चंद्रपुरातील आष्टा व जुगनाळा ग्रामपंचायतीला केंद्र शासनाचा पंचायत सक्षमीकरण पुरस्कार

🔴 ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

Ø  नवी दिल्ली येथे विशेष कार्यक्रमात होणार सन्मान

Ø  राज्यातील 14 ग्रामपंचायतीमध्ये चंद्रपूर येथील दोन ग्रामपंचायतीचा समावेश

चंद्रपूर, दि. 20 जून: केंद्रशासनाच्या वतीने ग्रामविकासासाठी चालना देण्याच्या हेतूने पंडित दिनदयाल उपाध्याय पंचायत सक्षमीकरण पुरस्कार योजना राबविली जाते. केंद्रशासनाच्या या पुरस्काराकरिता राज्यातील 14 ग्रामपंचायतीची निवड झाली असून चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील आष्टा व ब्रम्हपूरी तालुक्यातील जुगनाळा ग्रामपंचायतीचा समावेश आहे,अशी माहिती जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील या ग्रामपंचायतींना दिल्ली येथे होणाऱ्या विशेष समारंभात 10 लक्ष रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आहे.पंचायत राज मंत्रालय भारत सरकार यांच्या माध्यमातून देशभरातील विविध राज्यातून या पुरस्कारासाठी ग्रामपंचायतींची निवड केली जाते. महाराष्ट्रातील 2 हजार 700 ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभाग नोंदविला असून त्यामधून राज्यातील 14 ग्राम पंचायती पात्र ठरलेल्या आहे.त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील आष्टा व ब्रम्हपूरी तालुक्यातील जुगनाळा ग्रामपंचायतीची निवड झालेली आहे. ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानाची व कौतुकाची आहे. या ग्रामपंचायतींनी केंद्र शासनाच्या अटी व शर्तींना अनुसरून केलेले नियोजन,राबविलेल्या विविध योजना व वैशिष्टपूर्ण कामे पुरस्काराकरिता महत्वपूर्ण ठरले आहे.

आष्टा ही  1 हजार 200 लोकसंख्येची ग्रामपंचायत असून  ग्रामपंचायत नेहमी नाविण्यपुर्ण  उपक्रम राबवीत असून सक्षमिकरण व विकासासाठी प्रयत्नशील असते. याचा परिणाम गाव, तालुका स्मार्ट  पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व विविध पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.गाव महाराष्ट्र ग्राम सामाजिक अभियानांतर्गत मागील 3 वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये विविध विषयावर काम केले जाते.

गावात नियमित ग्रामसभा, ग्रामपंचायत सदस्यांचा सक्रीय सहभाग, 100 टक्के करवसुली ,पिण्याच्या पाण्याचे आरो मशीन, प्रत्येक कुटुंबासाठी गरम पाणी व्यवस्था, लोकसहभागातून ग्राम स्वच्छता, डिजिटल शाळा, अंगणवाडी, आयएसओ ग्रामपंचायत,पेपरलेस ग्रामपंचायत, अपारंपरिक उर्जा स्त्रोत, गावात सीसीटीव्ही सुविधा  निर्माण केलेली आहे.

जुगनाळा ही  जिल्ह्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम ग्रामपंचायत आहे. त्याचबरोबर माझे गाव माझे तीर्थ अभियान, अध्यक्ष आदर्श ग्राम,संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, स्वचाताग्रही यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार इ.विविध पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.

गावातील ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी आयएसओ मानांकित आहे. ग्रामसभा, मासिक सभा, चावडी सभेला गावकरी नियमित सहभागी होतात. 100 टक्के करवसुली, सर्व पिण्याच्या पाणी स्त्रोतांना हिरवे कार्ड, सोलर आधारित नळ पाणीपुरवठा योजना, रस्ता दुतर्फा लोकसंदेश फलक इ . नाविन्यपूर्ण उपक्रम गावात राबविण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायातीना देशपातळीवर मिळालेला हा पुरस्कार जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असून ग्रामपंचायतीनी केलेली कामे इतर गावासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *