खरं प्रेम…
मला एखादी व्यक्ती आवडते तर बस आवडते तिच्याकडून कोणत्याही अपेक्षा न ठेवता , माझे तुझ्यावर प्रेम आहे पण तुझेही ते असावेच असा विचार हा प्रेमाचा सौदा होतो कारण जेंव्हा अपेक्षा निर्माण होते ती प्रेमाची दुश्मन होऊन बसते आणि मग जे होतात ते दुष्परिणाम….
निस्वार्थी, निस्सीम आणि समर्पणाची भावना असते तिथे प्रेम असत.
ते फक्त प्रेम असत..त्याला एकतर्फी दुतर्फी असं काही नसत…
मला कोणी आवडत ..बस मला आवडत..!!
मग तिच्या साठी वाट्टेल तो त्याग देखील करण्याची पात्रता त्या प्रेमात हवी.
या एकतर्फी प्रेमाचं एक वैगुण्य पण असते ते म्हणजे झुरणे,
हे मात्र जिवावर बेतू शकते कारण जर पुढच्या व्यक्तीस आपल्या प्रेमाची किंमत नसेल तर हे निरर्थक झुरणे काय कामाचे.या मुळे जीवन उध्वस्त होऊ शकते…
मनात ज्या भावनांची उथल पुथल होते ती आपण थोपवू शकत नाही आणि तू माझी नाहीस तर कोणाचीच नाही ही जी वेडेपणाची आसक्ती निर्माण होते ती अतिशय घातक परिणाम निर्माण करते आणि भोगावे लागते ते त्याचे दुष्परिणाम,
आणि जर हे प्रेम एकांगाने असेच वाढत राहिले तर जीवन संपलंच समजायचे.
काहींच्या मते हे असे प्रेम खरे प्रेम असते असूही शकते पण अशा प्रेमाचा उपयोग काय…? जे इतरांच्या जीवनात विषार निर्माण करणारे ठरते
एखाद्या वर प्रेम करत त्या व्यक्तीच्या नावावर आपले जीवन करणे यात सर्मपणाचे व त्यागाचे वैराग्यच जास्त दिसून येते. इतके निस्सीम, निस्वार्थी प्रेम असू शकेल का कधी…?
हे काहीही असो पण एक नक्कीच की प्रेम कुठलेही असो …
एकतर्फी किंवा द्वितर्फी ते विद्रोही नसावे हे एकच महत्वाचे…
जगाच्या टवाळीचा विषय न बनता व्यक्तीचे भावविश्व तेजस्वी
करण्याची पात्रता त्या प्रेमात हवी
शेवटी काय तर प्रेम हे व्यक्तीसापेक्ष असते पण तरीही ते कुणाच्या जीवनात व्यग्रता किंवा भोवरे निर्माण करणारे नसावे हे तितकेच महत्त्वपूर्ण

इथे कुसुमाग्रजांच्या कवितेतील काही आवडलेल्या ओळी टाकते…
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं…
मातीमध्ये उगवून सुद्धा
नभापर्यंत पोहचलेलं…

या विषयावर अमर्यादित लिहिता येऊ शकेल…

प्रेमाची व्याख्या न संपणारी पण योग्य वाटले तितके लिहून हा लेख इथेच संपवत आहे…

सुप्रसिद्ध लेखिका कवयित्री गझलकारा
⬛ सौ. चंदना सोमाणी, पुणेे

              जगात एकच आणि एकमेव तत्ववेत्ता असा होऊन गेला. ज्याने पृथ्वीतलावरील तमाम विचार करण्याची देणगी आणि क्षमता लाभलेल्या जीवसृष्टीला सांगितले की, कुठल्या तरी ग्रंथात लिहीले म्हणून नव्हे, आपल्या परिवारातील थोर आणि प्रिय व्यक्ती सांगते म्हणून नव्हे, आपले जवळचे नातेवाईक सांगतात म्हणून नव्हे, इतकेच काय मी सांगतो म्हणून अंधपणे विश्र्वास न ठेवता, डोळसपणे त्या घटनेकडे पहा. विश्वात एखादी घटना, गोष्ट, कृती घडत असेल तर त्यावर विचार करा चिकित्सा करा आणि जे घडले असेल ते असेच का घडले असावे वेगळ्या रितीने ते का घडले नाही असे प्रश्र्न स्वत:ला विचारा. म्हणजे या विश्वात घडणा-या प्रत्येक कृतीमागे कुठलीही दैवी शक्ती वगैरे असे काही नसून. कार्यकारण भाव असल्याशिवाय जगात कुठलीही गोष्ट घडत नाही हेच एक त्रिकालाबधित सत्य दिसून येईल. आणि यालाच तर विज्ञान म्हणतात. आणि हे सांगणारा जगातला पहिला मानव, हो ! तो स्वत:ला इतर महाराज, बाबा, स्वामी सांगतात तसे ईश्र्वरी अवतार न मानता, आई बापाचा ठिकाण ठाव नसतानाही इतर जसे होतात तसे प्रकट न होता राजमहालात, राजवैभवात जिवंत माता-पित्याच्या पोटी ज्ञात तारीख वारानुसार जन्मलेला हाडा मांसाचा एक माणूस म्हणवून घेतो परंतु जगातील सत्य आणि शांतीचा शोधापायी या राजवैभवाचा त्याग करतो तो महामानव तथागत गोतम बुद्ध होय. ते पुढे असेही सांगतात की, जो पर्यंत तुमच्या मनातील प्रश्नांना समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत प्रश्र्न विचारत रहा. परंतु इतर धर्माधिका-यांकडून मात्र प्रश्न विचारायलाच बंदी आहे. कारण तर्क केला की, देव कोपतो ही भक्तांच्या मस्तकात खोलवर घुसवलेली भीती हेच तर त्यांच्या व्यवसायाचं प्रमुख भांडवल आहे. आणि वास्तविक विज्ञानाच्या कसोटीवर सत्य जर उलगडत गेले तर आपल्या धंद्यात मंदी येऊन कालांतराने आपले अस्तित्वच नष्ट होऊन जाईल ही भीती या धर्माधिका-यांना पिढ्यानपिढ्या बोचत असते.

         आज एकविसाव्या शतकात कोरोना विषाणुने माजवलेल्या हाह:कारमुळे सारं जग वास्तवाला सामोरं जात आहे. स़ंपूर्ण जग लॉकडाउनमुळे ठप्प झाले आहे. जिथले व्यवहार तिथेच थांबले आहेत. हातावर पोट, अंथरायला धरती आणि पांघरायला आकाश असे लाखो नव्हे तर कोट्यावधी कुटुंब खायला मोहताज झाली असताना कुठलाही देव नव्हे तर माणसंच माणसांच्या मदतीला धावून येत आहेत आणि हे आत्ताच नाही तर जगात ज्या ज्या वेळी आपदा आली आहे त्यावेळी माणसंच माणसांच्या जात, धर्म, लिंगभेद न मानता एकमेकांचे अश्रू पुसत मदतीला धावून आली आहेत. आणि अशा बिकटप्रसंगात देखील प्रत्येक वेळी विषमतेचे भान राखून धर्माधिका-यांनी आजच्यासारखी गलिच्छ खेळी केली आहे. धर्मापेक्षा मानवता श्रेष्ठ आहे आणि तेच जर लोकांच्या डोक्यात बसले तर धर्माच्या नावाने त्यांनी उघडलेली त्यांची दुकानं, नव्हे मोठ मोठे मॉल बंद व्हायला वेळ लागत नाही आणि हेच त्यांना त्यांच्या स्वत:च्या धोक्याचे संकेत वाटतात. ‘यदा यदाही धर्मस्य ग्लानीर्भवती भारत…’ म्हणून अवतार घेण्याचे आश्र्वासन मिळाल्यामुळे ज्यांच्यावर अपार श्रद्धा आणि विश्र्वास ठेवून जगणारी भोळी भाबडी जनता बिनधास्त होती. तेच देव आज कुलूपबंद अवस्थेत आहेत. कोरोनाने हे देव सगळे खोटे आहेत हेच जणू लोकांना पटवून दिले आहे. आज पुन्हा पुन्हा संत गाडगेबाबा यांचे बोल आठवतात बाबा आपल्या प्रबोधनात म्हणायचे ‘बाबांनो जगात देवच नाही, तर तो देवळात कसा असेल ? देवळात तर पुजा-याचे पोट असते’.आज लोकांनी सद्यस्थितीकडे विवेकदृष्टी ठेऊन पाहिले तर याची सत्यता पटायला हवी. देवळाची भीती दाखविणा-यांची वृत्ती इतकी नीच असते की, ते ‘पडलो तरी नाक वर’ असे म्हणून आज कोरोनाबाधितांची सेवा करण्यासाठी देवच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारींच्या वेषात सेवा बजावित आहेत अशी मखलाशी करून देव नसल्याची सत्यता पटल्यामुळे देवाकडे पाठ फिरवलेल्यांना परत जाळ्यात ओढायचे प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणजे क्रांतीसूर्य जोतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची कवाडं खोलल्यामुळे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेल्या हक्क आणि अधिकारांमुळे भारताचे सर्वोच्च संवैधानिक पदावर असलेले काही राजकारणी म्हणतात कि, पूजापाठ, मंत्राचे पठण आणि जप केल्यामुळे कोरोना आणि पर्यायाने मृत्यूवर ताबा मिळविता येते असे जर असेल तर सरकारने एक जबाबदार व्यक्तीचे म्हणणे ग्राह्य धरावे आणि रूग्णांवर उपचारासाठी कोट्यावधी रूपये खर्च न करता पुजा पाठ, मंत्र म्हणणा-या टोळींची नेमणूक सर्व रुग्णालयात करावी.अन्यथा हे निव्वळ थोतांड आहे असे जाहीर करावे. कारण अशा उच्चपदस्थ राजकारणी, चित्रपट अभिनेते आदींकडे आपले आदर्श म्हणून पाहूनच सर्वसामान्य जनता आपले मत ठरवत असते. त्यांचीच तर नकल ते करत असतात. असे लोक जाहीर वक्तव्य करतात ते निश्चितच अंधश्रद्धेला बळ देणारे असतात. हे धार्मिक आणि मानसिक गुलामीचे समर्थक आणि वाहक असतात.अशा लोकांमुळेच संकटकाळी घाबरलेला माणूस भीतीपोटी अंधश्रद्धेकडे वळतो. आणि याहून अडाणीपणा जगात दुसरा असूच शकत नाही. खरं म्हणजे अशा लोकांची सन्मानाने कोरोनाबाधितांच्या रूग्णालयात नेमणूक करून कोरोना बांधितांची सुटका केली पाहिजे. स्वत: तसे न करता इतरांना शेण आणि गाईचे मूत्र पिण्याची महती गाणारे, गंगाजलने सर्व रोग दूर होतात असे लोकांना सांगत आपल्या स्वत:साठी मात्र मेडिकल स्टोअर मधून सॅनिटायझर विकत घेतात . आज धर्म आणि देव या पायावर आधारलेली देऊळे कुलुपात बंद असली तरी. कोरोनासारख्या महामारीला पुरून उरण्यासाठी तंत्र आणि विज्ञानाच्या पायावर उभी असलेली मोठमोठी रूग्णालये अहोरात्र सताड उघडी आहेत. यामुळे जगाला एक गोष्ट मानावीच लागेल आणि ती आता शंभर टक्के तर सिद्धही झालीही आहे. आणि ती म्हणजे, देव, धर्म आणि देऊळ यांची ताकद किती आणि काय आहे हे माहीत झाल्याने या गोष्टी नसलेल्या तरी जग चालू शकते. परंतु विज्ञाना शिवाय एक क्षणभर ही हा विश्वाचा गाडा चालू शकत नाही.

आता हीच वेळ आहे. अंधश्रद्धा,अनिष्ट रूढी, परंपरा आणि कर्मकांडांना नाकारून विज्ञान आणि मानवतेला स्विकारायची. इतकेच…

अंधश्रद्धा को भगायेंगे !
मानवता को अपनायेंगे !!
 📝 विठ्ठलराव वठारे
      अंनिस, सोलापूर.

🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷

2 Replies to “◼️रविवारच्या साहित्यरंगातील-सप्तरंग”

 1. आदरणीय विठ्ठल आवळेजी
  मा.संपादक,सप्तरंग.
  आजचा अंक अतिशय सुंदर आणि ज्ञानवर्धक आणि प्रबोधनात्मक आहे.माझेही विचार मांडल्याबद्दल विशेष आभार.
  आजच्या अंकाच्या आऱंभाने आपण एकत्र आलो आहोत
  यापुढेही ऋणानुबंध राख या.
  आपल्या प्रत्येक विधायक कार्यात सदैव साथ आहे हे सदैव ध्यानी असं द्या.
  धन्यवाद !
  विठ्ठलराव वठारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *